पार्श्वभूमी
जानेवारीमध्ये आम्ही केलेल्या सायकल सफारीवेळी मनोहर सरांशी भेट झाली. ४ दिवस नेहमी होत असलेल्या ट्रेकिंगविषयक विविध गप्पांमधून त्यांनी हॉस्टेलसाठी अनुभवी ट्रेकर्सची कॅम्पलिडर म्हणून किती गरज आहे हे समजावून सांगितले. आम्हीही विचारपूर्वक ही सेवा करायचे ठरवले. आतापर्यंत हॉस्टेल बरोबर केलेल्या ट्रेक्समध्ये एक प्रामुख्याने आढळलेली बाब म्हणजे विविध कॅम्पचे कॅम्पलीडर. कोणताही मोबदला न घेता निव्वळ ट्रेकिंग कम्युनिटीची सेवा म्हणून भारतातील विविध ठिकाणाहून आलेले हे एक प्रकारचे सेवेकरीच. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून आणि त्यांची त्या ठिकाणची भूमिका व जबाबदारी लक्षात घेता त्यांचे नेहमीच कौतुक वाटायचे. एवढी मोठी जबाबदारी पार पाडणे आपल्याला जमेल की नाही ही शंका मनात होती पण मनोहर सरांनी आम्हाला आत्मविश्वास दिला. कॅम्पलीडर होण्याकरिता लागणारे निकष आम्ही पूर्ण करीत होतो. त्यानंतर आवश्यक असणारी इतर औपचारिकता पूर्ण केल्यावर आम्हाला कॅम्पलीडर होण्यासाठी हिरवा कंदील मिळाला.
Day Zero
उटी पासून १५-२० किमी अंतरावरील शोलुर नावाचे छोटे टुमदार गाव आहे जिथे आमचा बेसकॅम्प होता. एक टापटीप, स्वच्छ, नीटनेटके गाव. गावातील घरेही एकदम सुंदर सजावट केलेली. आजूबाजूला चहाचे मळे असल्याने गावाची आर्थिक स्थिती चांगली आहे असे कळले. . . त्याचाच प्रत्यय तेथील छान छान घरांवरून येत होता.
आदल्या दिवशी संध्याकाळी उशिरा दिल्लीहून १२ आचारी बेसकॅम्पला हजर झाले. त्यांनी आल्या आल्या जवळपास ४० जणांचे जेवण बनवले व सर्वांची जेवणे झाल्यावर एकूण ६ कॅम्पसाईटला ८ दिवस लागणारे सर्व किराणा साहित्य आमच्यासारख्या कॅम्पलीडरच्या मदतीने बाजूला काढण्यात आले, ज्यात अगदी मिठापासून तेलापर्यंत आणि कोथिंबीर पासून सर्व प्रकारच्या भाज्या, सर्व पिठे, मसाले इत्यादी इत्यादी पदार्थ होते. ८ दिवसांचा तात्पुरता संसार ६ वेगवेगळ्या ठिकाणी थाटायचा होता व ८ दिवसांनी पुन्हा आवरून इथेच शोलूरला आणायचा होता. सर्व कॅम्पचा रोजचा मेनू फिक्स होता त्यामुळे त्याप्रमाणे सगळे साहित्य विभागले होते. . . या सर्व व्यापात ३ तास कधी गेले कळलेच नाही. आलेली सर्व आचारी मंडळी त्यांच्या कामात किती उत्तमरीत्या निष्णात आहेत याची प्रचिती आली. खूप रात्र झाली तशी मात्र सर्वांनी आपापली जागा पाहून पथारी पसरली.
आज सकाळी उठल्या उठल्या मुख्य काम होते ते म्हणजे कँपसाठी लागणारे बाकी सर्व साहित्य जसे की जेवण बनवायची भांडी, मोठमोठाली पातेली, झोपण्याची ब्लँकेट, खाली घालायच्या स्लीपिंग म्याट वगैरे वगैरे सामान बाजूला काढणे. आचारी टीम एवढी एक्स्पर्ट होती की त्यांना फक्त एकदा मेनू वाचून दाखविल्यावर त्यांनी झटपट आपापल्या सोयीची भांडी बाजूला काढणे सुरू केले. बेसकँप मधील देखावा बघण्यासारखा होता. जवळपास डझनभर आचारी भांड्यांच्या भल्यामोठ्या ढिगातून गरजेची भांडी जमवत होते. सर्व कॅम्पलीडर हातातील वहीमध्ये बाजूला काढलेले सर्व सामान व किरणामाल यांची यादी बनवत होते.
सर्व साहित्य एका बाजूला काढून आम्ही हुश्श झालो. आम्ही सर्व १२ कँपलीडर गप्पाटप्पा करत ट्रकची वाट बघत होतो. बहुतांशी लीडर्स तामिळनाडू, कर्नाटक मधील विविध ठिकाणाहून आलेले ज्येष्ठ नागरिक होते. सरकारी नोकऱ्या, बँका किव्वा इतर विविध क्षेत्रातून उच्च पदावरून निवृत्त होऊन आता ते गेले काही वर्षे स्वयंसेवक म्हणून काम करीत असल्याचे कळले. सर्वजण हाडाचे ट्रेकर्स होते आणि या वयातही ट्रेकिंग, सायकलींग वगैरे मध्ये सहभागी होणारे होते. ट्रक आला व त्यात आमच्या कॅम्पचे व आणखीन एका कॅम्पचे साहित्य चढवून आम्ही आमच्या कँपच्या दिशेने म्हणजेच 'पारसन व्हॅली' कडे निघालो. बाहेर स्वच्छ ऊन होते पण हवेत गारवा असल्याने त्रास होत नव्हता. ट्रकच्या मागच्या हौदात बसून आचारी लोकांबरोबर गपशप करीत प्रवास सुरू होता. रस्त्याच्या दुतर्फा निलगिरीची दाट झाडी होती आणि तेवाढयात अचानक मला निलगिरी लंगुर जातीच्या माकडांची एक टोळी दिसली. संपूर्ण अंगभर काळेभोर केस व चेहरा मात्र पांढरा तांबूस केसांचा. ही माकडे फक्त याच परिसरात आढळतात व यांची गणना लुप्त होत जाणाऱ्या प्रजातींमधे झालेली आहे. तासाभरात आमच्या कॅम्पला पोचलो. आचारी लोकांनी सर्व साहित्य खाली उतरवून घेतले व लगेच किचन खोलीचा ताबा घेऊन दुपारचे जेवण बनवायला चालुही केले. आमची कॅम्पसाईट आम्हाला बघताक्षणीच आवडली. आम्ही दोघांनी सर्व कॅम्पसाईट नीट फिरून पहिली व काय काय व्यवस्था करावी लागेल याची मनोमन नोंद केली. तोपर्यंत जेवण तयार झाले व आम्ही एकत्र मिळून जेवणाचा आस्वाद घेतला. नंतर बाहेरच्या बाकड्यावर बसून आजूबाजूची गर्द झाडी, दुपारच्या निरव शांततेत हरवून गेलो.
संध्याकाळी बेस कॅम्पला रिपोर्ट करण्यासाठी नेटवर्कच्या शोधत बाहेर पडलो. १ किमी अंतरावर एक छोटी टेकडी चढून नेटवर्क मिळणार होते. पुढील ८ दिवस ही पायपीट नेहमीच करावी लागणार होती. तिथे पोचेपर्यंत दुपारचे स्वच्छ ऊन गायब होऊन हवेत गारठा जाणवू लागला. जॅकेट चढवायला हवे होते असे सारखे वाटत राहिले. रेपोर्तींग व इतर वैयक्तिक फोनाफोनी आटोपून आम्ही कॅम्प मध्ये परतलो.
आमची खोली कम ऑफिस नीट लावून, जेवणे आटोपून बाहेरच्या बाकड्यावर बसलो आणि वर आकाशात बघितले तर एकदम बढिया नजारा होता. आकाश चांदण्यांनी नुसते फुलून गेले होते. आमचा कॅम्प फॉरेस्ट भागात असल्याने आजूबाजूला वस्ती नव्हती त्यामुळे मिट्ट काळोख होता. आकाश दर्शनासाठी अत्युत्तम. दिवसभराच्या दगदगिने डोळ्यावर पेंग आली तसे आम्हीही निद्रेच्या आधिन झालो.
वोह सात दिन
आदल्या रात्री लवकर झोपल्याने सकाळी लवकरच जाग आली. बाहेर चांगलाच गारठा होता. १०-१२ डिग्री सेल्सिअस तापमान असावे. आचारी सहकाऱ्यांनी चहा झाल्याची वर्दी दिली व चहाचा वाफाळता कप हातात घेऊन कँपशेड समोरील बाकावर येऊन बसलो. आजूबाजूच्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता आणि तो ऐकत चहाचे घोट घेऊ लागलो. सूर्य हळूहळू वरती येऊ लागला आणि डोक्यात दिवसभरात उरकायच्या कामांची उजळणी सुरू झाली. . .
मुख्य कार्यक्रम असा होता की ६ दिवसांचा एक ट्रेक होता ज्यात रोज स्त्रीपुरुषांची साधारण २० जणांची एक एक तुकडी आमच्या कॅम्प मध्ये येऊन, रात्री राहून, दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून, पॅक लंच घेऊन पुढील कॅम्पला रवाना होणार होती. मी व केतकी यावेळी स्वतः ट्रेक न करता एकाच कॅम्पमध्ये मुक्काम ठोकून कॅम्पलीडरची भूमिका पार पाडणार होतो. एकूण मिळून ६ कॅम्प होते व प्रत्येक ठिकाणी आमच्यासारख्या २-२ स्वयंसेवकानी कॅम्प लीडरची जबाबदारी घेतली होती.
कामगार मंडळीने सर्व भांडी व इतर साहित्य कालच स्वच्छ केले होते. आजचे मुख्य काम होते अंथरूण तयार करणे, उपलब्ध बाथरूम टॉयलेटची स्त्री पुरुष विभागणी, कॅन्टीन वेळापत्रक बनवणे इत्यादी होते. पहिली तुकडी दुपारनंतर कधीही येणे अपेक्षित होते त्यामुळे आम्ही भरभर आवराआवर केली. संध्याकाळी ६ वाजता पहिली तुकडी पोचली. त्यांच्यासाठी जसा ट्रेकिंगचा पहिलाच अनुभव असणार होता तसाच आमच्यासाठी कॅम्पलीडरचा. वेलकम ड्रिंक ने स्वागत करून नंतर सूप व जेवण सुखरूप पार पडले. छोटी शेकोटी पेटवून आलेल्या ग्रुपच्या गप्पाटप्पा सुरू झाल्या व आम्हीही हुश्श केले. . .
दुसऱ्या दिवशी कुडकुडत्या थंडीत सकाळी ५.३० ला उठून किचनमध्ये येऊन पाहतो तर आचारी चहाचे आधण ठेवतच होते. ६ वाजता सर्वांना चहाची वर्दी दिली व मी चहाचे घोट घेत बाकड्यावर येवून बसलो. थोड्या वेळाने नाश्ता मांडला गेला व त्यांनतर आमच्याकडे आलेली पहिली बॅच ट्रेकसाठी रवाना झाली.
या सर्व बॅचचे वैशष्ट्य असे की ते साधारण ट्रेकर्स नसून, इंडियन civil services जसे की आयएएस, आयपीएस वगैरे UPSC परीक्षा पास होऊन आलेले भावी सरकारी अधिकारी बाबू होते. ट्रेकिंग हा त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग होता व त्यांनतर काही दिवसातच ते देशभरात उच्च पदावर नियुक्त होणार होते. सरासरी वय होते २५-३० च्या दरम्यान.
यापुढील सर्व बॅचेसचा दिनक्रम साधारण याप्रमाणेच होता. कधीतरी थोडेफार मागेपुढे. आमचाही दिनक्रम ठरून गेला होता. आधी वाटले होते की दिवसभर करायचे काय पण नंतरचे ७ दिवस कधी आले आणि गेले समजलेच नाही. ही सर्व मंडळी तशी खास केंद्र सरकारशी संबंधित असल्याने व्यवस्था चोख ठेवायचे एक दडपण होते. उपलब्ध साधन सामुग्री व मनुष्यबळ यावर सर्व डोलारा सांभाळायचा होता.
प्रत्येक बॅचचा एकेक नवनवीन अनुभव होता. तसे पाहिले तर सर्वजण मज्जा धम्माल करत होते. काहींची कुरबुर चालू असायची पण परिस्थितीची जाणीव करून दिली की ठीक व्हायचे. २-३ बॅचेस ने शेकोटीची मजा घेतली तर एका बॅचने क्रिकेटचा आनंद लुटला. एक बॅच तर खूप उशिरापर्यंत पत्त्यांचा UNO खेळ खेळत बसले तर एका बॅचने चक्क अंगणात पथारी पसरून आकाश दर्शनाचा आनंद लुटला. खूप खूप शिकलेली आणि मेहनत करून UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण झालेले हे ऑफिसर्स भारताचे भविष्यातील पॉलिसी मेकर्स होते. प्रत्येक बॅचसोबत AK47 धारी २ खास कमांडोज असायचे. ट्रेक करतानाचा मार्ग दाखवायला फॉरेस्ट विभागाचे गार्ड असायचे. आमच्याशी मात्र सर्वजण खूप आदराने वागायचे व बोलायचे. त्यांना प्रचंड उत्सुकता असायची की आम्ही कुठलेही मानधन न घेता एवढ्या लांबून स्वयंसेवक म्हणून का आलोय. रात्रीच्या जेवणावेळी आमचा गप्पांचा फड जमायचा. या सर्वांकडून आम्हालाही खूप शिकण्यासारखे होते. काही मुले मुली ग्रामीण भागातून कठोर परिश्रम करून येथपर्यंत पोचली होती. त्यांच्या देहबोलीतून आणि वर्तनातूनही ते जाणवायचे. अशीच एक सातारा जिल्ह्यातील एका गावातून पुढे आलेली ऑफिसर होती. मराठी बोलायला मिळाल्याने आम्हाला व तिलाही खूप छान वाटले.
या सर्व डोलाऱ्याचे मुख्य आधारस्तंभ होते आमचे २ आचारी व त्यांना तत्पर मदत करणारे २ सफाई कर्मचारी. आचारी मंडळी तर सतत व्यग्र असायची. त्यांचे टाइम मॅनेजमेंट एवढे चोख असायचे की ठरलेल्या वेळेच्या ५-१० मिनिटे आधीच चहा नाश्ता जेवण तैय्यार असायचे. रोज एक असे ६ दिवस येणाऱ्या ६ बॅचेसना प्रत्येक कॅम्पला वेगवेगळा मेनू मिळणार असल्याने आमच्या कँपचा मेनू एकच एक राहणार होता. रोज सकाळी नाश्त्याला पोहे व शेवया खीर, रोज संध्याकाळी स्नॅक्सला बटाटेवडे, रात्रीच्या जेवणाचा मेनूही रोज नेहमीचाच. दुपारी जेवणारे मात्र आम्ही ७-८ जणच असायचो. दुपारच्या जेवणासाठी बाबूलाल आमची फर्माईश विचारायचा व काहीना काही खास पदार्थ बनवला जायचा. असेच एकदा दुपारी त्याने अप्रतिम असे 'मुली के पराठे' खीलवले. सफाई कर्मचारी हे जरा वयस्कर नवरा बायकोचे जोडपे होते. दररोज काय काय काम करायचे आहे याची त्यांना पहिल्याच दिवशी नीट माहिती दिल्यावर नंतर सर्व दिवस त्यांनी चोख काम केले. भाषेची अडचण पहिल्या दिवशी वाटली पण नंतर मात्र खाणाखुणा करून आमचा एकमेकांशी उत्तम संवाद झाला.
आमच्या कॅम्पमधील हे सात दिवस आमच्यासाठी अत्यंत अविस्मरणीय राहिले. आमचा कॅम्प, आजूबाजूची गर्द निलगिरी झाडी, त्यावरचे ते लंगूर्स, एप्रिल महिना असूनही दिवसभर असलेला गारठा, रात्रीचे स्वच्छ सुंदर चांदण्यांनी भरलेले आकाश हे सर्व कायमचे आठवणीत राहील. आमचे आचारी व सफाई कर्मचारी यांच्याशी तर एवढे सख्य जमले की त्यांचा निरोप घेताना नकळत डोळे पाणावले. आमच्या कॅम्पला भेट देऊन गेलेले सर्व ऑफिसर ट्रेकर्स, त्यांच्याबरोबर असणारे कमांडोज, कॅम्पच्या सुरक्षिततेसाठी नेहमी हजर असणारे फॉरेस्ट विभागाचे गार्ड या सर्वांबरोबर झालेल्या गप्पातून खूप माहिती मिळाली व शिकायलाही मिळाले. या सर्व UPSC ऑफिसर्सच्या ट्रेनिंग संस्थेचे पदाधिकारीही अधेमधे कॅम्पला भेट देत असत. कॅम्पलीडरची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल एक स्त्री म्हणून केतकीचा ट्रेनिंग संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. उटीमधील
व बेसकॅम्प शोलुर मधील आमचे सर्व ज्येष्ठ अधिकारी व इतर लीडर्स यांच्या
मार्गदर्शनामुळे ही जबाबदारी पेलायचा आत्मविश्वास मिळाला. त्याबद्दल
त्यांचे अनेक आभार.






















अतिशय सुरेख आणि सविस्तर वर्णन...
ReplyDeleteधन्यवाद
Deleteआटोपशीर आणि सर्वसमावेशक वर्णन . मस्त . मी हे इतर ठिकाणी काहीही बदल न करता पाठवू शकतो का ?
ReplyDelete