Saturday, 1 June 2024

ट्रेक - तारसर मारसर

चैतालीची KGL (काश्मीर ग्रेट लेक्स) ट्रेक करायची मनापासून इच्छा होती व त्याप्रमाणे तिने बुकिंग केले. मला यावेळी एवढा कठीण ट्रेक करायचा नव्हता. काश्मीर मधील ट्रेकच्या उर्वरित पर्यायापैकी बोडपाथरी ट्रेकचे मी बुकिंग केले. पण तिथेही गडबड झाली. पुरेशी बुकिंग न मिळाल्याने बोडपाथरी बॅच रद्द झाली व सरतेशेवटी तारसर मारसर ट्रेकला जायचे निश्चित झाले. KGL खूप लोकप्रिय होण्याआधी तारसर मारसर हा काश्मीर मधील सर्वात चांगला ट्रेक मानला जायचा. 

लडाखमधील उमलिंग घाटात बाईक राईड करण्याचे माझे स्वप्न पूर्ण करून मी श्रीनगरला पोचलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी चैताली अमरनाथ ट्रेक करून मला श्रीनगरला जॉईन झाली. पुढील २ दिवस आराम करून आम्ही आपापल्या ट्रेकला जॉईन झालो.

दिवस १

श्रीनगर मधील TRC या ठिकाणाहून मिनीबसने अरू नावाच्या गावी रवाना झालो. अरु हा आमचा बेसकँप असणार होता. पहलगामच्या १२ किमी पुढे डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या अरु गावी पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. चहापकोडे खाता खाता सर्व सहभागी ट्रेक्कर्सची ओळख परेड झाली. देशाच्या विविध भागातून आलेले आम्ही १७ जण होतो. नंतर गावातून एक चक्कर टाकली. एक शांत सुंदर गाव. काही दुकाने, तुरळक घरे व भरपूरसे होमस्टे. काही ठिकाणी जमिनीच्या छोट्या तुकड्यांवर मक्याची शेती लावलेली आढळली. संध्याकाळ पासून पावसाची रिपरिप सुरू होती आणि रात्री ती चांगलीच वाढली. ट्रेकच्या पहिल्याच दिवसापासून पाऊस मिळतोय की काय या काळजीत मी गाढ झोपी गेलो. १-२ दिवसांच्या ट्रेक वेळी भरपूर पाऊस असेल तर मला खूप आवडते पण हिमालयामधील ५-६ दिवसांच्या ट्रेक वेळी येणारा पाऊस मात्र कटकट्या वाटतो. 
 


 

दिवस २
पाऊस रात्रभर पडत होता. सकाळीही रिपरिप सुरू होती. चहा नाश्ता करून आमचा ट्रेक सुरु झाला. पहिल्या पावला पासूनच रेनकोट घालावा लागला. चिखलभरल्या निसरड्या वाटेवरून चढाई चालू केली व थोड्याच अंतरावर गर्द झाडी सुरू झाली. झाडीतून चालताना छान वाटत होते. शूज चिखलाने लडबडले असल्याने सावधपणे पावले टाकत साधारण तासाभराने एका जरा उंच ठिकाणी आम्ही पोचलो आणि समोर बघतो तर निव्वळ स्वर्ग होता स्वर्ग. गर्द झाडीने भरलेल्या डोंगरांची रांग, पायथ्याशी खळाळती लिद्दर नदी, डोंगरमाथा व पायथ्याला धुक्याचे ढग, निळे काळे आकाश आणि अत्यंत मंद पडणारा पाऊस. विश्रांतीचा पाहिला टप्पा होता आणि समोरचे सौंदर्य न्याहाळताना सर्वच निःशब्द झाले. 
 
 

 
 
आणखी तासभर चालून एका धाब्यावर चहाला थांबलो. पाऊस सुरूच होता. गरमा गरम कहावाची मजा घेत धाबा मालकाशी गप्पा सुरू होत्या. साधारण जुलै ते ऑक्टोबर असा काही महिनेच हा ट्रेक असतो म्हणजे फक्त या काळातच इथे माणसे, घोडे चालू शकतात. आजूबाजूच्या गावातील लोकं तात्पुरती झोपडी उभारून असे धाबे चालवतात. 
 


 
पावासाचा जोर कमी झाला तसे लगेच पुढील पायपिट चालू केली. आज १२ किमी चालून लिदरवत या ठिकाणी डेरा पडणार होता. वाट चढउतारांची होती पण खूप कठीण नव्हती. लिद्दर नदी सतत डाव्या बाजूने वाहत होती. घोड्यांच्या रहदारी मुळे चिखलमय झालेल्या वाटेवरून चालणे आव्हानात्मक झाले होते. थोड्याच वेळात एका नितांत सुंदर ठिकाणी जेवणाची सुट्टी झाली. पाऊसही थांबला होता. मऊशार हिरव्यागार कुरणावर बसकण मारून आम्ही उदरभरण चालू केले. अगदी बाजूनेच नदीचा घोंघवणारा प्रवाह जात होता. आम्ही एका दरीत होतो व दोन्ही बाजूला दाट वृक्षराई होती. जेवणापेक्षा नदीचे रुप पाहण्यातच अधिक वेळ गेला.
 
 

 
खरंतर कॅम्पसाठी अत्यंत योग्य जागा होती पण आमचा कॅम्प यायला अजून अवकाश होता. अजून अर्धा तास चालल्यावर लांबून आमचे लालचुटुक टेन्ट दिसू लागले. आपापल्या तंबूत सामान टाकून आजूबाजूचे निसर्गसौंदर्य न्याहाळत आमच्या गप्पा सुरू होत्या. माझ्या टेन्टमेटचा आज वाढदिवस असल्याने केक, गाणी, धमाल झाली. 
 


 

दिवस ३
सकाळचे सोपस्कार आटोपून लिदरवत कॅम्पला टाटा करून पुढील कँपची वाट धरली. सकाळी एक गंमत झाली. जाग आली तीच मेंढ्यांच्या आवाजाने. तंबुंच्या सर्व दिशांना एका मोठ्या कळपातल्या मेढ्यानचा बे बे आवाज करीत मुक्त संचार सुरू होता. एक चुकलेले पिल्लू आमच्या तंबुसमोर येऊन आत डोकावत होते पण आमचे अनोळखी चेहरे पाहून बहुतेक ते निघून गेले. असे मोठमोठाले कळप या कालावधीत इथे भरपूर दिसतात. डोंगरचढाई वरील उंचीवरील गवत चारा अधिक पौष्टिक असल्याने हे कळप सपाट प्रदेशातून उंचीवर घेऊन जातात. एकेका कळपात पाचशे हजार तरी मेंढ्या असाव्यात. शेकडोंच्या संख्येने जाणाऱ्या मेंढ्या आणि त्यांना हाकलणारे बकरवाल हे सर्वत्र दिसणारे दृश्य असते. प्रत्येक कळपाचे वेगळेपण राखण्यासाठी कळपातील प्रत्येक मेंढीवर रंगवलेली एखादी विशिष्ठ खूण जसे की एखादे इंग्रजी अक्षर किंवा वर्तुळ, त्रिकोण चिन्ह केलेले असते. 
 


 
आजचा पहिलाच टप्पा चढाईचा होता. पाऊस कमी प्रमाणात येऊन जाऊन होता. कालचा पूर्ण दिवस आणि आजचा दिवस सुरू होऊनही आम्हाला सूर्यदर्शन झाले नव्हते ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. तास दोन तास चालल्यावर एके ठिकाणी घोडेवाल्याना वाट देण्यासाठी आम्ही कडेला थांबलो आणि त्याचवेळी सूर्यदेव ढगाआडून प्रकट झाले. सर्वांनी जल्लोष केला आणि पायपिट चालू ठेवली. आजचे अंतर सात किमी होते पण पूर्ण चढाई असल्याने वेग कमी होता व छोटे ब्रेक जास्त होते. अश्या वेळीच ग्रुप मधील बाकी मेंबर्सशी गप्पा होऊन आपण सोशल होतो. बहुतेक नवखे ट्रेकर होते तर काही जणांना हिमालय ट्रेकचा अनुभव होता. आमच्या ट्रेक कंपनीचे तीन लीडर्स मागे पुढे व मध्ये होते तर फारुखभाई हा मुख्य स्थानिक वाटाड्या होता. फारुखभाई खूप बोलका होता आणि आम्हाला स्थानिक प्रदेशाची वैशिष्ट्ये, घोडे आणि घोडेवाल्यांचे किस्से, काश्मीरातील निवळलेली स्थिती, पर्यटक व ट्रेकर्सची वाढलेली संख्या आणि यामुळे एकूणच सुधारत असलेली आर्थिक स्थिती याबाबत माहिती देत होता. 
 


 

जसजसे आम्ही चढत चढत वरती जात होतो तसे उंच झाडांची संख्या लक्षणीय कमी झाली. हिरव्यागार कुरणांचे पट्टे कमी होऊन खडकाळ भाग वाढला होता. नदीची साथ मात्र कायम होती. आता आम्ही ३५०० मीटर्स उंचीवर पोहोचत होतो. आजूबाजूला असणाऱ्या छोट्या गवताळ पट्ट्यात या मौसमात फुलणारी विविधरंगी नाजूक फुले दिसू लागली. थोड्याच वेळात आम्ही शेखवास कॅम्पला पोचलो. तंबू उभे राहिले होते आणि थोड्याच वेळात गरमा गरम दाल मखनी, भात आणि भरपूर सॅलड देण्यात आले. आचारी मंडळी आमच्या नंतर तासाभराने लिदरवत कॅम्पहून निघून, आमच्या आधी पुढील कॅम्पला पोचून, किचन टेन्ट उभारून, जेवण बनवून आमची वाट पाहत होती. धन्य आहे त्यांची. स्थानिक नियमांनुसार काश्मीर ट्रेकमध्ये कायम स्वरुपी टेन्ट उभारण्यास मनाई असल्याने आमच्या २७ जणांचा (१७ ट्रेकर्स, ४ गाईड, २ आचारी आणि ६ घोडेवाले) पूर्ण संसार रोज उभारून, दुसऱ्या दिवशी मोडून, सर्व सामान खेचरांवर लादून पुढील कॅम्पला नेले जायचे. १४ खेचरे आणि त्यांचे ६ मालक यांच्या शिरावर आमच्या पूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी होती. पुढील मुक्कामी खेचरे जाऊ शकतील का याची खात्री केली जायची व खेचर मालकांचा निर्णय अंतिम असायचा. खूप बर्फाळ किंवा निसरडी वाट असेल तर एक वेळ ट्रेकर्स चालू शकतात पण सामानवाहू खेचरे घसरण्याची भीती असते. त्यात या ट्रेकला जाणारी या हंगामातील आमची पहिलीच तुकडी होती त्यामुळे पुढील मार्गक्रमणा सांभाळूनच करायची होती. 
कॅम्पला लवकर पोचून, जेवणे आवरून बहुतेकजण तंबूत शिरून झोपायच्या बेतात होते तोच मुख्य गाईडने सर्वांना तंबुबाहेर हाकलले. पहिली गोष्ट म्हणजे जेवण झाल्यावर लगेच झोपू नये, दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेकला आल्यावर शक्यतो फक्त रात्रीच लवकर झोपावे. इतर वेळ निसर्गाचा आनंद घ्यावा, कॅम्पच्या आजूबाजूला फिरावे ज्यामुळे शरीराला वातावरणातील कमी प्राणवायूशी जुळवून घेता येते. मी एकटा थोड्या दूरवर असलेल्या नदीकिनारी गेलो आणि तिथल्या एका विशाल शिळेवर पाय पसरून बसलो. स्वच्छ सूर्यप्रकाश, समोरच दिसणारे त्या भागातील सर्वात उंच असे कोलाहोई शिखर, नदीची एका लयीतील संथ खळखळ आणि मध्येच होणारा पक्ष्यांचा किलबिलाट या सर्वांचा संयोग अत्यंत शांततेत अनुभवला. थोड्याच वेळात चहाची शिट्टी वाजली. चहा नंतर सर्वजण बाजूच्या छोट्या टेकडीवर acclimatise walk साठी जाऊन आलो. पुढील २ दिवस आम्हाला अधिक उंची गाठायची असल्याने गाईड आमच्याकडून आवश्यक ती तयारी करून घेत होते. 
 


 

दिवस ४
दिवसाची सुरुवात अत्यंत छान सूर्यप्रकाशाने झाली आणि सर्वजण झटपट ट्रेकसाठी सज्ज झाले. मधल्या वेळात मी पुन्हा एकवार नदीकिनारच्या रम्य ठिकाणी जाऊन त्या शिळेला बाय बाय करून आलो. ट्रेक करतानाचे हेच ते खास क्षण असतात जे तुम्हाला घरी गेल्यावर आठवतात. कुठल्याही ट्रेकचे अंतिम ठिकाण गाठण्यापेक्षाही तिथपर्यंतच्या प्रवासात मनाला आनंद देणारे असे क्षण हेच सगळ्यात भारी असतात हा माझा वैयक्तिक अनुभव. 
आजचा मुक्काम तारसर किनारी होता (तार नावाचे तळे. काश्मीर मध्ये तळ्याला सर म्हणतात तर लडाख मध्ये त्सो म्हणतात). आमच्या ट्रेकचे पहिले मुख्य आकर्षण पाहण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. ट्रेकमार्ग साधारणपणे कालच्यासारखाच होता. वाट अधिक खडकाळ झाली होती. एके ठिकाणी दगडांवर पाय देत, कसरत करीत, नदीचे पात्र पार केले.
 

 
चालत, थांबत, मध्येच कहावा किंवा बटर चहाचा आस्वाद घेत पाच सहा तासांनी तारसार किनारी उभारलेल्या आमच्या कॅम्पला पोचलो. समोर अथांग पसरलेले तार तळे जवळून पाहण्यासाठी सर्वांनी बॅगा टाकून तळ्याकडे धाव घेतली. चंद्रकोरीच्या आकाराचे हे तळे दोन बाजूंनी डोंगरांनी वेढलेे आहे आणि तळ्याच्या शांत स्तब्ध निश्चल पाण्यात त्या डोंगरांचे प्रतिबिंब मनोहारी दिसत होते. 
 
 


 
संध्याकाळी acclimitise वॉकसाठी एका डोंगरावर चढलो. चढाई चांगलीच होती. याच मार्गावरून आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचे होते. त्याची पाहणी करण्यासाठी दोन घोडेवाले खूप वरपर्यंत डोंगरमाथ्यावर जाऊन पलीकडील वाटेवर बर्फ नाही ना हे पाहून आले. सिझनची आमची पहिलीच बॅच असल्याने ही पाहणी करणे क्रमप्राप्त होते. दमछाक करणारी ही सराव फेरी करून आम्ही कॅम्पला परतलो. जेवणे झाली आणि लिडरने झोपी जायचा आदेश दिला कारण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं होते. पण भविष्यात काही वेगळेच लिहिले होते. 
 


 
रात्री साडे नऊला सर्व झोपी जातो न जातो तोच बाहेर ढगांचा प्रचंड गडगडाट सुरू झाला. जागे होऊन बघतो तर विजांचा लखलखाट दिसला. आमच्या लाल रंगाच्या तंबूमुळे विजा आम्हाला लालबुंद रंगाच्या दिसत होत्या. सुरुवातीला भारी वाटले पण लगेचच वादळी पाऊसवारा सुरू झाला आणि आम्ही हादरलो. आमचे तंबू अक्षरशः गदागदा हलत होते. उडून जातायत की काय अशी भीती वाटू लागली. प्रचंड विजा, गडगडाट, सोसाट्याचा वारा आणि झोडपणारा पाऊस. . . सर्वांची पाचावर धारण बसली. निसर्गाचे एवढे विक्राळ रूप आयुष्यात प्रथम पाहत होतो. तेवढ्यात लक्षात आले की तंबूत पाणी शिरले आहे. स्लीपिंग बॅग्स पाण्यात बुडू लागल्या. थंडी एवढी भयंकर होती की आम्ही स्लीपिंग बॅग्सच्या बाहेर किंवा तंबूबाहेर यायचा प्रश्नच नव्हता. इतक्यात आमचा स्थानिक वाटाड्या फारुखभाई एखाद्या देवदुतासारखा धावून आला. तंबूत शिरलेले पाणी त्याने बाहेर काढले. आणखी पाणी शिरू नये यासाठी तंबूच्या बाहेर मातीचे बांध बनवले. इतर दोन तंबूमध्येही त्याने अशीच मदत केली. फारुखभाई केवळ वाटाड्या न राहता आमचा तारणहार बनला. या गोंधळात दोन तास गेले आणि पाऊस, विजा, वारा पूर्णपणे थांबल्याचे ध्यानात आले. आमची झोप उडाली होती म्हणून आम्ही जॅकेटचे तीन थर चढवून तंबूबाहेर आलो. बाहेर तुफान थंड होते. आजूबाजूला नजर टाकली मात्र आपण स्वर्गात तर उभे नाही ना असा भास झाला. पूर्ण परिसरावर नुकत्याच पडलेल्या छोट्या गारांचा गालिचा पसरला होता, वरती आकाशाकडे पाहतो तर हजारो चांदण्या लुकलुकत आमच्या पाहून जणू हसत होत्या. तार तळ्यावर चांदणे पडल्याने पाणी सुंदर चमकत होते. तासाभरापूर्वी निसर्गाने केलेल्या तांडवाचा कुठे मागमूसही नव्हता. आयुष्यभराची ही आठवण मनात कोरून ठेवून निसर्गाच्या या चमत्काराला नमन करून आम्ही तंबूत शिरलो व झोपायचा प्रयत्न केला.
 

दिवस ५
आजचा दिवस उशिराच सुरू झाला. रात्रीच्या वादळामुळे पुढील वाटचाल रद्द झाली. सूर्यदेव सकाळी लवकर उठून लख्ख प्रकाश देत होते. नाश्ता पाणी झाले आणि गाईडने मारसर टॉपला जायचे निश्चित केले. पुढील कॅम्पला जाऊ शकत नसल्याने आम्ही एक उंच डोंगर चढून दूरवरून मारसार तलाव पहाणार होतो. चढाई तशी कठीण होती त्यामुळे पॅकलंच घेऊनच निघालो. आधी मोठा खडकाळ पट्टा नंतर चढाईची अरुंद पायवाट आणि शेवटी थोडे बर्फातून चालणे हे सर्व व्याप आटोपून पर्वत शिखरावर पोचलो. मध्ये मोठी दरी आणि त्या पलीकडे मारसर तलावाचा काही भाग दिसत होता. उजव्या हाताला तार आणि डाव्या हाताला मार तलाव सुंदर दिसत होते. आम्ही साधारण ३८०० मीटर्स उंचीवर होतो. दुपारचे दोन वाजले होते. प्रखर उन आणि तेवढाच कडक गारठा होता. हवेच्या एका छोट्या झुळुकेने हुडहुडी भारत होती. गाईडने ठरवले की थोडे खाली उतरून सावलीमध्ये जेवण करू. जेवणे आवरून कॅम्पला पोचायला संध्याकाळ झाली. चहापान झाल्यावर भरपूर ग्रुपगेम्स खेळलो. 
 





 

दिवस ६ आणि ७
आज परतीचा प्रवास सुरू झाला. कॅम्प सोडण्यापूर्वी तार तलावाकाठी काही वेळ बसून तलावाचा निळा रंग आणि त्यात पडलेले डोंगरांचे प्रतिबिंब डोळ्यात साठवून घेतले. आता उताराची वाट असल्याने परतीचा प्रवास वेगात चालू होता. येताना जी वाट आम्ही ३ दिवसात चढून आलो तीच वाट २ दिवसात उतरणार होतो. उतरताना वाटेत शेखवास कँपचे ठिकाण पार केले. ट्रेकचा पहिलाच कॅम्प लीडरवट येथे लंच ब्रेक झाला आणि थोडे पुढे जाऊन कॅम्पिंग केले. संध्याकाळी खूप गप्पा धमाल केली. प्रशस्तीपत्रके वाटण्यात आली. 
 


 
सातव्या म्हणजेच ट्रेकच्या शेवटच्या दिवशी खूप सारी गाणी म्हणत अरु गावातील बेसकॅम्पला कधी पोचलो कळलेच नाही. गाडी आमची वाटच पहात होती. संध्याकाळी श्रीनगरला पोचलो आणि ट्रेकची सांगता झाली.

हा ट्रेक खूप कठीण नव्हता आणि सृष्टीसौंदर्याने भरलेला होता. काश्मीर मधील दऱ्याची खास सुंदरता, लीडरवट नदीची सततची साथ, निळाशार तार तलाव आणि निसर्गाने एका रात्री दाखवलेलं रौद्र भयावह रूप चिरकाल स्मरणात राहील.

Wednesday, 3 April 2024

सायकल ट्रीप - जैसलमेर

 

जानेवारी २०२३ मध्ये युथ हॉस्टेलची उत्तराखंड मधील कॉर्बेट सायकल ट्रीप केल्यानंतर आमचा आत्मविश्वास आणि उत्साह दोन्ही दुणावले होते. त्याचवेळी ठरविले होते की संधी मिळाली कि जैसलमेर सायकलिंग ट्रीप करायची. डिसेंबर २०२३ च्या पहिल्याच बॅचचे बुकिंग केले आणि तयारीला लागलो. राजस्थानातील मेवाड प्रांत काही वर्षापूर्वी फिरून झाला होता. या सायकल ट्रीपला जोडून मारवाड फिरायचे नक्की केले आणि बेत आखला.

दिवस 0

मारवाड मधील बिकानेर, मंडावा, जोधपूर, कुंभलगड येथील स्थलदर्शन आटोपून जैसलमेरला पोचलो व युथ हॉस्टेलच्या कॅम्पमध्ये दाखल झालो. मुख्य शहरापासून ४-५ किमी अंतरावर एका विशाल मैदानावर हा कॅम्प स्थित आहे. इथेच होमगार्ड कँपही असल्याने एकूण व्यवस्था आणि सुरक्षा चोख होती. संध्याकाळी आम्हाला सायकल वाटल्या गेल्या आणि त्यावरून १० किमीची एक सराव फेरी झाली. आमचा १२ जणांचा ग्रुप होता आणि त्यात हरयाणापासून तामिळनाडू पर्यंत विविध राज्यातून आलेले सायकलस्वार होते. रात्री जेवणानंतर सर्वांशी ओळख, गप्पाटप्पा झाल्या. जैसलमेर हा भारतीय हवाईदलाचा मोठा तळ असल्याने दिवसभर विमानांचा जोरदार सराव सुरू होता. त्यायोगे आम्हाला विविध फायटर विमाने पाहता आली.


दिवस १

चहानाश्ता, पॅकलंच हे नेहमीचे सोपस्कार आटोपून आम्ही तयार झालो. एक छोटेखानी उद्घाटन समारंभ झाला व आमची राईड ९.३० ला सुरू झाली. युथ हॉस्टेलची आम्हाला आवडणारी बाब म्हणजे फक्त सायकलिंग एके सायकलिंग असे न करता राईडदरम्यान स्थलदर्शन असते. त्यामुळे प्रसिद्ध अशी ठिकाणे पहाता येतातच आणि त्याबरोबर मधेमधे ब्रेक मिळाल्याने विश्रांती मिळते. आजचे पाहिले ठिकाण होते 'अमरसागर जैन मंदिर'. या ४०० वर्षे जुन्या मंदिरात संगमरवरातील खूप छान कोरीव काम पाहताना माउंट अबू जवळील दिलवारा मंदिर आठवले. पुढील ठिकाण होते 'कुलधरा गाव'. रस्ते तसे चांगले होते, छोटे चढ उतार होते. सायकलवरही आता चांगले हातपाय बसले होते. कुलधरा गावी पोचून प्रवेश तिकीट काढून गाव पहायला निघालो. १५० वर्षापूर्वी स्थानिक जमिनदाराच्या छळाला कंटाळून ८४ विविध गावातील लोकं एका रात्रीत गाव सोडून गेली. ती कुठे गेली याचा नंतर काहीच पत्ता लागला नाही. तेव्हापासून इथली घरे पडझड अवस्थेत आहेत. काही घरांना शाबुत ठेवून पर्यटनासाठी उपयोग केला जातो. शापित गाव असा शिक्का बसल्याने आता तेथे कोणीच वस्ती करीत नाही. कुलधरा पाहून पुढे निघालो. 




सूर्यदेव आता चांगलेच वरती आले होते आणि पोटातही कावळे ओरडत होते. थोड्याच वेळात आम्ही दसेरीताल नावाच्या तळ्याकाठी जेवायला थांबलो. तळे तसे खूप मोठे नव्हते पण काठावर झाडे झुडुपे होती आणि त्यामुळे सावलीही होती. शिदोऱ्या सोडल्या आणि पॅकलंचचा आस्वाद घेतला. जैसलमेरपासून पुढील थर वाळवंटपर्यंतचा प्रदेश तसा ओकाबोकाच आहे. झाडे, नद्या, तळी जवळपास नाहीतच. त्यात हे असे तळे असणे ही भाग्याची बाब होती. आजूबाजूच्या लोकांना या तळ्याचे खूप महत्त्व आहे आणि त्याप्रमाणे तेथे घाण कचरा न करण्याचे नियमही आहेत. हे तळे तेथील माणसांची, गाईगुरांची, पक्षीप्राण्यांची तहान गेली अनेक शतके भागवीत असल्याने हे तळे एक श्रध्दास्थान बनले आहे. जेवण करून, थोडी विश्रांती घेऊन राईड चालू केली. या भागात रात्री थंडी असली तरी दिवसा मात्र चांगलेच तापते त्यामुळे लवकर दमछाक होते. जिम कॉर्बेट राईडवेळी दिवसभर गारठा असल्याने राईड करताना एवढे दमायला झाले नव्हते.


पुढचे ठिकाण होते खाबा किल्ला. रस्ता चढउतारांचा, उन्हात दमवणुक करणारा होता. खाबा हा १३ व्या शतकातील एक छोटा किल्ला आहे. आत बघण्यासारखे तसे खास काही नाही. कुलधाराप्रमाणे या ठिकाणची लोकंही एका रात्रीत गाव सोडून गेली अशी समज आहे. इथून पुढे सम गावाकडे निघालो जिथे आमचा आजचा कॅम्प होता. समच्या पुढे थर वाळवंट सुरू होते. रस्त्याच्या आजूबाजूला वालुकामय सपाट प्रदेश, छोटी खुरटी झाडे, अत्यंत तुरळक लोकवस्ती असे सततचे दृश्य होते. हायवेवर पोचलो तशी वाहनांची वर्दळ सुरू झाली. जैसलमेरला येणारा जवळपास प्रत्येक पर्यटक सम गावी येऊन वाळवंट सफारी करतोच करतो. 


 ४ वाजता कॅम्पला पोचलो. टेन्ट उभे राहिले होते आणि रात्रीचे जेवण बनवणेही चालू झाले होते कारण इथे वीजपुरवठा नव्हता. चहापाणी करून आम्ही पटापट वाळवंटातील जीपसफारीला निघालो. वाळूच्या चढउतारावर जीपसफारीचा रोमांच पुरेपूर अनुभवला. वाळवंटातील क्षितिजावर शांतपणे अस्ताला जाणारा सूर्य व त्याच्या विविध छटा पाहत एक अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवली. काळोख वाढू लागला तसे कॅम्पला परतलो व हेडटॉर्चच्या उजेडात जेवणे आटोपून झोपी गेलो.



 


दिवस २

आज जवळपास ७० किमी सायकलिंग करून रामगढला पोचायचे होते. स्थलदर्शन असे काही नव्हते. वाटेत छोटे ब्रेक घेत दुपारनंतर कॅम्पला पोचलो. दमायला झाले. आजचा कॅम्प एका शाळेत होता त्यामुळे सुविधा बऱ्या होत्या. स्वच्छता चांगली होती. 

या राईड प्रोग्रमला येण्याआधी एक समजूत होती की राजस्थानमध्ये सायकलिंग म्हणजे एकदम सहजसोपे असणार कारण मोठे घाट किंवा चढउतार इथे नाहीत. एका अर्थी हे बरोबर होते आणि रस्तेही चांगले व रुंद होते. पण इथले सर्व रस्ते वाळूच्या टेकड्यामधून बनलेले असल्याने सततचे चढउतार मात्र खूप होते. कारमधून किंवा बाईक वरून जाताना ते एवढे जाणवणार नाहीत पण सायकलिंग करताना चांगलीच दमछाक करतात. 

या पूर्ण सायकलिंग ट्रीपमध्ये आणखीन एक खास गोष्ट होती ती म्हणजे मारवाड भागातील खाद्यपदार्थ. रोज रात्रीचं जेवण म्हणजे एक खाद्यसोहळा असायचा. मारवाडी पद्धतीची भाकरी, भाजी आणि एखादा गोड पदार्थ हमखास असायचा. त्यात हे सर्व साजूक तुपात बनवलेलं, त्यामुळे एकूण चंगळ होती. आजचा मेनू होता केरसांगरी भाजी (केर म्हणजे एक प्रकारची बोरा एवढी छोटी फळे आणि सांगरी म्हणजे एक शेंगभाजीचा प्रकार), जोडीला बाजरीसोगरा म्हणजे बाजरीची भाकरी आणि गोड पदार्थ होता बाजरी चुर्मा (बाजरी कुस्करून त्यात गूळ व तूप घालून केलेला हलवा).

शाळेच्या पाठीमागे ३०० मीटर्स उंचीचा एक टीवी टॉवर होता ज्याचा उंचीबाबत संपूर्ण भारतात तिसरा नंबर लागतो. असं म्हणतात की १९९३ ला हा टॉवर कार्यान्वित होण्याआधी या भागातील लोकांना पाकिस्तान टीव्हीचे कार्यक्रम पहावे लागत. 



दिवस ३

सकाळी ९ वाजता सायकल हाकायला सुरुवात केली. आज जायचे होते तनोट या गावी. हा पूर्ण हायवे होता. वाटेत इंदिरा नहर (कालवा) पार केला. याचे आधीचे नाव राजस्थान कालवा असे आहे. पंजाब मधून सतलज आणि व्यास नदीच्या संगमातून सुरू होऊन हा कालवा थर वाळवंटापर्यंत पाणी पोचवतो.


मजल दरमजल करीत आमची सफर चालू होती. आता आजूबाजूला अस्सल वाळवंटी प्रदेश दिसू लागला. लांबवर पसरलेले वाळूचे पठार, मध्येच तुरळक वस्ती, त्यात एखादी नमुनेदार वाळवंटी झोपडी असे दृश्य होते. रस्त्याचा दर्जा चांगला पण चढ उतारही खूप होते. एके ठिकाणी धाब्यावर चहा पिऊन प्रसिद्ध घंटीयाली माता मंदिरात पोचलो व जेवण केले. हे मंदिर या भागातील मोठे श्रद्धास्थान आहे. अधिक वेळ न थांबता दुपारच्या उन्हाचे चटके खात आम्ही तनोत धर्मशाळेत पोचलो ३ वाजता पोचलो. राहायची व्यवस्था ठीकठाक होती. फ्रेश होऊन, चहा पिऊन लगेचच दुसऱ्या वाहनाने भारत पाक सीमेवरील बब्लीआन कडे निघालो. ट्रकच्या हौद्यात बसून केलेला हा प्रवास खास होता. या सीमेवर एक मोठी कमान बनवली आहे व पलीकडे लांबवर आपल्या हद्दीचे तारेचे कुंपण आहे. त्या पलीकडे अजून लांबवर पाक हद्दीतील इमारती दिसतात. हा संपूर्ण भाग वाळवंटी रखरखीत आहे. मनुष्यवस्ती नाही. 

 



तनोटला परतलो व प्रसिद्ध तनोटमाता मंदिरातील संध्याकाळच्या आरतीला हजेरी लावली. या मंदिराची सर्व व्यवस्था जसे की पूजा, आरती वगैरे BSF जवानांकडून केली जाते. हेच ते प्रसिद्ध मंदिर जेथे १९७१ च्या युद्धात पाककडून मोठ्या प्रमाणावर बॉम्ब वर्षाव होऊनही मंदिराचे नुकसान झाले नाही. हा प्रसंग बॉर्डर सिनेमात दाखविला आहे. मंदिराजवळ पडलेले पण न फुटलेले बॉम्बगोळे देवळांमध्ये ठेवले आहेत. या मंदिराची महती पाहून स्तिमित झालेल्या पाक सैन्याधिकारानी युद्ध संपल्यावर मंदिराला चांदीचे मुकुट भेट म्हणून दिले जे मंदिरात आपण पाहू शकतो. आरती, दर्शन करून सावकाशीने जेवण झाले. आजचा मेनू होता दाल बाटी व चूर्मा.



दिवस ४

रात्री प्रचंड थंडी होती त्यामुळे वाटले होते की सकाळी धुके असेल पण नशिबाने तसे काही नव्हते आणि आमची सफर वेळेत सुरू झाली. राईडची सुरुवात BSF अधिकाऱ्यांकडून झेंडे दाखवून झाली जी आमच्यासाठी एक अभिमानास्पद बाब होती. 

 


आज लोंगेवालामार्गे रामगडला पोचायचे होते. एकूण अंतर ८० किमी. लोंगेवालाचा रस्ता खूप चढउतारांचा होता ज्यामुळे दमछाक झाली. ४० किमी वर लोंगेवाला युद्धस्मारक आले. पर्यटकांची खूप वर्दळ होती. स्मारक परिसर मोठा आहे. आम्ही एक एक भाग पाहण्यास सुरुवात केली. १९७१ ला या ठिकाणी झालेल्या युद्धात भारताने पाकला धूळ चारली होती आणि एक अविश्वसनीय व ऐतिहासिक विजय मिळवला होता. बॉर्डर सिनेमा याच युद्धावर बेतला आहे. स्मारकामध्ये पाकिस्तान कडून हस्तगत केलेले रणगाडे, भारताची फायटर विमाने हे सर्व ठेवले आहे. एक लघुचित्रपटही पाहिला. हे स्मारक प्रत्येक भारतीयाने जाऊन अवश्य पहावे असे आहे. 




 

पुढे रामगडच्या दिशेने कूच चालू केली. चढउतारांची साखळी आमची परीक्षा पहात होती. खूप थकायला झाले होते आणि आम्ही कशीबशी सायकल रेटत होतो. वाटेत आम्ही एक मॅरॅथॉन स्पर्धा पाहिली. १५२ किमीची ही स्पर्धा लोंगेवाला येथे संपणार होती. एवढ्या तळपत्या उन्हात एवढे लांबचे अंतर धावणारे स्पर्धक पाहून आम्ही आमचे कष्ट थोड्या वेळाकरिता विसरलो. सूर्य मावळतीला जाऊ लागला तरी आम्ही सायकल रेटीतच होतो. प्रत्येक ट्रेक किंवा सायकलट्रीप मध्ये असा एक दिवस असतोच की तो तुमची परीक्षा, संयम, निग्रह पाहतो. अखेर ८२ किमी संपवून आम्ही रामगडच्या त्याच शाळेत पून्हा मुक्काम ठोकला. सर्वजण थकले होते व आरामाची नितांत गरज होती. काही जणांची तब्ब्येतही बिघडली होती. एकूणच आजचा दिवस कसोटी पहाणारा ठरला. उद्या जैसलमेरला पोचून ट्रीपची सांगता होणार होती त्यामुळे भरपूर गप्पा मारीत झोपायला जरा उशिरच झाला.

दिवस ५

सकाळी ताजेतवाने होऊन, चहानाश्ता करून धुक्यात राईड चालू केली. धुके आणि त्यात हायवे असल्याने वेग कमी ठेवला होता. चढउतार मात्र आमची पाठ सोडत नव्हते. पण अखेरचा दिवस असल्याने सर्वजण उत्साहात होते. ट्रेक आणि सायकल ट्रीप मध्ये अजून एक साम्य म्हणजे ते सुरू होइपर्यंत धीर धरवत नाही आणि शेवटचे एक दोन दिवस राहिले की कधी एकदा संपतो असे होते. 


 

आजचे अंतर ६८ किमी होते. स्थलदर्शन काहीच नव्हते. पहिल्या दिवसाप्रमाणेच आजचे जेवणही एका वेगळ्या तळ्याकाठी झाले. यथावकाश बेस कॅम्पला ३.३० वाजता पोचलो आणि सर्वांनी हुश्श केले. सर्वांनी ही ट्रीप यशस्वीरीत्या, कोणतेही संकट, अपघात, आजार न होता पूर्ण केली म्हणून एकमेकांचे अभिनंदन केले. जून २०२२ मध्ये आम्ही सायकल खरेदी केल्यावर सराव करून २०२३ मध्ये एकाच वर्षात जिम कॉर्बेट आणि जैसलमेर या युथ हॉटेलच्या दोन सायकल राईड पूर्ण केल्याचे समाधान लाभले. प्रशस्तीपत्र वितरणाचा एक छोटेखानी कार्यक्रम होऊन सर्वांनी एकमेकांना टाटा बाय बाय केले. युथ हॉस्टेलचे आमचे दोन्ही लीडर्स व इतर पदाधिकारी यांनी घेतलेल्या कष्टांबद्दल त्यांचे आभार मानून निरोप घेतला.