Sunday, 12 March 2023

बुलेट ट्रीप - दांडेली



२०२१ चा जानेवारी संपत आला होता. कोविडमुळे गेले काही महिने घरात अडकून पडल्याने मन अस्वस्थ होते. रत्नागिरीहून निघून गोवामार्गे एखादा अपरिचित घाट बुलेटने चढुन सह्याद्री पार करायचा व दुसऱ्या एखाद्या अश्याच नवीन घाटाने समुद्रकिनारी उतरायचे असा कच्चा बेत अनेक दिवस घोळत होता. विचार करून ठरवले की लगेच निघू. कमीत कमी सामान व कोवीडबाबतची जास्तीत जास्त दक्षता घेउन प्रस्थान केले. काही वर्षांपूर्वी कारने दांडेली भाग पालथा घातला होता. रस्ते छान होते म्हणून तिकडे जायचे पक्के केले.

पहिल्या दिवशी साधारण २५० किमी पार करुन गोव्यात पोचलो. तसा सोपा पेपर होता कारण अर्धा रस्ता नेहमीचा माझ्या मूळ गावी मिठबावला जाणारा माझ्या बुलेटच्या टायरखालचा सागरी महामार्ग होता. गावी थोडा वेळ थांबून, जेवण करून आचरा मार्गे कणकवलीला हायवेला बाहेर आलो. तिथून पुढे मळगाव पर्यंत नवीनच झालेल्या फुल्टु मस्त हायवेने राईड झाली. नंतर विचार केला की गोव्यात हायवेने न जाता आरोंदा मार्गे जावे. जरा आतला वेगळा व शांत रस्ता. या ट्रीप मध्ये एक गोष्ट पक्की केली होती ती म्हणजे स्पीडने जाण्यापेक्षा आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य पाहत त्याची मजा घेत जायचे.  गावागावातून जाणारा शांत रस्ता पार करीत आरोंदाला पोचलो. किरणपाणी पुल पार करून गोयनगरित प्रवेश केला. आरंबोलला एका बीच कोटेजला मुक्काम  केला.  सागरकिनारी पायांशी स्पर्श करणाऱ्या लाटा व मंद वारा अंगावर घेत रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेतला व झोपी गेलो.

 



दुसऱ्या दिवसाचा प्रवास ठरल्या वेळेत सुरु केला. बिचोलीला (डिचोली) नाष्टा केला. When in Rome, be a Roman या उक्तीप्रमाणे टिपिकल गोवन नाष्ता झाला. कडक पाव + मिक्स पातळभाजी + चहा + बन. पध्दतशीर पेटपुजेनंतर पुढील राईड सुरु केली. सांखळी गाव पार केल्यावर रस्ता शांत झाला. साखळीहून चोरला घाटाचा रस्ता न घेता मोल्लेच्या दिशेने निघालो. एकतर सुशेगात गोवा, सकाळची वेळ, त्यांत तिथले खड्डेरहित छान रस्ते, ट्रॕफिक कमी आणि बुलेटवर स्वार . . . और क्या चाहिये. . .  सुसाट निघालो. वाटेत ओळखीचं मोल्ले गाव लागलं. २ वर्षापूर्वी इथुनच दुधसागर ट्रेक केला होता त्याची आठवण ताजी झाली. गाव पार करता करता डाव्या बाजुला मोठा बोर्ड दिसला- 'मोल्ले बायोडायव्हर्सिटी पार्क'. चौकशीअंती कळले कि याचे उद्घाटन होणे बाकी आहे. २ महिन्यांत चालु होईल. छोटा फेरफटका मारला. छान बनवलंय. संधी मिळाली तर नक्की पहा.

 

'अनमोड' नावाचा घाटरस्ता सुरु झाला. घाटाचा काही भाग तर चक्क कॉंक्रीटचा बनवलेला दिसला. त्यामुळे अपेक्षेपेक्षा खूपच सुखकर प्रवास झाला. 'भगवान महावीर' अभयारण्यातुन जाणारा हा मस्त वळणदार घाट आहे. अवजड वाहतूक बऱ्यापैकी होती पण आंबा व कुंभार्ली घाटातील खड्डेरस्त्यांना कंटाळलेल्या बुलेटसाठी हा रस्ता एकदम मख्खन होता. एका मोठ्या वळणावर 'श्री दुधसागर आजोबा मंदिर' आले. थांबून दर्शन घेतले आशीर्वाद घेउन पुढे निघालो. 



घाटमाथ्यावर पोचलो तसे अनमोड चेकपोस्ट आले. कर्नाटकात प्रवेश झाला होता आणि तेथील पोलिसांकडुन कडक तपासणी सुरु होती. माझ्याजवळ येउन, गाडीचा नंबर पाहुन माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने 'ड्रिंक्सं यंड्रा' अशी काहीतरी त्याने कन्नड पृच्छा केली. ड्रिंक्स शब्दावरून "मद्याच्या बाटल्या बॕगेत आहेत का" असा प्रश्न असावा असे समजून मी मराठीत नाही नाही म्हटले व माझे शिरस्त्राण काढले. माझा सालस, निरागस चेहरा पाहताक्षणी त्याने सुहास्यवदनाने पुढे जाण्यास सांगितले. . .  योगायोग म्हणजे तो दिवस ३० जानेवारी होता. 

दांडेलीला जिथं राहणार होतो तिथल्या मॕनेजरने सुचवल्याप्रमाणे मेनरोडने सरळ रामनगरला न जाता कॕसलरॉक मार्गे आडरस्त्याने निघालो. अरुंद पण उत्तम रोड. रहदारी जवळपास शून्य. थोडा एकलकोंडा पण अफलातुन रस्ता होता. दोन्ही बाजुला घनदाट झाडी व जंगलाला कापत जाणारा रस्ता. अविस्मरणीय अशी राईड झाली. जगलबेट नावाच्या गावी मुख्य रस्त्यावर बाहेर आलो व थोड्याच वेळात दांडेलीला माझ्या रिसॉर्टला पोचलो. एक छोटेखानी रिसॉर्ट, गर्द झाडीत लपलेल्या टुमदार कॉटेज, उत्तम स्वागत व रुचकर जेवण. . . एकदम भारी वाटले. थकवा निघून गेला. मस्तपैकी जेवलो आणि झोपेच्या आधीन झालो.


संध्याकाळी रिसॉर्ट मधील हर्बल चहा पिऊन बुलेट चालू केली. रिसॉर्ट मालकाचा मधमाशी प्रकल्प पाहायला गेलो. तिथल्या स्वयंसेवकांनी छान माहिती दिली. जगभरात मधामाश्यामार्फत सततच्या होणाऱ्या परागीभवन क्रियेचे मानवी जीवनातील महत्त्व ऐकून चक्रावून गेलो. अर्धा किलो मध जमवायला एका माशीला साधारणपणे ८०००० किमीचे अंतर (म्हणजेच पृथ्वीला २ प्रदक्षिणा) कापावे लागते हे ऐकून अचंबित होत बुलेट चालू केली. या ट्रिपचा मुख्य उद्देश बुलेट राईड व जमेल तेवढेच साईटसीईंग असल्याने दांडेलीमधील इतर ठिकाणांकडे पाठ वळवली. तसेही याआधीच्या कारट्रीपमध्ये दांडेली बऱ्यापैकी फिरून झाले होते. रिसॉर्टला परतलो व तिथली प्रॉपर्टी व्यवस्थित फिरून पहिली. विविध वृक्षवेली, फुलझाडे, अनेकविध पक्षी व फुलपाखरे पाहण्यात संध्याकाळ सरून रात्र सुरू झाली. हवेत मस्त गारठा होता आणि थोड्याच वेळात कॅम्पफायर चालू झाली. जेवणे आटोपून कॉटेजच्या गॅलरीत बसलो. रात्रीच्या निरव शांततेचा आनंद घेताना डोळ्यात झोप शिरली आणि मी अंथरुणात शिरलो. 

 



सकाळी फ्रेश होऊन रिसॉर्ट मालकाबरोबर बाजूच्या जंगलात एक छोटा ट्रेक करून आलो व नाश्ता केला. बुलेटला सलाम ठोकून बॅगा चढवल्या आणि बुलेट चालू केली. सकाळच्या गारठ्यात गाडीला थोडा वेळ तापवल्यावर रिसॉर्टला टाटा करून कारवार कडे निघालो. 

 


जोयडा गाव पार करून अंशी नॅशनल पार्कच्या दिशेने कूच केली. सुंदर रस्ता आणि साथीला बुलेट. रायडिंगचा निखळ आनंद घेत प्रवास उत्तम सुरू होता. Happiness Is Not In The Destination But In The Journey या वाक्प्रचाराचा पुरेपूर अनुभव येत होता. काल अनमोड घाटाने सह्याद्री चढून वरती आलो तसाच आज अंशी घाटाने कारवारला उतरणार होतो. घाट सुरू झाला आणि दिल खुश हो गया. मस्त बांधलेला काँक्रिटच्या घाटातून बुलेट चालवणे म्हणजे एक भारी अनुभव होता. यथावकाश कारवारला पोचलो. जेवण करून सदाशिवगड गाठला व गडावरील हॉटेलमध्ये डेरा टाकला. कसला भारी अफलातून नजारा होता हॉटेल रूममधून. पैसा वसूल हॉटेल आहे. जरूर जा. संध्याकाळी कारवार शहरात बुलेटने फिरलो. जेवण करून हॉटेलवर आलो. हॉटेल उंचावर असल्याने खालील खाडी, त्यावरील मोठ्ठा पुल जबरदस्त दिसत होता. आकाशदर्शन सुध्दा चांगले झाले. 

 




सकाळी पुन्हा कारवार शहरात शिरलो. तिथले भव्य मासळी मार्केट पाहिले. नंतर वॉरशिप म्युझियम व टागोर बीच पाहून गोव्याकडे कूच केले. वाटेत माजली बीच पहिला. एक शांत सुंदर किनारा व समुद्रात उभ्या असलेल्या रंगीबिरंगी होड्या. हा नजारा कायमचा लक्षात राहील. 


जसजसा गोव्यात शिरू लागलो तसे ट्रॅफिक वाढू लागले. काणकोण पर्यंत ठीक होते पण पुढे मडगाव पार करेपर्यंत अगदीच कंटाळा आला. २-३ वाजता कांडोलिमला पोचलो आणि बीचवरील झोपडीत जाऊन विसावलो. आजच्या राईडमध्ये सगळेच अनुभव आले. सकाळी कारवार, माजली आणि गालजिबागचे सुंदर बीच, कारवार ते गोव्याचा सुसाट रस्ता, मडगावचे ट्रॅफिक आणि दुपारचे कडक ऊन. 






सकाळी आरामात उठून बुलेटला स्टार्टर मारून रत्नागिरीला निघालो. आज राईडचा शेवटचा दिवस. एकीकडे घरी जायची ओढ पण त्याचवेळी ही अविस्मरणीय राईड संपणार याचे दुखःही होते. पेडणे, पत्रादेवी मागे टाकून आपल्या महाराष्ट्रात प्रवेश केला. झाराप कुडाळ कणकवली तलेरे सुसाट पार करताना मस्त मजा येत होती पण त्याचवेळेस या रस्त्यावरील दोन्ही बाजूला असलेली गर्द झाडी नष्ट झाल्याने मन खिन्न झाले होते. नाईलाज को क्या इलाज. . .असो. . आज माझ्या बुलेटचे १०००० की.मी. पूर्ण झाले.


आपल्या रत्नागिरीत प्रवेश केला आणि खड्डेमय रस्त्याने केलेल्या स्वागताने गहिवरून आले. गेले ४ दिवस छान छान रस्त्यावर राईड करतानाची डोक्यात गेलेली नशा खाडकन उतरली. हे सर्व अनुभव घेता घेता डोक्यात मात्र पुढील राईड कुठे करायची याची चक्र चालू झाली होती. यथावकाश घरी पोचलो आणि बुलेटचे मनोमन आभार मानून तिला नमस्कार केला.

सलग पाच दिवस केलेल्या या पहिल्या राईडने मला आत्मविश्वास तर दिलाच तसेच भविष्यात केलेल्या याहीपेक्षा मोठ्या राईडचा पायाही याच राईडमध्ये रचला गेला. संपूर्ण राईडमध्ये माझ्या पत्नीने बुलेटवर माझ्या पाठी बसून मला नेहमी प्रोत्साहन दिले त्याबद्दल तिचे आभार मानावे तेवढे कमीच.

कोणतीही कटकट न करता बुलेट ने दिलेली उत्तम साथ, गोवा कर्नाटक मधील उत्तम रस्ते, महाराष्ट्रातील रस्त्यावर मिळालेला ऑफरोड सराव आणि राईड करताना आपण स्वतः व आपली लाडकी बुलेट यामधील द्वैतभाव सरून अद्वैत झाल्याची अनुभूती ही माझ्या मते मला मिळालेली सर्वात मोठी बक्षीसी आहे. धन्यवाद


राहुल