Wednesday, 6 March 2024

बुलेटसफारी - लडाख

लडाख बाईकराईड


जून २०२३

जगातील सर्वात उंच पास, म्हणजेच उमलींग घाटावर (५९०० मीटर्स) दुचाकीने चढाई करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणायचे होते. अर्थात त्यासाठी दोन आव्हाने होती. एक म्हणजे खूप खराब रस्त्यावर सतत राईड करायची शारीरिक तयारी आणि दुसरे म्हणजे कमी प्राणवायूबरोबर जुळवून घेणे. वर्षभरापूर्वी केलेल्या अरुणाचलप्रदेश मधील सेला पास राईडचा अनुभव चांगलाच कामी येणार होता. लडाख मात्र निश्चितच अधिक आव्हानात्मक आणि थरारक असणार होते.

 

दिवस १- मनाली ते सारचु 

सकाळी ९ वाजता सारचूकडे कुच करायचे ठरले होते. नाश्ता करून, सामान पॅक करून रायडिंग गीअर्स तयार ठेवले. हॉटेल बाहेर जवळपास २० हिमालयन बाइक्स (रॉयल एनफिल्डचे हिमालयन नावाचे मॉडेल) रांगेत उभ्या राहून आमची वाट पाहत होत्या. प्रत्येकाने एक एक बाईक घेऊन टेस्ट राईड केली. पिकअप व्हॅन मध्ये आपापली बॅकपॅक टाकून, रायडिंग गीअर्स घालून तयार होण्यातच ११ वाजले होते. २१ वर्षांचा झिपर्या केसांचा ५ फूट उंचीचा किडबिडीत प्रकृतीचा पण हसऱ्या चेहऱ्याचा सोनम नावाचा छोकरा आमचा कॅप्टन होता. सार्चूच्या पुढे २० पैकी १५ रायडर्स थेट लेहला जाणारे होते तर आम्ही ५ जण त्सो मोरिरी (मोरीरी नावाचे तळे), उमलिंगला व हानले ही ठिकाणे फिरून पँगोंग, नुब्रा मार्गे लेहला जाणार होतो. सकाळी ८ वाजता सुरू होणे अपेक्षित असलेली राईड ११.३० वाजता एकदाची कशीबशी सुरू झाली आणि पुढे दिवसभरात होणाऱ्या बेशिस्त आणि भोंगळ कारभाराचा अंदाज आला. 

 



मनाली शहर, गर्दी पार करून आम्ही अटल बोगद्याच्या दिशेने जात होतो. रस्त्याला बऱ्यापैकी वर्दळ होती. साधारण अर्ध्या तासात बोगद्याच्या मुखाशी पोचून ब्रेक घेतला आणि फोटो काढले. रोहतांग घाटाला पर्याय म्हणून बांधलेल्या या बोगद्यातून राईड करायचे स्वप्न पूर्ण झाले. ९ किमीचा हा बोगदा म्हणजे म्हणजे आपल्या देशासाठी एक अभिमानाची बाब आहे. रोहतांग सारख्या बिकट प्रदेशातील या बोगद्यामुळे मनाली व लेह मधील दळणवळण खूपच सोयीचे व निर्धोक झाले आहे. 


 

आमची राईड पुढे चालू झाली पण सतत गोंधळामुळे आम्ही थांबत होतो व त्यात खूप वेळ वाया जात होता. याचा त्रास आम्हाला झिंगझिंगबार आणि बारालाछा घाटात होणार होता. मनाली पासून थोडे पुढे गेल्यावर हवेतला गारठा व धुके वाढले होते. आम्ही आता उंच उंच जात होतो. आजूबाजूला बर्फाच्छादित डोंगर दिसत होते व रस्ताही चांगला असल्याने रायडिंगची मजा येत होती. आधी सिसू व नंतर कीलोंग पार करून जिस्पा या ठिकाणी लंचब्रेक घेतला. थोड्याच वेळात झीझीबार आला. दुपारच्या उन्हाने बर्फ वितळून रस्त्यावरून वेगाने पाणी वाहत होते. दिसायला ते फक्त २०० मीटरचे अंतर होते पण एक दिव्य पार करायचे होते. एका मागोमाग एक ठराविक अंतर ठेवून पाण्यात गाड्या घातल्या व सावकाश सहिसलामत बाहेर पडलो. एक छोटीशी चूक आणि हमखास अपघात होण्याचा धोका होता. जबरदस्त थ्रीलिंग अनुभव होता. 



 

आता बारालाच्छा घाट आमची वाट पाहत होता. घाटाचा टॉप तसा पटकन गाठला आणि उतार सुरू झाला तसा अंधार वाढू लागला व वॉटर क्रॉसिंग संख्या वाढल्याने गाड्यांचा वेग कमी झाला. दोन्ही बाजूने बाइक्स व अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सतत येणारी वॉटर क्रॉसिंग, खराब खड्डेमय रस्ता, वाढू लागलेला अंधार व त्यामुळे संथ झालेले ट्रॅफिक आमची परीक्षा पहात होते. इथेच आमचा ग्रुप विस्कळीत झाला. पुढे असणारा सोनम आणि मागे असणारी पीकअप गाडी दृष्टिक्षेपातून नाहीशी झाली. आतापर्यंतचा सर्व अनुभव पणाला लावून कसाबसा अखेर घाट संपवला व रस्ताही जरा चांगला असल्याने वेग वाढवला. बारालाछा घाटाचे नाव जास्त परिचित नसेल पण आमचे बारा वाजले हे नक्की. खूप उशीर झाल्याने असावे कदाचित. पुढील पूर्ण राईडमध्ये यापेक्षा अधिक थरारक क्षण आले पण एवढी धोकादायक स्थिती आली नाही. सारचू २० किमी लांब होते. कॅम्प शोधत कसाबसा ८ वाजता पोचलो. थंडी भयानक होती व आमचे सर्व कपडे, जॅकेट्स, बॅग्ज पीकअप गाडीत होते. मनाली ते सारचु येणे म्हणजे २००० मीटर्स उंचीवरून ४२०० मीटर्स उंचीला येणे. त्यामुळे वातावरणातील कमी झालेल्या ऑक्सिजनचा त्रास थोडा जाणवत होता. थंडीत कुडकुडत, सूपचे बाउल वर बाउल रिचवित गाडीची वाट बघत होतो. दुसऱ्या दिवसापासून आमच्या बरोबर असणारा थुपस्तन (थुप्स) नावाच्या कॅप्टनबरोबर गप्पा मारत कसाबसा वेळ काढत होतो. याच थूप्समुळे व त्याचे साथीदार छोस आणि थीनले मुळे आमची दुसऱ्या दिवसापासूनची पुढील सर्व राईड एकदम छान झाली. दिवसभराचा शीण, खूप थंडी व कमी ऑक्सिजनमुळे ग्लानी येत होती. टेन्टमध्ये येऊन रायडिंग जॅकेट घालूनच झोपी गेलो. रात्री बारा वाजता आमच्या बॅग्स आल्या आणि उबदार कपडे चढवले. त्यातच कळले की आमच्याबरोबर उमलिंग ला येणारे ३ रायडर्स अजूनही पोचले नाहीत व त्यांना शोधायला एक गाडी गेली आहे. खूप काळजी वाटली पण अखेर प्रचंड झोपने काळजीवर मात केली. 




दिवस २: सार्चू ते सो मोरीरी 

रात्री छान गाढ झोप झाली. टेन्टबाहेर येऊन कॅन्टीन मध्ये चहा पिताना त्या तिघांची चौकशी केली. त्यापैकी दोघे रात्री खूप उशिरा आले. तिसरा सकाळी आला व त्या सर्वांनी पुढील राईड न करण्याचे ठरवले. आजच्या राईडलाही उशीर होतोय हे पाहून थूप्सने आम्हाला पटापट तय्यार होण्यास सांगितले.आता आम्ही उरलो फक्त २ रायडर्स, तिसरा थुप्स हा आमचा कॅप्टन आणि पीकअप जीप मध्ये ड्रायव्हर, त्याचा साथीदार आणि दुसऱ्या रायडरचा मित्र जो रायडिंग न करता जीप मधूनच येणारा होता असे एकूण ६ जणच राहिलो. आमचे हे छोटे कुटुंब लगेच पुढील प्रवासाला रवाना झालो. थोड्याच वेळात सार्चु गाव आले. इथे मोबाईल नेटवर्क होते व यानंतर नेटवर्क ३ दिवसांनी मिळणार होते. महत्वाचे कॉल्स आटोपून राईड सुरू केली. कालचा हरवलेला राईडर सुखरूप होता, झोप पुरेशी झाली होती, कमी ऑक्सिजन मुळे होणारा त्रासही आता कमी झाला होता, रस्ता छान होता. . अश्या सर्व सकारात्मक गोष्टी मनात येऊन हुरूप वाढला होता. आता हिमाचल प्रदेश राज्याची सीमा ओलांडून लडाख मध्ये प्रवेश केला. स्वागत झाले प्रसिद्ध गाटा लूपस ने. २१ हेअरपिन वळणांचा हा घाट मस्तच आहे. काळजीपूर्वक, एका लयीत, आजूबाजूचे ट्रॅफिक सांभाळत ही वळणे घेताना मजा व थरार दोन्हींचा अनुभव होता. मुख्य म्हणजे रस्ता उत्तम होता. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (BRO) आभार मानावे तेवढे कमीच. आज निव्वळ त्यांच्या मुळे आपण सीमावर्ती भागात बाईक व कार घेऊन जाऊ शकतो. गाटा लुपस नंतर ४७०० मीटर्स उंचीवरील नकीला घाट पार केला आणि एक छोटा ब्रेक घेतला. आज सर्वांनी ठरवले होते की एकतर ब्रेक कमी घ्यायचे व घेतले तरी कमी वेळेचे घ्यायचे. नकीला नंतर लगेच ५००० मीटर्स वरील लाचुलुंग घाट आला. थूप्स आमची चौकशी करून काही त्रास होत नाही ना याची खातरजमा करत होता. ५००० मीटर्स ही ऑक्सिजनच्या दृष्टीने महत्त्वाची उंची होती व आम्ही दोन्ही रायडर्स तंदुरुस्त आहोत हे पाहून थूप्स आम्हाला थम्सअप देत होता.

 


नंतर आले पांग हे एक मोठे गाव जिथे आम्ही जेवायला थांबलो. नाश्ता व त्यावर बटर टी पिऊन थोडा आराम केला व पुढे निघालो. राईड छान चालली होती. छोटे कुटुंब असल्याने सुखी होते. थोड्याच वेळात आले प्रसिद्ध मूरे पठार. ४८०० मीटर्स उंचीवर असलेले आणि ४० किलोमिटर पसरलेले हे एक पठार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला विस्तीर्ण पसरलेला सपाट भूभाग, त्यापलीकडे हिमाच्छादित डोंगर व पठारावरून जाणारा हा सरळसोट एक्स्प्रेस हायवे दर्जाचा रस्ता. अतीसुंदर नजारा होता. अशी अफलातून राईड चालू असताना आपला स्वतःशीही एक संवाद सुरू असतो. समोरचे दृश्य डोळ्यात, मनात, हृदयात साठवत आपण वेगाने पुढे जात असतो. एखाद्या फुलाचा सुगंध जसा आपण साठवून ठेवू शकत नाही अगदी तसेच हे क्षणही त्याचवेळी समरसून अनुभवावे लागतात.

 


 मूरे पठार संपत आल्यावर मुख्य रस्त्यावरून आम्ही एके ठिकाणी उजवे वळण घेतले व कच्चा रस्ता सुरु झाला. मुख्य रस्ता तसाच पुढे तंगलांग घाट मार्गे लेहला जातो. आमचा कच्चा रस्ता म्हणजे एक पाऊलवाटच होती. आता आमचे खरे ऑफरोडींग सुरू झाले. कधी धुळीचा, कधी वाळूचा, कधी खड्डे पडलेला डांबराचा असे रस्ते प्रकार पार करत आम्ही सुमडो गावी पोचलो. वाटेत कुठेही वस्ती नव्हती. सूमदो मध्ये लेमन टी प्यालो. इथे सर्वत्र लेमन टी व बटर टी लगेच मिळतो. बटर टी तुमच्या शरीराला उबदार ठेवायला मदत करतो. आमचे आजचे गंतव्य स्थान सो मोरीरि अजून ५० किमी दूर होते. कॅप्टन म्हणाला २ तास लागतील. पुढील पूर्ण रस्ता ऑफरोड असल्याने आम्ही लगेच निघालो. तासाभराने कॅप्टनने ब्रेकचा इशारा केला व डावीकडे लांबवर एक तळे दाखवले. क्यागार नावाचे हे खूप सुंदर तळे मावळतीच्या रंगात न्हाऊन निघत होते. 

 




धुळीच्या लोटातून राईड सुरू केली व तासाभराने मोरीरी तळे दिसू लागले. थोड्याच वेळात तळ्याकिनारी असलेल्या कॅम्पला पोचलो. चहा पकोडेचा आस्वाद घेत रिलॅक्स झालो. लडाख मधील चांगथांग या अतीविशाल पठारावर वसलेल्या कोर्झोक या गावातील मोरीरी नावाचे हे तळे डोळ्यांना सुखवित होते. पराकोटीची शांतता, खूप थंडी व तळ्याच्या पाण्यात पडलेले चांदणे. आयुष्यात अजून काय हवे? सुख म्हणजे नक्की काय असते? असे प्रश्न डोक्यात येत असतानाच गिटार छेडल्याचा आवाज आला आणि पाय कॅम्पफायर कडे वळले. माहोल भारी होता. धगधगती शेकोटी, गिटारवर लडाखी संगीत, समोर चमकणारे तळ्याचे पाणी, गरमा गरम जेवण आणि तोंडी लावायला दिवसभराच्या रायडर्स गप्पा. . मजा आया.. . 




दिवस ३: मोरीरीं ते हानले 

सकाळी कॅम्प बाहेर बघतो तर थूप्स, छोस आणि थिनले बाईक सर्व्हिस मध्ये व्यग्र होते. लडाख सारख्या भूप्रदेशात फिरताना बाइक्स व्यवस्थित असणे अत्यंत महत्त्वाचे. नंतर चहा नाश्ता करून मोरिरि तळे जवळून पाहायला जवळच्या टेकडीवर राईड करत गेलो. संपूर्ण तळे, आम्ही राहिलो ते कोरझोक गाव आणि पैलतीरावरील आर्मी कॅम्पचे सुंदर दृश्य दिसत होते. भारतातील अती उंचीवर लोकवस्ती असणाऱ्या मोजक्या गावांमधे कॉर्झोकचा समावेश होतो. 

 




आजचा मुक्काम हानले या ठिकाणी असणार होता. त्या दिशेने राईड चालू केली. क्यागर तलावमार्गे सुमदो पर्यंत कालचाच ऑफरोड होता. पुढे वाटेत माहे नावाचे गाव व आणखी पुढे न्योमा नावाचे गजबजलेले ठिकाण आले. सुरुवातीचे आर्मीचे मोठाले कॅम्प पार करून आम्ही मुख्य बाजारात एका धाब्यावर जेवायला थांबलो. माझा आवडता थुपका हा पदार्थ मी जेवण म्हणून खाल्ला. मुख्य म्हणजे इथे मोबाईल नेटवर्क मिळाले व आमचा घरच्यांशी संपर्क झाला. गेले दोन दिवस आमची मस्त राईड चालू असताना तिकडे कुलू मनाली मध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता त्यामुळे घरचे चिंतेत होते. योग्य वेळी नेटवर्क मिळाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. पुढे जाऊन लोमा पूल पार करून ऱ्होनगो मार्गे हानलेच्या रस्त्याला लागलो. चांगले छान रस्ते कालपासूनच इतिहासजमा झाले होते. सुमडो ते लोमा पूल पर्यंत उजव्या हाताला अधेमधे सिंधू नदी दर्शन देत होती. आजचे पार करायचे अंतर तसे कमी होते आणि सकाळी वेळेत निघालो होतो त्यामुळे एकदम रिलॅक्स राईड सुरू होती.


 

लडाख हा प्रदेश अती उंचीवर असूनही तेथे पठारी भूभागाचे प्रमाण जास्त आहे. वातावरणातील प्राणवायू कमी असल्याने मोठी झाडे, जंगले नाहीतच. डोंगरही सगळे उघडे बोडके. जमीन सपाटीवर काही भागात थोडे गवत उगवते जिथे घोडे खेचरे गुरं चरत असतात. झाडे झुडुपांची कमतरता असली तरी तिथल्या देखाव्यांची मजा काही औरच. डोंगर टेकड्या वृक्षहीन असल्या तरी त्यांचे विविध रंग तुम्हाला स्तिमित करतात. एखादा डोंगर करडा असेल तर बाजुचाच चक्क जांभळा असतो. आणि तुम्ही जेव्हा बाईक वरून जात असता तेव्हा तुम्हाला समोरील जो साधारण १५० अंशाचा देखावा दिसतो तो निव्वळ अप्रतिम असतो. वाटते की ही राईड संपूच नये. 



 

हानले गावात शिरताना प्रथम आर्मी कॅम्प व चेकपोस्ट लागले. त्यानंतर पूर्ण गाव, छोटे धाबे, होमस्टे पार करून पुढे आल्यावर आमचे हॉटेल आले. हॉटेल, तिथल्या खोल्या, जेवण उत्तम होते. हॉटेलच्या एका बाजूला डोंगरावर हानले मॉनेस्ट्री तर दुसऱ्या बाजूला खूप लांबवर एका उंच टेकडीवर स्काय ऑब्सरवेटरी दिसत होती. आम्ही चहा पिऊन ताजेतवाने होऊन ऑब्सरवेटरी पाहायला निघालो. हे आकाश निरीक्षण केंद्र आतमधून फिरून पाहता येते. एक माहितीपटही दाखवतात. या केंद्राचे नाव इंडियन अस्ट्रानोमिकल ऑब्सरवेटरी असून हीचे संपूर्ण रिमोट कंट्रोलिंग बंगलोरहून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अस्त्रोफिजिक्स मार्फत केले जाते. येथील सर्वात वरच्या मजल्यावर एक महाकाय दुर्बीण असून रात्री तिची झडपे उघडली जातात व आकाश निरीक्षण केले जाते. याच धर्तीवर TIFR ने सुध्दा त्यांच्या दुर्बिणी वेगळ्या ठिकाणी बसवल्या आहेत. 



 

हॉटेलवर परतलो. जेवण आटोपून हॉटेलबाहेरील मोकळ्या जागेतून आकाश निरीक्षणाचा प्रयत्न केला पण ढगाळ हवेमुळे बेत बारगळला. हॉटेलला बाइकर्सची चांगलीच वर्दळ होती. 


दिवस ४: हानले ते उमलिंगला ते हानले

आजचा दिवस आणि आजची राईड महत्त्वाची होती. रोड चांगला डांबरी होता. साधारण १५ किमी नंतर जगातील ६ व्यां नंबरचा उंच फोटीला घाट सुरु झाला. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि हवेत चांगलाच गारठा होता. अंगावर दोन उबदार थर आणि त्यावर रायडिंग जॅकेट होते. फोटीला माथा पार करून घाट उतरायला सुरुवात केल्यावर एक ब्रेक घेतला. रस्त्यावर एकही गाडी दिसत नव्हती. पूर्ण घाट उतरल्यावर आर्मीच्या काझिरंगा कॅफे मध्ये सामोसे चहावर ताव मारला. फोटीला सारख्या अतिदुर्गम ठिकाणी एवढे मस्त सामोसे मिळणे हे फक्त आर्मीकॅफेमुळेच शक्य झाले. 

 




उमलिंग घाटमाथा गाठण्यासाठी सर्वजण उत्सुक होते त्यामुळे लगेच पुढे निघालो. वळणावळणांचा घाट रस्ता सुरु झाला. चढ चांगलेच तीव्र होते आणि एका पाठोपाठ एक अशी अतीवक्र वळणे येत होती. रस्ता मात्र खूपच छान होता. आजुबाजुचा देखावा अत्यंत रमणीय होता. विविधरंगी वृक्षहीन डोंगर, त्यांच्या डोक्यावर बर्फाची टोपी, डोंगर उतारावर व खालील दरीत चरणारे मेंढ्यांचे कळप, त्यांना हाकारे देणारे मेंढपाळ, हवेतील बोचरी थंडी, मध्येच होणारा छोट्या गारांचा वर्षाव आणि त्या गारांचा हेल्मेट वर होणारा आवाज, एका मागोमाग एक असे शांत लयीत, एकाच वेगाने रस्ता कापीत चाललेले आम्ही तिघे. . . पुरा माहौल बन गया था.. .

पुढील काही मिनिटातच आम्ही उमलिंग घाटाच्या माथ्यावर पोचलो. जगातील सर्वात उंच घाटावर (१९०२४ फूट) बाईकने पोचायचे स्वप्न सत्यात उतरल्याने मनात एक वेगळेच समाधान दाटून आले. भरपूर फोटोसेशन केले. बाजूलाच आर्मीचा एक कॅफे होता त्यात बसून कॉफीचे सावकाश घोट घेताना या राईडट्रीपसाठी केलेली तयारी डोळ्यासमोर तरळून गेली. 





 

इथे आर्मीने एक ऑक्सिजन कॅफेही उभारला आहे. कुणाला कमी प्राणवायूचा त्रास झाला तर त्वरित मदत मिळावी म्हणून केलेली ही सोय अत्यंत कौतुकास्पद आहे. उमलिंग वरून पुढे जाणारा रस्ता २० किमी वर डेमचोक येथे संपतो व त्यापुढे चीनची हद्द सुरू होते. एकूणच संपूर्ण लडाख मध्ये BRO ने बांधलेले रस्ते आणि आर्मीने केलेली विविध कॅफे व प्रथमोपचार केंद्रे यांची सोय हे सामान्य पर्यटकांवर मोठेच उपकार आहेत. लडाखमध्ये विविध दुर्गम ठिकाणी असणारे आपल्या सैन्याचे कॅम्पस, खूप खराब रस्ते असूनही त्यांच्या वाहनांची सततची वर्दळ, हवेत प्राणवायूची कमतरता असूनही सर्व ठिकाणी असणारी त्यांची उपस्थिती पाहून त्यांच्या घोष वाक्याची प्रचिती येते. ते म्हणजे - Your Lifetime Adventure Is Our Daily Routine.

एवढ्या उंचीवर दीर्घकाळ राहणे टाळायचे असते म्हणून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासाला कॅप्टनने वेगळा मार्ग निवडला. फोटीले गावापर्यंत तोच रस्ता पण नंतर फोटिले घाट न घेतां नुर्बुला घाटाकडे वळलो. आकाशात आता ढग गर्दी करू लागले होते. क्षितिजावर तर काळया मेघांची भिंतच उभी राहिली होती. थोड्याच वेळात नुर्बुला घाट माथ्यावरील एका व्ह्यू पॉइंट ला पोचलो. अफलातून नजारा होता. काळे ढग खाली येऊन अक्षरशः विविध डोंगर कड्यांबरोबर हस्तांदोलन करत होते. 

 



पुढे निघालो. एके ठिकाणी कॅप्टनने कल्पना दिली की आता रस्ता संपला आहे आणि आपल्याला माळारानावरून ऑफरोड रायडिंग करतच हान्लेला जायचे आहे. कधी जमीन, कधी वाळू तर कधी मातीचे भुसभुशीत ढिगारे यातून काळजीपूर्वक सफर चालू होती. मजाही येत होती. बाजूलाच गवताळ पट्ट्यात काही घोडे चरत होते आणि एका क्षणी बहुधा आमच्या बाईकचे फायरींग ऐकून ते घोडे उधळले आणि एखाद्या शर्यतीत धावतात तसे आम्हाला समांतर धावायला लागले. अत्यंत चित्तथरारक प्रसंग होता. मी वेगात बाईक चालवतोय आणि माझ्यापासून थोड्या अंतरावरच चौखूर उधळलेले घोडे धावतायात असा अत्यंत विलक्षण अनुभव होता. आमच्या पीकअप गाडीचा ड्रायव्हर थिनलेने त्याचे कौशल्य पणाला लावून आमचे रेकॉर्डिंग केले. सहजसाध्य नसणारे असे हे खूप दुर्मिळ व अमूल्य क्षण होते. माझ्या बाईक रायडिंग अनुभवातील अत्यंत सुंदर आणि चित्तथरारक अशी ही आठवण कधीच विसरता येणार नाही.


 

यथावकाश हानलेला पोचून मॉनेस्ट्रीला भेट दिली व हॉटेलवर आलो. जेवणानंतर आकाशनिरीक्षणाचा आजचा प्रयत्नही ढगाळ हवेमुळे फोल ठरला त्यामुळे लवकर झोपलो. रात्री २.३०-३ च्या सुमारास अचानक जाग आली. खिडकीचा पडदा उघडुन बाहेर आकाशात नजर टाकली तर अहो आश्चर्यम! स्वच्छ आकाश आणि भरपूर चांदण्या. तडक हॉटेलच्या बाहेर आलो. मिट्ट काळोखात हजारो चांदण्या चमकत होत्या. हानलेमध्ये येऊन चमचमणारे आकाश पाहायची इच्छा पूर्ण झाली. 


दिवस ५: हानाले ते मेरक (प्यागोंग)

हॉटेल कॅन्टीन मधून नाश्ता पॅकेट्स घेऊन आम्ही लवकरच हॉटेल सोडले जेणेकरून आरामात जाता येईल व वेळेत प्यांगौंगला पोचता येईल. लोमा पूलापर्यंत तोच रस्ता होता. पुढे न्योमाकडे न वळता चुशुल कडे जाणारा रस्ता पकडला. लोमा पुलाजवळील आर्मी कॅफे मध्ये आमचा पॅक नाश्ता खाल्ला. पुढचा रस्ता कधी खराब, कधी खूप खराब, मध्येच वॉटर क्रॉसिंग, दगडधोंडे, वाळू असाच होता. हा कंटाळवाणा टप्पा पार करून आम्ही रेझांगला युद्ध स्मारकाला पोचलो. १९६२ च्या चीन युद्धादरम्यान रेझांग घाटीवर मेजर शैतानसिंग व जवानांनी केलेला कडवा प्रतिकार आणि त्या दरम्यान त्यांना आलेले हौतात्म्य याची स्मृती म्हणून हे स्मारक बांधले आहे. पूर्वी हे एका छोट्या व साध्या स्वरूपात होते पण ४ वर्षांपूर्वी त्याचे नूतनीकरण झाल्याने आता चांगल्या रूपात आहे. तेथील नियुक्त जवानांनी आम्हाला विविध दालनांमधे फिरवून त्यावेळी झालेले युद्ध, तिथला बिकट प्रदेश, आपल्या सैनिकांनी केलेला पराक्रम याचे यथोचित केलेले वर्णन ऐकताना अंगावर काटा आला. तेथील भूप्रदेशाची व्यवस्थित कल्पना देणारे एक त्रिमितीय मॉडेल एका दालनात होते. ते नीट पाहिल्यावर ती लढाई किती कठीण होती याची चांगलीच कल्पना आली. मे. शैतानासिंग व तुकडीने केलेल्या अत्युच्च त्यागाबद्दल त्यांना शतशः नमन करून आम्ही भारवल्यावस्थेत स्मारकाबाहेर आलो. 



 

पुढे चुशूलला एका धाब्यावर जेवून ४ वाजता मेरक या ठिकाणी असलेल्या आमच्या कॅम्प मध्ये दाखल झालो. मेरकच्या २० किमी पुढे प्यांगोंग आहे. पण तिथे नेहमी असणारी गर्दी टळल्यामुळे आम्ही मेरक कॅम्पवर खुश होतो. लांबवर प्यंगोंग तळे दिसत होते. हा भूप्रदेश पूर्णपणे वाळूने व्यापलेला आहे त्यामुळे एखाद्या बीचहट मध्ये असल्याचा फील येत होता. संध्याकाळी तळ्याकिनारी एक चक्कर टाकून मावळतीच्या किरणांमधले तळ्याचे विविध रंग व आजूबाजूच्या डोंगरांच्या अनेकविध छटा अनुभवल्या.



दिवस ६: मेरक ते नुब्रा

सकाळी आरामात उठून चहा नाश्ता झाले. कॅम्प मालकाशी गप्पाटप्पा झाल्या. ते पेशाने शाळा शिक्षक असूनही पर्यटन व्यवसायात आपले नशीब अजमावत असल्याचे लक्षात आले. एक बाब मात्र सर्व कॅम्प मध्ये ठळकपणे जाणवली ती म्हणजे आचारी वर्ग पूर्णपणे हिमाचल प्रदेश किव्वा उत्तराखंडचा होता. 

आजची राईड सर्वात जास्त खडतर असणार याची कल्पना कॅप्टनने दिली होती. उजव्या हाताला असणाऱ्या प्यांगोंग् लेकचे दर्शन घेत आम्ही स्पांगमिक गाव पार करून पुढे आलो. रस्ता खूप खराब आणि वाटेत वॉटर क्रॉसिंग. तांगत्सेला जेवायला थांबलो तेव्हा खूप दिवसांनी पेट्रोल पंप पाहिला. हा पंप ४००० मी. उंचीवर असून जगातला सर्वात जास्त उंचीवरील पंप समजला जातो. आम्हाला लागणारे पेट्रोल/डिझेल आमच्या पिकअप गाडीत बॅरलमध्ये भरून आम्ही सारचुहून निघालो होतो. त्यानंतर आलेला हा पहिलाच पंप. 

 


जेवून दरमजल करीत २ तास राईड केल्यानंतर एका तिठ्यावर टीब्रेक घेतला. इथून समोरचा रस्ता खारदुंगलामार्गे लेहला जात होता तर उजव्या हाताचा रस्ता नुब्राकडे. आम्ही उजव्या हाताला वळलो. आता रस्ताही चांगला होता आणि पर्यटक वर्दळही खूप होती. ४ दिवसांनी एवढी वाहने आणि माणसे बघितली. गेले ४ दिवस अत्यंत तुरळक पर्यटक आणि खूप शांतता असणाऱ्या ठिकाणी फिरून आल्यानंतर आज आम्हाला आवाज, कोलाहल जाणवू लागला. कॅम्पला जाण्याआधी डिस्किट येथील प्रसिद्ध भव्य बुध्दमूर्ती व मॉनेस्ट्री पाहून जायचे ठरले. १०० फूट उंचीचा हा पुतळा खूपच देखणा आहे जो २०१० साली उभारला गेला. नंतर मॉनेस्ट्रीमध्ये गेलो. १५ व्या शतकातील ही वास्तू सुंदर व ऐतिहासिक महत्वाची आहे. मोनेस्ट्रीच्या पार्किंग एरिया मधून दिसणारे देखावे निव्वळ अप्रतिम होते. डाव्या हाताला दूरवर हुंदर व्हॅली दिसत होती जी शीत वाळवंट म्हणूनही प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगात निवडक ठिकाणी आढळणारे दोन मदारीचे उंट इथे दिसतात. 



 

थोड्याच वेळात आजच्या सुंदर कॅम्पला पोचलो. कँपच्या दोन बाजू उंच पर्वतांनी वेढलेल्या होत्या ज्यावरचे बर्फ संध्याकाळच्या उन्हात चमकत होते. छानपैकी चहापाणी घेत गप्पा मारत बसलो. उद्याची, शेवटच्या दिवसाची राईड तशी सोपी व कमी अंतराची होती. लेहला दुपारीच पोचून राईड संपवून प्रत्येकजण आपापल्या मार्गाला लागणार होता त्यामुळे आजची रात्र सर्वांनी धम्माल करायचे ठरवले. कॅम्पफायर व गाणी सोबतीला होतीच. शेकोटी विझली तरी पार्टी चालूच राहिली.



दिवस ७: नुब्रा ते लेह

झटपट आवरून नाश्ता करून निघालो. खार्दुंगला घाटाकडे जाणारा रस्ता सुरु झाला. सुरुवातीला चांगला पण नंतर रुंदीकरण कामामुळे रस्ता खराब होता. वाटेत २-३ नाले पार केले. जसजसा घाटमाथा जवळ येऊ लागला तशी थंडी चांगलीच वाढली. रस्त्याच्या बाजूचे डोंगर व त्यावरील बर्फ अतिसुंदर दिसत होते. एकतर रस्ताकाम चालू होते त्यात वाहनांची वर्दळ, डाव्या बाजूला डोळे गरगरवणारी खोल दरी, त्यापलीकडचे अंगावर येणारे डोंगर, रस्त्याला रेलिंग नाही. अशी राईड करत घाटमाथ्यावर पोचलो. बघतो तर तिथे ट्रॅफिक जाम आणि माणसांची नुसती जत्रा. मूडच गेला. आम्ही एकमेकांना डोळ्याने इशारे करून इथे ब्रेक घ्यायचे रद्द केले. थोड्याच अंतरावर एका मस्त ठिकाणी थोडी विश्रांती घेऊन घाट उतरू लागलो.

 



आता रस्ता चांगला होता. हळूहळू दूरवर लेह शहर दिसू लागले. आता थोड्याच वेळात हॉटेलला पोचणार याचा आनंद होता पण त्याचबरोबर ही सुंदर राईड संपणार याची एक हुरहूरही होती. पुढचे २ दिवस लेहला थांबून मस्त आराम केला कारण पुढे श्रीनगरला जाऊन 'तारसर मारसर' हा ट्रेक करायचा होता. तो ट्रेकही मस्त झाला. त्याविषयी अधिक पुन्हा कधीतरी. 


 

काही वर्षांपूर्वी मिनीबस मधून केलेली लडाख ट्रीप छानच झाली होती पण यावेळी लडाखचे वेगळेच रूप व रंग पाहता आले. कोर्जोक, हानले सारख्या खूप अंतर्गत भागातून फिरल्याने तिथल्या अनोख्या सौंदर्याबरोबरच तिथल्या आव्हानांचीही कल्पना आली. रोजच्या जीवनात अत्यंत अल्प गरजा ठेवून हसतमुखाने आव्हानांचा सामना करणाऱ्या तेथील स्थानिक देशबांधवांच्या अफाट जिद्दीला सलाम करतो आणि थांबतो.