बुलेटसफारी - कन्याकुमारी
दिवस-१३, किमी-३७००+
राज्ये- महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गोवा
भेट दिलेली स्थळे- मत्तूर (संस्कृत भाषिक गाव), साक्रेबाईल हत्ती कॅम्प, श्रीरंगपट्टणम आणि तंजावरची ऐतिहासिक शहरे, रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्य, चेट्टीनाड, रामेश्वरम धनुषकोडी, कन्याकुमारी, कोल्लम- जटायू अर्थ सेंटर
दिवस १: रत्नागिरी (महाराष्ट्र) ते हरिहर (कर्नाटक)- ५२० किमी.
NH66 आणि NH48 हायवेमुळे प्रवास चांगला झाला. सुरुवातीची राइड आमच्या सुंदर कोकणातून NH66 मार्गे, नंतर आंबोली मार्गे घाट ओलांडून बेळगाव व पुढे NH 48 पुणे बंगलोर हायवे.
घरून सकाळी लवकरच सुरुवात केली आणि १०० किमी नंतर कणकवलीला नाश्ता केला. झारापपर्यंतचा रस्ता ४ लेनचा असल्याने हा प्रवास सुरळीत होता. त्यानंतर आंबोली घाटातून बेळगावीपर्यंत वळणावळणाचा रस्ता जातो. घाटरस्त्याचा दर्जा चांगला असल्याने राइडचा आणि आसपासच्या दरी देखाव्याचा आनंद घेता आला. बेळगावी शहरात शिरण्यापूर्वी उसाचा ताजा रस पिऊन ताजेतवाने झालो. NH48 वरील पुढील राइड 75 किमी प्रतितास सरासरी वेगाने छान झाली. जेवण्यासाठी चांगले रेस्टो खूप वेळ मिळाले नाही पण शेवटी दक्षिण भारतीय थाळी मिळणाऱ्या एका छोट्या खानावळ प्रकारातील रेस्टोमध्ये गेलो. हॉटेल साधेच पण चांगले वाटले. तिथे आम्ही स्थानिक पद्धतीचे दहीपोहे (बेदाणे आणि बुंदीसह दह्यात बुडवलेले पोहे) खाल्ले. चव अप्रतिम होती. रात्रीचा मुक्काम धारवाडला करायचा बेत होता पण रस्ता छान असल्याने हरिहरपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. सूर्यास्तानंतर लगेचच हरिहरला पोहोचलो आणि विश्रांती घेतली. आज पहिल्याच दिवशी ५२० किमीचा पल्ला गाठला.
दिवस २: हरिहर ते साक्रेबाईल (१०० किमी).
पहिल्या दिवशीच मोठी मजल मारल्याने, आजचा दिवस तसा आरामशीर होता. आजचा रस्ता राज्यमार्ग होता पण दर्जा चांगला नव्हता. खराब रस्त्याची कसर नयनरम्य देखावे, सुपारी लागवडीची नेत्रसुखद दृश्ये आणि सकाळची ताजी हवा यांनी भरून काढली. प्रथम आम्ही मत्तूर नावाच्या ठिकाणी गेलो जे संस्कृत भाषिक गाव म्हणून ओळखले जाते. गावातील सामान्यजन आपापसात संस्कृतमध्ये बोलतात असे आढळले नाही पण तिथल्या एका शाळेत संस्कृतमधून शिकवले जाते असे कळले. आम्ही त्या शाळेत भेट दिली व तेथील एका वरिष्ठ शिक्षकांना भेटलो. संस्कृतमध्ये अस्खलित संभाषण करणाऱ्या या शिक्षकांसोबत एक तास कसा गेला हे कळलेच नाही. ते पूर्णवेळ आमच्याशी संस्कृत भाषेतच बोलत होते. आम्ही एका वर्गातील मुलांनाही भेटलो जे आमच्याशी संस्कृत भाषेतून बोलले. हे सर्व अचंबित करणारे होते.
आजचा आमचा मुक्काम स्याक्रेबायल एलिफंट कॅम्पमध्ये होता जिथे आम्ही दुपारी पोचलो. हा कॅम्प घनदाट जंगलाच्या मधोमध उभारलेला आहे पण सुरक्षितता आणि स्वच्छता अतिशय व्यवस्थित आहे. जेवणाची चव आणि पदार्थांची विविधताही चांगली होती. आम्ही जंगलातील काही पायवाटा धुंडाळल्या आणि पक्षी निरीक्षणही केले. या कॅम्पचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे हत्तींसोबत वेळ घालवणे होय. छोटे मोठे जवळपास २० हत्ती खूप जवळून पाहता आले. पाण्यात पाय पसरून पहुडलेल्या हत्तींना आंघोळ घालण्याचा माझा अनुभव रोमांचक होता.
दिवस ३: साक्रेबाईल ते श्रीरंगपट्टणम (२५० किमी). आजचा रस्ता हा राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाचे मिश्रण होते. शिमोगा पासून रस्ता बांधणीच्या कामामुळे माझा वेग मंदावला. त्यापुढील एकेरी रस्ता अनेक छोटी गावे आणि शहरांमधून जात होता. यामुळे आम्हाला कर्नाटकच्या अंतर्गत भागातील संस्कृतीचा अनुभव घेता आला. दुपारी श्रीरंगपटणंमला पोहोचलो. हॉटेलमध्ये सामान टाकून, थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी १००० वर्ष जुन्या असलेल्या काळ्या दगडात कोरलेल्या मंदिराला भेट दिली आणि श्रीरंगनाथस्वामीचे (भगवान विष्णूची झोपलेली मूर्ती) दर्शन घेतले. श्रीरंगपटणं हे शहर टिपू सुलतानची राजधानी होती. त्यासंदर्भातील ऐतिहासिक ठिकाणे दुसऱ्या दिवशी पाहायचे ठरवले.
दिवस ४: श्रीरंगपट्टणम ते करूर (३०० किमी)
सकाळी लवकर निघून रंगनाटिट्टू पक्षी अभयारण्य पाहायला गेलो. ही भेट म्हणजे एकदम छान अनुभव व सुखद आश्चर्याचा धक्का होता. हे खरेतर प्लॅनमध्ये नव्हते पण जवळच, ६ किमी दूर आहे म्हणून गेलो. आम्ही २० मिनिटांची बोट राईड केली आणि पेलिकन, पेंटेड स्टोर्क इत्यादी सुंदर स्थलांतरित पक्षी पाहू शकलो. डोक्यावर तुरा असलेली एक सफेद पक्षीजात तर सायबेरियामधून येते असे कळले. त्यानंतर नाश्ता करून त्रिवेणी संगम, कैदीकिल्ला (इंग्रजांवर विजय मिळवून टिपूने येथे काही इंग्रज सेनापतीना कैदेत ठेवले होते), टिपू गुंबाज यासारख्या काही ऐतिहासिक वास्तूंना भेट दिली आणि श्रीरंगपट्टणमचा दौरा आटोपता घेतला.
करूरचा रस्ता चांगला होता पण बहुतेक करून एकेरीच होता. म्हैसूर शहर ओलांडताना वाटेतच प्रसिद्ध म्हैसूर राजवाडा दिसला. पुढचा रस्ता सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पातून जाणारा होता. आजूबाजूचे जंगल आणि त्यातून जाणारा हा रस्ता अतिशय सुंदर आहे. आम्हाला दोन हरिणेही दिसली. माझ्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम राइड्सपैकी ही एक म्हणावी लागेल. वाटेत आम्ही स्थानिक फळांचा आस्वाद घेतला (लक्ष्मणफळ- Soursop) आणि थोडा वेळ रस्त्याच्या कडेला गर्द सावलीमध्ये विश्रांती घेतली. धीमाबाम घाट, त्याची २७ हेअरपिन वळणे आणि आजूबाजूचे नजारे मंत्रमुग्ध करणारे होते. एकूणच आजची राईड रोमांचकारी होती. करूरला संध्याकाळी उशिरा पोचलो. इथे फक्त रात्री राहण्यापुरतेच थांबायचे होते. साइटसीईंग नव्हते. त्यामुळे लवकर झोपी गेलो.
दिवस ५: करूर ते तंजावर (१५० किमी).
आजचा रस्ता छान होता. खड्डे नाहीत, कुठलेही रस्त्याचे बांधकाम नाही असा हा रस्ता हायवे नसूनही निवांत होता. एकूणच इथल्या लोकांचे ड्रायव्हिंग शिष्टाचार आणि रहदारीची शिस्त कौतुकास्पद आहे. दुपारी १२ वाजता तंजावर येथील हॉटेलला पोहोचलो आणि जेवण करून प्रेक्षणीय स्थळे पाहायला निघालो. जागतिक वारसा स्थळ असलेल्या व स्थापत्यकलेतील एक आश्चर्य असणाऱ्या बृहदेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. मंदिर परिसर स्वच्छ होता मात्र दर्शनासाठी भली मोठी रांग होती. त्यांनतर १७ व्या आणि १८ व्या शतकात तामिळनाडूच्या काही भागावर राज्य करणाऱ्या मराठा साम्राज्याच्या स्मारकांना भेट देताना खूप अभिमान वाटला. त्यावेळीच्या राज्याची राजधानी तंजोर म्हणजेच आताचे तंजावर होय. स्मारकांमध्ये सरस्वती लायब्ररी, मराठा पॅलेस, आर्ट गॅलरी, मराठा दरबार हॉल इत्यादींचा समावेश आहे. छ. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधु राजे व्यंकोजी भोसले व त्यांच्या वंशजांनी पराक्रम गाजवून तांजोरवर राज्य केले. संस्कृती, साहित्य व विविध कलांचा या काळात तेथे विकास झाला.
असेच फिरता फिरता आमची गाठ एका इटालियन बुलेट रायडर जोडप्याशी पडली (दोघेही ६५ वयाचे). त्यांच्याशी झालेल्या गप्पा स्फूर्तिदायक होत्या. हे जोडपे दरवर्षी ३ महिने इटलीतुन भारतात येते व इथली विविध राज्ये आपापल्या बुलेटवरून फिरतात. असं ते गेली अनेक वर्षे करत आहेत. खूपच विस्मयकारी जोडपे होते.
रात्रीच्या जेवणात चेट्टीनाड पद्धतीचे जेवण घेतले. सामान्य तमिळ जेवणाच्या चवीच्या तुलनेत हे जेवण अधिक मसालेदार असते. चेट्टीनाड हे तामिळनाडू मधील एक छोटे पण प्रसिद्ध असे गाव आहे जेथे आम्ही दुसऱ्या दिवशी भेट देणार होतो.
दिवस ६: तंजावर ते रामेश्वरम (२७० किमी).
रस्ता बऱ्यापैकी चांगला होता. प्रथम आम्ही चेट्टीनाड गावी भेट दिली जे तंजावरपासून १०० किमी अंतरावर आहे. एक शांत व साधे गाव. या गावाचे वैशिष्ठ्य म्हणजे २० व्या शतकाच्या सुरुवातीला इथे बांधलेले मोठे मोठे महाल व राजवाडे. मुख्य राजवाड्यात आम्ही जाऊ शकलो नाही पण गावातून एक फेरफटका मारला तेव्हा इथल्या गतकाळातील वैभवाची झलक पाहायला मिळाला. हे पाहून मला राजस्थानमधील मंडावा येथे पाहिलेले अश्याच प्रकारचे महाल आठवले. चेट्टीनाड पाहून पुढे रामेश्वरमकडे निघालो.
आजूबाजूला मोठमोठाली हिरवीगार कुरणे व त्यातून जाणारा एकेरी पण चांगला रस्ता. राईडची खूप मजा येत होती. थोड्याच वेळात रामेश्वरमच्या आधी येणाऱ्या पंबन पुलावर पोचलो. समुद्रातून जाणाऱ्या या पुलावरून राईड करण्याचे स्वप्न साकार झाले. दोन्ही बाजूंना समुद्रात उभ्या असलेल्या रंगीबिरंगी होड्या, आकाशात उडणारे पक्ष्यांचे थवे, किनाऱ्यावरील लोकवस्ती व त्यांची घरे पाहता पाहता पुलावरून उतरून रामेश्वरम्मध्ये प्रवेश केला. हॉटेलवर सामान टाकून रामनाथस्वामीचे (रामेश्वरम ज्योतिर्लिंगम) सशुल्क दर्शन घेतले. त्यांनतर अग्नीतिर्थ म्हणजे जवळच असलेला समुद्रकिनारा जेथे भाविक आंघोळ करतात तेथे चक्कर टाकली. एकूण पाहता मुख्य मंदिर परिसर आणि अग्नितीर्थ परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्वरित कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे असे वाटले.
दिवस ७: रामेश्वरम ते कन्याकुमारी (३०० किमी). सकाळी लवकर उठून धनुषकोडीसाठी रवाना झालो जे रामेश्वरम शहरापासून १६ किमी अंतरावर आहे. इथे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी ६ नंतरच प्रवेश मिळतो. समुद्रात सरळसोट जाणाऱ्या या हायवे दर्जाच्या रस्त्यावरची राइड संस्मरणीय ठरली. भन्नाट वारा व दोन्ही बाजूला समुद्र. प्रथम आले धनुषकोडी. हे तेच ठिकाण मानले जाते जिथे श्रीरामाने लंकेला जाण्यासाठी हनुमानाला सेतू बांधण्याचा आदेश दिला. आणखी ४ किमी पुढे गेल्यावर धनुषकोडीचे समुद्रातील शेवटचे टोक अरिचल मुनई आहे. दुर्दैवाने ढगाळ आकाशामुळे सूर्योदय पाहण्याचा आमचा प्लॅन फसला. तरीही, आजूबाजूचा देखावा केवळ अप्रतिम होता. परतीच्या प्रवासादरम्यान डॉ. अब्दुल कलाम हाऊस कम मेमोरियलला (ज्या घरात त्यांचे लहानपण गेले) भेट दिली. रामेश्वरम् येथील आणखीन एक वैशिष्ठ्यपूर्ण गोष्ट म्हणजे तेथील टीवी टॉवर जो भारतातील सर्वात उंच आहे (323 मीटर्स). आयफेल टॉवरची उंची साधारण एवढीच आहे. योगायोग म्हणजे भारतातील दोन नंबरचा सर्वात उंच टीवी टॉवर आम्ही दोन महिन्यांपूर्वीच आमच्या सायकलट्रीप दरम्यान जैसलमेर जिल्ह्यातील रामपूर या गावी पाहिला होता.
त्यानंतर हॉटेल गाठले, पॅकअप केले, सॅडल बॅग बाईकवर चढवली आणि कन्याकुमारीला निघालो. पंबन पूल पार करताना हवेत खूप फुलपाखरे उडत होती. अशीच पाखरे सकाळी धनुषकोडीच्या रस्त्यावरही दिसली होती. तसेच पूल सुरू होण्याआधी दोन मोरांचेही दर्शन झाले. याआधी कधीही समुद्रकिनारी मी मोर पाहिले नव्हते. समुद्राजवळच्या अतीआर्द्रा खारट हवेत मोर नसतात अशी माझी समजूत होती. रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी पामचा गूळ विकणारे छोटे विक्रेते होते. पामच्या झाडाचा रस काढून, उकळवून हा गूळ बनतो. किंमत ५०० रुपये प्रति किलो. चव घेतली. फार नाही पण थोडी वेगळी वाटली. पुढील रस्ता एकेरीच, अनेक छोट्या गावातून जाणारा पण खूप चांगला होता. वाटेत कुठेच दक्षिण भारतीय नाश्ता मिळू शकला नाही म्हणून एका छान बेकरीमध्ये पॅटीस आणि कॉफी घेतली. थुत्तूकोडीपासून पुढील रस्ता ४ लेन महामार्ग होता. उन खूप जाणवत होते त्यामुळे छोटे ब्रेक घेत, ज्यूस आणि नारळपाणीचा आस्वाद घेत कन्याकुमारीकडे कूच चालू होती. एकूणच वाऱ्याचे प्रमाण लक्षणीय होते ज्याचा बाईक चालवताना त्रास होत होता.
दुपारी उशिरा हॉटेलला पोहोचलो आणि सामान हॉटेलला टाकून सनसेट पॉइंटकडे निघालो. भारताच्या दक्षिणटोकाकडील भागातून सूर्यास्त पाहणे हा अविस्मरणीय क्षण होता. बुलेटवरून कन्याकुमारीपर्यंत जाण्याचे आमचे स्वप्न सत्यात उतरले होते. आम्ही खूप आनंदी आणि समाधानी होतो. निर्विघ्नपणे प्रवास पार पडल्याबद्दल आम्ही आमच्या लालघोड्याला (बुलेट) अनेक धन्यवाद दिले.
दिवस ८: विश्रांतीचा दिवस.
आज राइडिंग करायचे नाही असे ठरवले होते. आम्ही गेल्या ७ दिवसात जवळपास २००० किमी बुलेट चालवून आलो होतो त्यामुळे आम्हाला व आमच्या लालघोड्याला विश्रांतीची गरज होती. सकाळी लवकर उठून घाईघाईने सनराईज पॉईंटकडे पळालो. डाव्या हाताला उगवणारा सूर्य आणि उजव्या हाताला विवेकानंद रॉक मेमोरियल व शेजारील थीरुवल्लुवर यांचा पुतळा हे सर्व दृश्य फारच विहंगम होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या कन्याकुमारी भेटीदरम्यान फक्त रॉक मेमोरियल पहाता आले होते. सूर्योदय व सूर्यास्त पाहण्याची इच्छा या भेटीवेळी पूर्ण झाली.
त्यानंतर गांधी मंडपम, त्सुनामी पार्क, कन्याकुमारी देवी मंदिराला भेट दिली. भारतमाता मंदिराजवळ दिल्लीहून सायकलवरून आलेल्या ६७ वर्षांच्या एका अवलियाशी भेट व गप्पा झाल्या. त्यांच्या सायकलसफरीचे वर्णन ऐकून त्यांना सलाम केला. दिवसभर आराम करून सायंकाळी स्व.श्री एकनाथ रानडे यांनी स्थापन केलेल्या विवेकानंद केंद्राला भेट दिली. एक मोठाले गेस्ट हाऊस, एक मोठे कॅन्टीन, काही मंदिरे आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असलेला हा एक मोठा कॉम्प्लेक्स आहे. जरूर भेट द्यावी.
दिवस ९: कन्याकुमारी ते कोल्लम (१६० किमी).
गेले अनेक दिवस ज्या ट्रिपचा बेत केला होता त्यामधील अर्धा पल्ला पूर्ण करून आज आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. कोडाईकनाल मार्गे परत जाण्याचा प्लॅन होता पण तो रद्द करून काही नवीन स्थळांना भेट देण्यासाठी व केरळ किनारपट्टीने प्रवास करण्याचे ठरवून आम्ही केरळ मध्ये प्रवेश केला. पण रस्त्याची अवस्था झपाट्याने बदलली. आजपर्यंत मिळालेले शांत, छान रस्ते जाऊन आता खूप रहदारीचा आणि अरुंद मार्ग लागला. १६० किमी अंतर पार करण्यासाठी जवळपास ५ तास लागले व दुपारी कोल्लमला पोचलो. हॉटेलवर थोडी विश्रांती घेऊन कोल्लमपासून ४० किमी दूर असलेल्या जटायू अर्थ सेंटरला भेट दिली. हे जगातील सर्वात भव्य पक्षिशिल्प मानले जाते. सुंदर आणि भेट देण्यासारखे ठिकाण आहे. असे म्हणतात की याच ठिकाणी रामायणातील जटायू रावणाशी झुंज देऊन गतप्राण झाला. या ठिकाणी एकतर ८०० पायऱ्या चढून किंवा रोपवेच्या मदतीने जाता येते.
कर्नाटक, तामिळनाडू व आता केरळ या दाक्षिणात्य राज्यातील आहारामध्ये तांदूळ हा मुख्य घटक असला तरीही प्रत्येक राज्याची आपापली एक खासियत आहे. तामिळनाडू मध्ये दुपारच्या जेवणात साध्या भाताबरोबर ३ चटण्या व ४ प्रकारच्या भाज्या/रसम देतात. तर केरळ मध्ये उकडा तांदुळाच्या भात बरोबर ३/४ भाज्या, ताक, कढी व प्यायला हर्बल कोमट पाणी देतात. दोन्ही ठिकाणी फक्त दुपारच्या वेळीच पोटभर थाळी मिळते व रात्री वेगवेगळ्या प्रकारचे भात जसे की मशरूमभात, पुलाव, पनीरभात, परोठा भाजी मिळते.
दिवस १०: कोल्लम ते कोईम्बतूर (पलक्कड मार्गे ३४० किमी).
खराब रस्त्याची कहाणी आजही सुरूच होती. बुलेटच्या ब्रेक आणि गीअर्ससाठी खूप काम होते. राइडिंग करण्यातला आनंद नाहीसा होत चालला होता. संपूर्ण केरळमध्ये NH 66 या राष्ट्रीय महामार्गाचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम चालू असल्याने खूपच त्रास होत होता. एर्नाकुलमच्या आधी नाश्ता करायला इंडियन कॉफी हाऊस मध्ये गेलो. फिल्टर कॉफी पिता पिता विचार केला आणि रस्त्याची परिस्थिती पाहून आम्ही हा मार्ग बदलून कोईम्बतूर आणि NH48 मार्गे परतीचा प्रवास करायचे ठरवले. यामुळे आमचे थोडेसे साईटसीईंग होणार नव्हते पण इलाज नव्हता. थ्रीसुरच्या ३० किमी आधी NH66 सोडला आणि नंतर मात्र लगेचच चांगला रस्ता सुरु झाला. पलक्कड मार्गे प्रवास करीत कोईम्बतूरला पोचून मुक्काम केला. हा सर्व रस्ता छान होता.
दिवस ११: कोईम्बतूर ते दावणगिरी (५५० किमी)
NH48 वर तुमकुरु येथे मुक्काम करण्याचा प्लॅन करून कोइंबतूर वरून सकाळी ६ वाजता राईड चालू केली. दोन तासातच आम्ही धिमबाम घाटाच्या पायथ्याशी पोचलो. नाश्ता केला व घाट चढायला सुरुवात केली. हाच घाट आम्ही चौथ्या दिवशी उतरलो होतो. पण आजचे चित्र वेगळे होते. हा घाट वाहतुकीसाठी रात्री बंद असतो. त्यामुळे सकाळची वेळ असल्याने मोठ्या वाहनांची खूप वर्दळ होती. त्यांना सांभाळून २७ अतीवक्र वळणे चढणे जिकिरीचे होते. एकमेकांना मदत करण्यासाठी दोन्ही बाजूची वाहने चुकीच्या बाजूने (डाव्या ऐवजी उजव्या बाजूने) वळणे चढत/उतरत होती. हे खूपच चमत्कारिक होते पण सर्वांच्या सोयीचे होते. रस्ता मात्र खूपच चांगला आणि थरारक होता. या प्रवासात आम्ही ३ हरिणे व १ रानडुक्कर पाहिला. रानडुकराचा जवळून फोटो काढण्यासाठी थांबलो पण तो आमच्याकडे फारच रोखून पाहत होता म्हणून आम्ही पळ काढला व केतकीने त्याचा लांबून फोटो घेतला. घाट चढून चामराजनगर मार्गे, म्हैसूर शहरातून थेट न जाता वळसा घेऊन तुमकुरूला जाणारा मार्ग घेतला. वाटेत एके ठिकाणी एका मोठ्या चिंचेच्या झाडाच्या गर्द सावलीत विश्रांती घेतली. चिंचाही खाल्ल्या. भरपूर चिंचांनी लगडलेली अनेक झाडे आम्हाला प्रवासादरम्यान दिसत होती. अंदाजे ४ वाजता तुमकुरूला पोचून चहा प्यायलो. सूर्य मावळायला अजून अवधी असल्याने आम्ही NH 48 मार्गे पुढे जात राहिलो. तुमकुरूच्या पुढे जवळपास २०० किमीचा पल्ला गाठून आम्ही ७ वाजता दावणगिरीला पोचलो. एका दिवसात ५५० किमी अंतर पार करून स्वतःचाच एक रेकॉर्ड केला. अर्थात हे सर्व चांगल्या रस्त्यांमुळे शक्य झाले. आज खूप दमलो होतो. लवकर झोपी गेलो.
दिवस १२: दावणगिरी ते गोवा (३५० किमी).
सकाळी ६ वाजता एका ठेल्यावरील कॉफी पिऊन पुढील वाटचाल सुरू केली. धारवाडपर्यंत १७० किमी NH48 ने आणि नंतर गोव्याकडे जाणाऱ्या NH748 चा मार्ग अनुसरला. वाटेतील गावे पार करताना दांडेली जवळील जंगलामधून जाणारा सुंदर रस्ता होता. रहदारी खूप कमी, प्रचंड शांतता, झाडांमधून वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज आणि त्या वाऱ्याने सुरू असलेली सततची पानगळ. . . एक भारी नजारा होता. कर्नाटक आणि फोंडा (गोवा) यांना जोडणारा अनमोड घाट सुरू होण्यापूर्वीचा रस्ता चांगलाच खराब होता. पण मुख्य अनमोड घाट सुस्थितीत आणि कमी रहदारीचा होता. घाट उतरून मोल्ले गाव व नंतर पोंडामार्गे गोव्यात शिरलो आणि हॉटेलला पोचलो. दुपारच्या जेवणानंतर चांगली विश्रांती घेतली आणि रात्री जीवाचे गोवा केले.
दिवस १३: गोवा ते घर (रत्नागिरी)- २३० किमी.
या रायडिंग ट्रिपचा आज शेवटचा दिवस. सकाळी लवकर उठून चहा पिऊन आरामात राईडला सुरुवात केली. महाराष्ट्रात प्रवेश केला आणि खूप दिवसांनी मिसळीवर ताव मारायची इच्छा कुडाळमध्ये पूर्ण झाली. मध्ये मध्ये छोटे ब्रेक घेत, राईडचा आनंद घेत सुरक्षित घरी पोहोचलो आणि आमच्या बुलेटला खूप धन्यवाद देऊन मनापासून नमस्कार केला.
खूप दिवसांपासून प्लॅन केलेली, प्लॅन करताना अशक्यप्राय वाटणारी ही राईड यशस्वीरीत्या पूर्ण करून घरी पोचलो यावर आमचाच विश्वास बसत नव्हता. हा एक स्वप्नवत अनुभव होता. आत्तापर्यंत केलेले विविध ट्रेक्स, सायकल ट्रिपस, ग्रुपराईड ट्रीप मधील या राईडट्रीपचे नियोजन सर्वात कठीण होते. आमचे आम्ही दोघेच असल्याने जोखीमही होती. राइड ट्रिपमधून यशस्वी आणि सुरक्षित परतल्याबद्दल आम्ही आमच्या सर्व शुभचिंतकांचे आभार मानतो. सर्वात कौतुक मला केतकीचे आहे कारण १३ दिवसांत ३७०० किमी अंतर बाईकवर पाठी बसून (as a pillion) प्रवास करणे म्हणजे चेष्टा नाही. मला हा अनुभव अजिबात नाही किव्वा मी एवढा प्रवास पाठी बसून करू शकेन याची खात्रीही नाही. केतकी फक्त पाठी बसून येणारी प्रवासी नव्हती तर तिने मार्गदर्शक, सल्लागार, वेळापत्रक नियोजन, फोटोग्राफी यासारख्या इतर अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. आम्ही भेट दिलेली विविध ठिकाणे, निसर्गरम्य दृश्ये, रस्ते, घाट वळणे, प्रेमळ माणसे, विविध भागातील लोकजीवन व संस्कृती, रुचकर खाद्यपदार्थ या सर्वांची आठवण चिरकाल मनात राहील.





















.jpg)




































