Rahul's Outings
Friday, 21 November 2025
BhatakLele@BhatakSpiti. स्पितीमधील भटकंती
Saturday, 24 May 2025
आणि बुद्ध हसला
पश्चिम बंगाल आणि नेपाळच्या सीमेवरील प्रसिद्ध संदकफू ट्रेकमध्ये एकूण ७० किमी चालायचे होते. एवढ्या जास्त अंतराचा ट्रेक करायचा मला वैयक्तिक कंटाळा येतो पण या ट्रेकची काही खास वैशिष्ट्ये व आकर्षणे लक्षात घेऊन ट्रेकला जायचे ठरवले.
सिलिगुरीला पोचलो आणि 'मेरे सपनोकी रानी कब आयेगी तु' हे गाणे म्हणत हेरिटेज टॉय ट्रेनने सिलिगुरी ते दार्जिलिंग प्रवास केला. एक छान अनुभव होता. जगात फक्त दोन ठिकाणी (मेल्बर्न व दार्जिलिंग) कार्यरत असणारी स्टीम इंजिन ट्रेनही पाहिली. दार्जिलिंग मध्ये दोन दिवस फिरून थोडे स्थलदर्शन केले. तिथल्या झू मध्ये दुर्मिळ रेड पांडा चे दर्शन घेतले तसेच झू जवळच असलेल्या HMI (हिमालयन माऊंटनीरिंग इन्स्टिटयूट) ला भेट दिली. दोन्ही ठिकाणे खूप छान.
पुढच्याच दिवशी ट्रेक ग्रुपला जॉईन करून सेपी या गावातील बेसकॅम्पला पोचलो व मुक्काम केला. दर्जिलिंग ते सेपी हा जंगलातून जाणारा एक सुंदर रस्ता होता. हा रस्ता भारत नेपाळ सीमेला अगदी चिकटून जातो. एवढा जवळून जातो की वाटेत येणाऱ्या मनेभजंग नावाच्या गावात फेरफटका मारताना एका गल्लीत शिरलो तर कळले की ती गल्ली व दुकाने नेपाळच्या हद्दीत आहेत. रात्री जेवणाआधी गाईड मंडळींनी सर्वांची आपापसात ओळख करून घेतली आणि ट्रेकची संपूर्ण माहिती दिली.
ट्रेकचा पहिला दिवस तसा सोपा होता. पहिला मुक्काम समादेन नावाच्या एका टुमदार सुंदर गावात टीहाऊसमध्ये केला. या ट्रेकमधील सर्व मुक्काम टीहाउस म्हणजेच छोटी लॉज किव्वा होमस्टे मध्ये असणार होते. उत्तराखंड किव्वा हिमाचल प्रदेशपेक्षा इथला परिसर, स्थानिक लोक, त्यांच्या पद्धती आणि संस्कृती भिन्न आहेत. नेपाळसीमेशी खूप जवळीक असल्याने दोन्ही देशातील लोकांचे आपापसातील संबंध चांगलेच दृढ दिसले. संध्याकाळी झालेल्या छोट्या मैफिलीमध्ये आमच्या एका गाईडने नेपाळी गाणी गायली.
पुढचा दिवस ट्रेक मधील सर्वात कठीण दिवस होता. पण अत्यंत सुंदर जंगले आणि थंड हवेने थकवा जाणवत नव्हता. आधी ओक वृक्ष, नंतर खुरट्या बांबूची घनदाट बने व आणखीन उंची गाठल्यावर ऱ्होडेडेनड्रॉन जंगले लागली. ऱ्होडोचा बहर डोळ्यांचे पारणे फिटवत होता. दुपारच्या जेवणानंतर मात्र जरा कठीण वाट होती. साधारणपणे प्रत्येक ट्रेकमध्ये आपल्याला एक दोन श्वांनमित्रांची सोबत मिळतेच मिळते. अश्याच एका मोतीची (आम्ही ठेवलेलं नाव) साथ आम्हाला समादेन पासून पुढे मिळाली. बिचारा आमच्या बरोबर चालत होता, आम्ही थांबलो की थांबत होता, कधी थोडे पुढे जाऊन रस्ता सुरक्षित आहे ना तपासून येत होता. आम्हा सर्वांनाच त्याचा फार लळा लागला. एकदा तर मी एका हिरव्यागार कुरणावर बसकण मारून आराम करत बसलो तर हा मोतीही पायात येऊन आरामात बसला. पण दुसऱ्या दिवसापासुन् पुढे तो कधीच दिसला नाही. कदाचित दुसऱ्या नवीन ट्रेकर मंडळी बरोबर त्याची गट्टी जमली असावी. आम्ही मात्र त्याला खूप मिस केले.
१५ किमी चढाईची वाट पार करून अखेर फालूट या ठिकाणी मुक्कामाला पोचलो. आजचे टीहाउस यथातथाच होते. थंडी खूप वाढली होती. फालूट हे या ट्रेकमधील २ नंबरचे सर्वात उंचीवरील ठिकाण होते. आम्ही जवळपास ३५००+ मिटर्स उंचीवर आलो होतो. मात्र आकाश बऱ्यापैकी ढगाळ असल्याने आजूबाजूची पर्वतशिखरे दिसत नव्हती. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून sleeping budhdha पाहायला जायचे होते (sleeping budhdha म्हणजे पर्वतरांगांची अशी रचना की एखादा माणूसच पहुडला आहे असे वाटावे. स्थानिक प्रदेशात बौद्धधर्म प्रभाव अधिक असल्याने त्या रचनेला तसे नाव दिले गेले आहे).
पहाटे ५ वाजता भयानक थंडी आणि कान फोडत मेंदूला जाऊन भिडणारा बोचरा वारा सहन करित कसेबसे बाजूच्या डोंगरमाथ्याकडे निघालो. तिथे पोचलो मात्र. . . समोरचा नजारा पाहून स्तीमित झालो. थंडी, वारा विसरून जाऊन् स्लीपिंग बुद्धा डोळ्यांत साठवून घेऊ लागलों. अतिशय भारी देखावा होता. नशिबाने आकाश बऱ्यापैकी स्वच्छ होते. या निद्रिस्तावस्थेतील बुद्धाचा डोक्याकडील भाग म्हणजे कुंभकर्ण पर्वतसमूह, कांचनजंगा समूह हा पोटाकडील आणि पांडीम शिखरसमूह हा पायाकडील भाग होय. या निद्राधीन बुद्धाच्या चेहऱ्याकडे पाहुन् मन आनंदून गेले व बुद्धही आपल्याकडे पाहून स्मितहास्य करतोय असा भास झाला. मोती समवेत ग्रुप फोटो काढून आम्ही कॅम्पला परतलो. झटपट आवरून ट्रेक सुरु केला.
आमचे पुढील दोन मुक्काम नेपाळच्या हद्दीत होणार होते. पहिला होता ठोकूम या गावी. कॅम्पसाईट छान होती. आम्ही एका पठारावर होतो व आजूबाजूला हिमशिखरे दिसत होती. ढगांचा लपंडाव सुरु असल्याने खूप दूरवर असलेले एवरेस्ट शिखर अजून दिसले नव्हते. आमचा मुख्य गाईड पेमा शेरपाबरोबर गप्पा सुरु असतानाच आकाश स्वच्छ झाले व दूरवरील एवरेस्ट, मकालू, ल्होत्से शिखरांचे दर्शन झाले. ८००० मिटर्सपेक्षा उंच असलेल्या जगातील १४ शिखरांपैकी ४ शिखरे, दुरून का होईना पण आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकलो याचे खूप समाधान होते. आजचा ट्रेक सुरु झाला आणि वाटेवरच आम्हाला एक जत्रा मिळाली. नेपाळी नववर्षानिमित्त एक मेला भरला होता ज्यात विविध खाद्यपदार्थ आणि सर्व प्रकारच्या पेयांची रेलचेल होती. नेपाळमध्ये विक्रम संवत नुसार कालगणना होते. त्यामुळे तिथे आता २०८२ हे वर्ष सुरु झाले. आपण भारतात शालिवाहन शक अनुसरतो त्यानुसार आपल्याकडे आता १९४८ हे हिंदूवर्ष सुरु आहे. आमच्या गाईडने आधीच सांगितल्या प्रमाणे आणखीन एक खास गोष्ट आमच्या निदर्शनास आली ती म्हणजे आम्हाला वेगवेगळ्या दिवशी मोबाईल वर भारतातील वेळेबरोबरच कधी नेपाळ तर कधी चीन किंवा भुतान, बांगलादेश आणि म्यानमार या देशातील वेळाही दिसल्या.
पुढे ट्रेक करत दुपारी 'आल' नावाच्या नेपाळच्या दुर्गम भागातील गावामध्ये पोचलो व एका टुमदार टीहाउस मध्ये राहिलो. मालक एक नेपाळी कुटुंब होते. त्यांचा एक मुलगा टीहाउस सांभाळत होता तर दुसरा नेपाळ आर्मीमध्ये होता. सूर्यास्तावेळी दरीत पसरलेले धुके आणी आकाशात झालेली रंगउधळण मनात कायमची साठून राहीली.
पुढील दिवशीचा ट्रेक म्हणजे खूप उतरंड होती. आधी थोडेसे अंतर चढून आमच्या ट्रेकच्या समीट ठिकाणी (पूर्ण ट्रेकमधील सर्वात उंच ठिकाण) म्हणजेच संदकफू व्यूपॉईंटला पोचलो. १२००० फीट उंचीवरील ठिकाणी पोचून सर्वांनी जल्लोष केला व खूप फोटो काढले. यापुढील वाट म्हणजे पूर्ण उतार होता. पुढचे जवळपास ५-६ तास आम्ही फक्त आणि फक्त उतरत होतो. कधी दगडी तर कधी मातीची, कधी माळरानातून जाणारी तर कधी बांबूच्या बेटातुन् जाणारी ही उतारवाट सुंदर होती. वाटेत आलेल्या गुर्दूम या गावांत दुपारचे जेवण घेऊन, नंतर एका नदीपुलावर थोडा टाईमपास करून टिम्बुरे या ६५०० फूट उंचीवरील गांवात पोचलो आणी हुश्श केले.
उद्याच्या शेवटच्या दिवशी फक्त ३ किमी चालायचे असल्याने आज सर्वजण रिलॅक्स मूड मध्ये होते. संध्याकाळी चहा पकोडे बरोबर सर्टिफिकेट प्रदान करण्याचा कार्यक्रम झाला व सर्वांनी उल्हसितपणे आपापली मनोगते व्यक्त केली.
दुसऱ्या दिवशीचे ३ किमी अंतर गप्पांमधेच संपले आणि सेपीच्या पुढे जीप प्रवास सुरु झाला.
जगातील ४ उत्तुंग शिखरांचे दर्शन, Sleeping Budhdha चा मनोहारी देखावा, सुंदर ट्रेकरूट, ऱ्होडो जंगले, मोतीबरोबर् झालेली गट्टी, टीहाउस स्टे, नेपाळी पाहुणचार, आमचे खूप चांगले आणि छान माहिती देणारे ४ गाईड आणि अश्याच अनेक आनंदक्षणांची फोटोरूपी शिदोरी घेऊन जड अंतःकरणाने हिमालयाला अलविदा करीत सिलिगुरीला निघालो. . .
राहुल लेले









































