रामपूर बुशहर बसस्टॅन्ड वरून एका खाजगी बसने किन्नोर व्हॅलीच्या मुख्य ठिकाणी म्हणजेच 'रीकौंग पीओ' ला पोचलो. वाटेत किन्नोरचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध रॉक टनेल लागले. पुढे दुसऱ्या छोट्या बसने काल्पा नावाच्या सुंदर गावी एक रात्र राहिलो.
गावातील नारायण नागिणी मंदिर, काल्पा किल्ला आणि 'हू बु लान कार' नावाची मोनेस्ट्री पाहीली. सर्व वास्तू म्हणजे लाकडावरील उत्तम कलाकारीचा नमुना होत्या. होमस्टे खोलीच्या खिडकीतून दिसणारा पर्वत रांगेचा नजारा अविस्मरणीय होता.
देवळातील पुजाऱ्याने समोर पसरलेल्या किन्नोर कैलाश पर्वतरांकेतील खूप लांबवर दिसणारे प्रसिद्ध ऐशी फूट उंचीचे 'किन्नोर कैलाश' शिवलिंग दाखवले. भारतातील अतीकठीण ट्रेकपैकी हा एक आहे जिथे यात्रेकरू साधारणपणे ऑगस्ट महिन्यात जातात. होमस्टेच्या आजूबाजूला कच्च्या सफरचंदानी लगडलेल्या बागा होत्या. फळे तयार होण्यासाठी २ महिने वाट पहावी लागणार होती, पण मला पुढे काझाला जायचे असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळीच काल्पा चा निरोप घेतला 😄
दुसऱ्या दिवशी सकाळी रीकौंग पीओला येऊन बसने स्पीती व्हॅलीच्या मुख्य ठिकाणी काझाला निघालो. किनोरमधील वनाछादीत डोंगर आणि सफरचंदाच्या बागायती मागे पडून आता स्पीतीच्या वृक्षहीन, पर्णहीन टेकड्या दिसू लागल्या. काही वर्षांपूर्वी केलेला हंप्टा पास ट्रेक आठवला ज्यात आम्ही कुलूमधील हिरवेगार डोंगर पार करून, घाट ओलांडून स्पीती मधील उजाड प्रदेशात प्रवेश केला होता. एक घाट ओलांडला कि निसर्गात किती नाट्यमय बदल होतात याचं एक उत्तम उदाहरणं होते ते.
सतलज नदीच्या साथीने संथ प्रवास सुरु होता. वाटेतील छोट्या गावातील लोकं चढत उतरत होती आणि त्यातून स्थानिक भाषा, वेशभूषा समजत होत्या. एकूणच लोकं श्रद्धाळु आणि भाविक वाटली. वाटेतील एका निर्जन ठिकाणी छोट्या पण प्रसिद्ध देवळाजवळ बस थांबली आणि ड्राइवर, कंडक्टर, प्रवासी जाऊन देवीचे दर्शन घेऊन आले. येताना प्रसाद घेऊन आले आणि बस मधील लोकांना वाटला. बाहेर स्वच्छ ऊन होते पण बसमध्ये उकडत नव्हते. प्रवास तसा चांगलाच संथ सुरु होता. या मार्गांवर भरपूर बसेस धावत नसल्याने बस खूप ठिकाणी थांबून लोकांना चढत उतरवत होती. काही मुख्य गावातील स्टॅन्डवरही खूप वेळ थांबत होती. एकूण सर्व प्रदेश ओसाड खडकाळ दुर्गम व कमी लोकवस्तीचा होता. या बसेस म्हणजे त्यांच्यासाठी मोठा आधार असणार. खाब नावाचे ठिकाण आले जिथे तिबेट मधील राक्षसताल (मानसरोवरच्या बाजूला राक्षसताल आहे) मधून उगम पावणाऱ्या सतलज नदीला कुंझूम घाटात उगम पावणारी स्पीती नदी मिळत होती. यापुढे आम्हाला स्पीती नदीची साथ मिळाली व पूढे समडो या ठिकाणी स्पीती व्हॅली सुरु झाली.
वाटेत दोन ठिकाणी आर्मीचे मोठाले कॅम्पस दिसलें. वाटेतील हर्लिंग या गावी चहा पिऊन अंदाजे दहा तासांचा प्रवास करून सायंकाळी काझाला पोचलो.
समडो ते काझा हा प्रदेश चांगलाच दुर्गम आहे. वाटेत कमी वस्तीची छोटी गावे आहेत जेथील लोकांचे आयुष्य या तूरळक बसेस अवलंबून आहे. कॉलेज, उच्चशिक्षणासाठी मुले मोठ्या शहरांत व पालक मंडळी गावात राहून जमेल तशी शेती किव्वा नोकरीं करतात. अनेक जणांनी होमस्टे सुरु केले आहेत ज्यात मदत करण्यासाठी सिझनमध्ये त्यांची मुले गावी येतात. असेच चित्र मला काल्पा गावातील होमस्टेमधेही आढळले.
काझा मध्ये पोचून तीन चार होमस्टे पाहून एका ठिकाणी राहिलो. पण एकूणच प्रथमदर्शनी मला हे गाव आवडले नाही. खूप गर्दी, अरुंद रस्ते, अस्वच्छता, बेशिस्त ट्रॅफिक असा सर्व प्रकार होता. खरंतर हे एक मोठे गावंच आहे पण आता पर्यटकांच्या झुंडीमुळे गावाचं गावपण हरवून बसलय. दुसऱ्या दिवशी काझाच्या आजूबाजूची महत्वाची ठिकाणे टॅक्सीने फिरलो. ज्यात लांगझा येथील 'मैत्रेय बुध्दाची' सुंदर मूर्ती, हिक्कीम मधील पोस्ट ऑफिस जे जगातील सर्वात उंचीवरील पोस्ट ऑफिस आहे, कोमिक नावाचे छोटेसे गाव जे जगातील सर्वात जास्त उंचीवरील लोकवस्ती असणारे गाव आहे. (दोन वर्षांपूर्वी लडाख मध्ये भेट दिलेले कोरझोक हे असेच खूप उंचीवरील लोकवस्तीचे गाव आठवले), चिचम येथील आशियातील सर्वात उंच सस्पेन्शन ब्रिज जो चिचम आणि किब्बर या गावाना जोडतो. सर्वात शेवटी भेट दिली प्रसिद्ध, भव्य अश्या 'की मोनास्टेरी' ला. तिथल्या भिख्खू मंडळीच्या परवानगीने त्या दिवशी रात्री 'की मोनेस्ट्री' मधे मुक्काम करायचे भाग्य लाभले.
तिसऱ्या दिवशी खरेतर मला ताबो मोनेस्ट्री पाहायला जाऊन तिथेच रहायचे होते पण हर्लिंग जवळ दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला व मला बस मिळाली नाही. इच्छेविरुद्ध मला काझालाच रहावे लागले. या फावल्या वेळेचा मी त्यातल्या त्यात सदुपयोग केला. काझा मधील स्तुपा पाहिला. सुंदर भव्य वास्तू, स्वच्छ आवार आणि दूरवरून आलेल्या यात्रेकरूंची शांत वर्दळ कायमची मनात राहील. स्थानिक खाद्यपदार्थ सिदू (एक प्रकारचे गव्ह्याच्या पिठाचे मोठे करंजी आकाराचे मोमो ज्यात सुका मेव्याचे मिश्रण असतें) आणि ताजे प्लम, जर्दाळू यांचा आस्वाद घेतला.
नंतरच्या भटकंती मध्ये एक Sol Cafe नावाचा फूड जॉईंट खूप आवडला. एका NGO मार्फत चालवला जाणारा हा कॅफे स्पीतीमध्ये अनेक सामाजिक उपक्रमही राबवतो. तिथला स्टाफ म्हणजे विविध शहरातून आलेले, कॉलेज मध्ये शिकणारे व्होलंटीयर्स होते. खाद्यपदार्थ वेगळे व छान होते. तिथे बसून स्पीती मधील प्रसिद्ध 'sea buckthorns' या छोट्या फळांचे सरबत प्यालो.
पुढच्या दिवशी पहाटे पाचच्या बसने परतीचा प्रवास सुरु झाला आणि संध्याकाळी उशीरा रिकाँगपीओ मार्गे छिटकूलला पोचलो.
एक रात्र 'की मोनास्टेरी' मध्ये
अकराव्या शतकात बांधलेल्या आणि बेचाळीसशे मीटर्स उंचीवर स्थित असलेल्या स्पीतीमधील सर्वात प्रसिद्ध आणि आकाराने मोठ्या असलेल्या "की मोनेस्टरी" मध्ये वास्तव्य करण्याचा अनुभव रोमांचकारी होता. तिथल्या मुख्य भिख्खूनी परवानगी दिली म्हणून मला राहता आले. संध्याकाळी गोम्पाचा (मोनेस्टरी) मुख्य दरवाजा बंद झाल्यावर आणि पर्यटकांची वर्दळ थांबल्यावर गोम्पा परिसरातील निरव शांतता, सभोंवतालीचा विस्तीर्ण प्रदेश आणि गोम्पा मंडपात सुरु असलेल्या विशिष्ठ प्रकारच्या प्रार्थनेच्या सुरांनी (ज्यात घुमणाऱ्या आवाजतील श्लोक आणि मधेच जोडीला तुतारीचा घोष असतो) आध्यात्मिक शिखरावर पोचल्यासारखे वाटले.
गारठा चांगलाच वाढला होता आणि बाजूनेच वाहणाऱ्या स्पीती नदीचे विलोभनीय दृश्य मी डोळ्यात साठवत होतो. स्पीतिमध्ये कधी न पडणारा पाऊस संध्याकाळी मात्र चांगला तासभर कोसळला. अस्ताला जाणारा सूर्य, त्याच्या आजूबाजूच्या विविधरंगी छटा, वरती भरलेलं आभाळ, नदीचे विस्तीर्ण पात्र आणि गोम्पा मध्ये होणारा prayer wheel चा आवाज या सर्व गोष्टींचे अद्भुत मिश्रण मला जागेपणी समाधीवस्थेत नेत होते.
गोम्पा परिसर खुपच भव्य आहे जिथे भारत, नेपाळ, भूतान मधून आलेल्या बालक भिख्खूचे प्रशिक्षण वर्ग भरतात. संपूर्ण मोनेस्ट्री व्यवस्थित पाहायची तर दोन तास तरी हवेत. मुख्य इमारतीमध्ये शिरल्यावर छोट्या छोट्या अंधारी जिन्याने फिरताना अनेक देवळे, ध्यान केंद्रे दिसली. तेथील भिख्खू पर्यटकाना आग्रहाने हर्बल टी देत होते जो खूपच छान होता.
मी गेलो त्यावेळी मुख्य मंदिरामध्ये कर्नाटकतील बायलाकुपे गोम्पाचे मठाधीपती आलेले होते. दोन्ही गोम्पामध्ये म्हटल्या जाणाऱ्या शेकडो मंत्राच्या चालीत व उच्चारात काही फरक तर नाही ना हे तपासण्यासाठी ते आले होते असे कळले. रात्रीच्या जेवणात टिंग मोमो व मिक्सभाजी असा बेत होता. संध्याकाळी साडेसहाला सर्वांची जेवणे झाल्यावर किचन बंद झाले ते थेट सकाळी आठ वाजता उघडले. सकाळी किचनमध्ये गेलो तर 'बटर टी' बनवणे सुरु होते. एका मोठ्या लाकडी उभ्या पिंपात ज्याला 'डोंग मो' म्हणतात त्यात आधी तयार केलेल्या कोऱ्या चहामध्ये दूध, याक बटर आणि मीठ घालून घुसळला जातो. या चहाला तिकडे 'पो चा' म्हणतात. अतिथंड वातावरणात हा चहा शरीरात ऊर्जा निर्माण करतो. नाश्त्याला सत्तूचे पीठ होते. ते बटर टी मध्ये कालवून खायचे. चवीला हवी असेल तर लाल मिरचीची चटणी. हाच काय तो नाश्ता. मर्चन्ट नेव्हीमध्ये नोकरीला असलेला, मूळचा अमृतसरचा पंजाबी मुंडा पण आता आयेरलंडला स्थायिक असलेला एक बुलेटरायडर सुद्धा रात्री वस्तीला होता. त्याच्याबरोबर गट्टी जमली आणि खूप गप्पा, फोटो झाले.
चहा नाश्ता करून सर्वाना धन्यवाद देऊन बोचके उचलून पहिल्याच बसने काझाला रवाना झालो.
चिटूकल्या छिटकूल गावातील मुक्काम
एखादं गाव किती सुंदर आहे हे कसे ठरवायचे? याचे परिमाण काय? प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते. तिथे कमीतकमी एक दोन दिवस राहिल्याशिवाय ते नीटसे कळत नाही असे मला वाटते. हिमालयातील जी काही थोडी गावे मी पाहिली, तिथे राहिलो आणि मला आवडली त्यात उत्तराखंड मधील 'सारी' आणि 'कौसानी', प. बंगाल मधील सेपी, पहलगाम जवळील अरु, मेघालयातील मावलिननोंग आणि नोंगरीआट ही लगेच डोळ्यासमोर येतात. पण छिटकूलची बातच और आहे. टूमदार गाव, स्वच्छता, बाजूला वाहणारी नदी, चाहूबाजूनी डोंगर, सुखद गारठा, चांगले गावकरी हे सर्व एकत्र येऊनही जोपर्यंत तिथल्या vibes तुमच्या पसंतीला उतरत नाहीत तोवर तुम्ही त्या गावच्या प्रेमात पडत नाही. चार दिवसापूर्वी किन्नोर मधीलच 'काल्पा' गावांत राहिलो होतो तेही सुंदरच होते पण छिटकूलचा नंबर वरचा लागतो.
काझा ते छिटकूलचा अडीचशे किमीचा खडतर प्रवास लोकल बसने तेरा तासात पूर्ण करून जेव्हा गांवात उतरलो तेव्हा सूर्यास्त झालेला होता. पूर्ण काळोख होण्याच्या आत मला होमस्टे शोधायचा होता. हवा तसा होमस्टे आणि हवी तशी खोली मिळाल्यावर अंगणात बसून समोरच्या डोंगराकडे पहात, फुलबाग कामात व्यस्त असलेल्या पण बोलक्या स्वभावाच्या वयस्कर घरमालकाशी गप्पा मारत आलेयुक्त चहाचा डबल डोस घेतला आणि थकवा पार पळून गेला. संपूर्ण लाकडी बांधकाम केलेली ५०-६० वर्षे जुनी निळ्या रंगाची ही होमस्टे बंगली संधीप्रकाशात फारच उठून दिसत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळीच बाहेर पडून चार पाच तास पायपीट केली. गांवात खूप फिरलो, नदीकाठी भटकलो, दोन देवळात आणि एका गोम्पात गेलो, जरा उंचावर चढून पूर्ण गावाचा देखावा पाहिला, बटाट्याची शेती आणि सफरचंद, प्लमच्या बागा पाहिल्या आणि मन प्रसन्न झाले.
दुपारी 'आखरी धाबा' या नावानेच प्रसिद्ध असलेल्या धाब्यावर खालून वाहणाऱ्या बास्पा नदीचा देखावा बघत राजमा चावल जेवलो.
दुपारनंतर उशिरा व्हारंड्यात खुर्ची टाकून, मेंढीच्या पिल्लांची बे बे ऐकत पुस्तकं वाचत बसलो. खूप शांतता, गार वाऱ्याच्या मंद झुळूका, समोरचा हिरवा डोंगर, पुस्तकं वाचता वाचता खुर्चीतच लागलेली डुलकी... आणि मी कायमचा या गांवात राहायला आल्याचे स्वप्न... अहाहा..