Tuesday, 2 May 2023

वोह सात दिन (Being Camp leader in Nilgiri Forest)

पार्श्वभूमी

जानेवारीमध्ये आम्ही केलेल्या सायकल सफारीवेळी मनोहर सरांशी भेट झाली. ४ दिवस नेहमी होत असलेल्या ट्रेकिंगविषयक विविध गप्पांमधून त्यांनी हॉस्टेलसाठी अनुभवी ट्रेकर्सची कॅम्पलिडर म्हणून किती गरज आहे हे समजावून सांगितले. आम्हीही विचारपूर्वक ही सेवा करायचे ठरवले. आतापर्यंत हॉस्टेल बरोबर केलेल्या ट्रेक्समध्ये एक प्रामुख्याने आढळलेली बाब म्हणजे विविध कॅम्पचे कॅम्पलीडर. कोणताही मोबदला न घेता निव्वळ ट्रेकिंग कम्युनिटीची सेवा म्हणून भारतातील विविध ठिकाणाहून आलेले हे एक प्रकारचे सेवेकरीच. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून आणि त्यांची त्या ठिकाणची भूमिका व जबाबदारी लक्षात घेता त्यांचे नेहमीच कौतुक वाटायचे. एवढी मोठी जबाबदारी पार पाडणे आपल्याला जमेल की नाही ही शंका मनात होती पण मनोहर सरांनी आम्हाला आत्मविश्वास दिला. कॅम्पलीडर होण्याकरिता लागणारे निकष आम्ही पूर्ण करीत होतो. त्यानंतर आवश्यक असणारी इतर औपचारिकता पूर्ण केल्यावर आम्हाला कॅम्पलीडर होण्यासाठी हिरवा कंदील मिळाला. 


Day Zero

उटी पासून १५-२० किमी अंतरावरील शोलुर नावाचे छोटे टुमदार गाव आहे जिथे आमचा बेसकॅम्प होता. एक टापटीप, स्वच्छ, नीटनेटके गाव. गावातील घरेही एकदम सुंदर सजावट केलेली. आजूबाजूला चहाचे मळे असल्याने गावाची आर्थिक स्थिती चांगली आहे असे कळले. . . त्याचाच प्रत्यय तेथील छान छान घरांवरून येत होता.

आदल्या दिवशी संध्याकाळी उशिरा दिल्लीहून १२ आचारी बेसकॅम्पला हजर झाले. त्यांनी आल्या आल्या जवळपास ४० जणांचे जेवण बनवले व सर्वांची जेवणे झाल्यावर एकूण ६ कॅम्पसाईटला ८ दिवस लागणारे सर्व किराणा साहित्य आमच्यासारख्या कॅम्पलीडरच्या मदतीने बाजूला काढण्यात आले, ज्यात अगदी मिठापासून तेलापर्यंत आणि कोथिंबीर पासून सर्व प्रकारच्या भाज्या, सर्व पिठे, मसाले इत्यादी इत्यादी पदार्थ होते. ८ दिवसांचा तात्पुरता संसार ६ वेगवेगळ्या ठिकाणी थाटायचा होता व ८ दिवसांनी पुन्हा आवरून इथेच शोलूरला आणायचा होता. सर्व कॅम्पचा रोजचा मेनू फिक्स होता त्यामुळे त्याप्रमाणे सगळे साहित्य विभागले होते. . . या सर्व व्यापात ३ तास कधी गेले कळलेच नाही. आलेली सर्व आचारी मंडळी त्यांच्या कामात किती उत्तमरीत्या निष्णात आहेत याची प्रचिती आली. खूप रात्र झाली तशी मात्र सर्वांनी आपापली जागा पाहून पथारी पसरली.

आज सकाळी उठल्या उठल्या मुख्य काम होते ते म्हणजे कँपसाठी लागणारे बाकी सर्व साहित्य जसे की जेवण बनवायची भांडी, मोठमोठाली पातेली, झोपण्याची ब्लँकेट, खाली घालायच्या स्लीपिंग म्याट वगैरे वगैरे सामान बाजूला काढणे. आचारी टीम एवढी एक्स्पर्ट होती की त्यांना फक्त एकदा मेनू वाचून दाखविल्यावर त्यांनी झटपट आपापल्या सोयीची भांडी बाजूला काढणे सुरू केले. बेसकँप मधील देखावा बघण्यासारखा होता. जवळपास डझनभर आचारी भांड्यांच्या भल्यामोठ्या ढिगातून गरजेची भांडी जमवत होते. सर्व कॅम्पलीडर हातातील वहीमध्ये बाजूला काढलेले सर्व सामान व किरणामाल यांची यादी बनवत होते.




 
सर्व साहित्य एका बाजूला काढून आम्ही हुश्श झालो. आम्ही सर्व १२ कँपलीडर गप्पाटप्पा करत ट्रकची वाट बघत होतो. बहुतांशी लीडर्स तामिळनाडू, कर्नाटक मधील विविध ठिकाणाहून आलेले ज्येष्ठ नागरिक होते. सरकारी नोकऱ्या, बँका किव्वा इतर विविध क्षेत्रातून उच्च पदावरून निवृत्त होऊन आता ते गेले काही वर्षे स्वयंसेवक म्हणून काम करीत असल्याचे कळले. सर्वजण हाडाचे ट्रेकर्स होते आणि या वयातही ट्रेकिंग, सायकलींग वगैरे मध्ये सहभागी होणारे होते. ट्रक आला व त्यात आमच्या कॅम्पचे व आणखीन एका कॅम्पचे साहित्य चढवून आम्ही आमच्या कँपच्या दिशेने म्हणजेच 'पारसन व्हॅली' कडे निघालो. बाहेर स्वच्छ ऊन होते पण हवेत गारवा असल्याने त्रास होत नव्हता. ट्रकच्या मागच्या हौदात बसून आचारी लोकांबरोबर गपशप करीत प्रवास सुरू होता. रस्त्याच्या दुतर्फा निलगिरीची दाट झाडी होती आणि तेवाढयात अचानक मला निलगिरी लंगुर जातीच्या माकडांची एक टोळी दिसली. संपूर्ण अंगभर काळेभोर केस व चेहरा मात्र पांढरा तांबूस केसांचा. ही माकडे फक्त याच परिसरात आढळतात व यांची गणना लुप्त होत जाणाऱ्या प्रजातींमधे झालेली आहे. तासाभरात आमच्या कॅम्पला पोचलो. आचारी लोकांनी सर्व साहित्य खाली उतरवून घेतले  व लगेच किचन खोलीचा ताबा घेऊन दुपारचे जेवण बनवायला चालुही केले. आमची कॅम्पसाईट आम्हाला बघताक्षणीच आवडली. आम्ही दोघांनी सर्व कॅम्पसाईट नीट फिरून पहिली व काय काय व्यवस्था करावी लागेल याची मनोमन नोंद केली. तोपर्यंत जेवण तयार झाले व आम्ही एकत्र मिळून जेवणाचा आस्वाद घेतला. नंतर बाहेरच्या बाकड्यावर बसून आजूबाजूची गर्द झाडी, दुपारच्या निरव शांततेत हरवून गेलो.

 


संध्याकाळी बेस कॅम्पला रिपोर्ट करण्यासाठी नेटवर्कच्या शोधत बाहेर पडलो. १ किमी अंतरावर एक छोटी टेकडी चढून नेटवर्क मिळणार होते. पुढील ८ दिवस ही पायपीट नेहमीच करावी लागणार होती. तिथे पोचेपर्यंत दुपारचे स्वच्छ ऊन गायब होऊन हवेत गारठा जाणवू लागला. जॅकेट चढवायला हवे होते असे सारखे वाटत राहिले. रेपोर्तींग व इतर वैयक्तिक फोनाफोनी आटोपून आम्ही कॅम्प मध्ये परतलो. 

 

 

आमची खोली कम ऑफिस नीट लावून, जेवणे आटोपून बाहेरच्या बाकड्यावर बसलो आणि वर आकाशात बघितले तर एकदम बढिया नजारा होता. आकाश चांदण्यांनी नुसते फुलून गेले होते. आमचा कॅम्प फॉरेस्ट भागात असल्याने आजूबाजूला वस्ती नव्हती त्यामुळे मिट्ट काळोख होता. आकाश दर्शनासाठी अत्युत्तम. दिवसभराच्या दगदगिने डोळ्यावर पेंग आली तसे आम्हीही निद्रेच्या आधिन झालो.


वोह सात दिन

आदल्या रात्री लवकर झोपल्याने सकाळी लवकरच जाग आली. बाहेर चांगलाच गारठा होता. १०-१२ डिग्री सेल्सिअस तापमान असावे. आचारी सहकाऱ्यांनी चहा झाल्याची वर्दी दिली व चहाचा वाफाळता कप हातात घेऊन कँपशेड समोरील बाकावर येऊन बसलो. आजूबाजूच्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता आणि तो ऐकत चहाचे घोट घेऊ लागलो. सूर्य हळूहळू वरती येऊ लागला आणि डोक्यात दिवसभरात उरकायच्या कामांची उजळणी सुरू झाली. . .

मुख्य कार्यक्रम असा होता की ६ दिवसांचा एक ट्रेक होता ज्यात रोज स्त्रीपुरुषांची साधारण २० जणांची एक एक तुकडी आमच्या कॅम्प मध्ये येऊन, रात्री राहून, दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून, पॅक लंच घेऊन पुढील कॅम्पला रवाना होणार होती. मी व केतकी यावेळी स्वतः ट्रेक न करता एकाच कॅम्पमध्ये मुक्काम ठोकून कॅम्पलीडरची भूमिका पार पाडणार होतो. एकूण मिळून ६ कॅम्प होते व प्रत्येक ठिकाणी आमच्यासारख्या २-२ स्वयंसेवकानी कॅम्प लीडरची जबाबदारी घेतली होती. 

कामगार मंडळीने सर्व भांडी व इतर साहित्य कालच स्वच्छ केले होते. आजचे मुख्य काम होते अंथरूण तयार करणे, उपलब्ध बाथरूम टॉयलेटची स्त्री पुरुष विभागणी, कॅन्टीन वेळापत्रक बनवणे इत्यादी होते. पहिली तुकडी दुपारनंतर कधीही येणे अपेक्षित होते त्यामुळे आम्ही भरभर आवराआवर केली. संध्याकाळी ६ वाजता पहिली तुकडी पोचली. त्यांच्यासाठी जसा ट्रेकिंगचा पहिलाच अनुभव असणार होता तसाच आमच्यासाठी कॅम्पलीडरचा. वेलकम ड्रिंक ने स्वागत करून नंतर सूप व जेवण सुखरूप पार पडले. छोटी शेकोटी पेटवून आलेल्या ग्रुपच्या गप्पाटप्पा सुरू झाल्या व आम्हीही हुश्श केले. . . 

 



दुसऱ्या दिवशी कुडकुडत्या थंडीत सकाळी ५.३० ला उठून किचनमध्ये येऊन पाहतो तर आचारी चहाचे आधण ठेवतच होते. ६ वाजता सर्वांना चहाची वर्दी दिली व मी चहाचे घोट घेत बाकड्यावर येवून बसलो. थोड्या वेळाने नाश्ता मांडला गेला व त्यांनतर आमच्याकडे आलेली पहिली बॅच ट्रेकसाठी रवाना झाली.

या सर्व बॅचचे वैशष्ट्य असे की ते साधारण ट्रेकर्स नसून, इंडियन civil services जसे की आयएएस, आयपीएस वगैरे UPSC परीक्षा पास होऊन आलेले भावी सरकारी अधिकारी बाबू होते. ट्रेकिंग हा त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग होता व त्यांनतर काही दिवसातच ते देशभरात उच्च पदावर नियुक्त होणार होते. सरासरी वय होते २५-३० च्या दरम्यान.

यापुढील सर्व बॅचेसचा दिनक्रम साधारण याप्रमाणेच होता. कधीतरी थोडेफार मागेपुढे. आमचाही दिनक्रम ठरून गेला होता. आधी वाटले होते की दिवसभर करायचे काय पण नंतरचे ७ दिवस कधी आले आणि गेले समजलेच नाही. ही सर्व मंडळी तशी खास केंद्र सरकारशी संबंधित असल्याने व्यवस्था चोख ठेवायचे एक दडपण होते. उपलब्ध साधन सामुग्री व मनुष्यबळ यावर सर्व डोलारा सांभाळायचा होता.

प्रत्येक बॅचचा एकेक नवनवीन अनुभव होता. तसे पाहिले तर सर्वजण मज्जा धम्माल करत होते. काहींची कुरबुर चालू असायची पण परिस्थितीची जाणीव करून दिली की ठीक व्हायचे. २-३ बॅचेस ने शेकोटीची मजा घेतली तर एका बॅचने क्रिकेटचा आनंद लुटला. एक बॅच तर खूप उशिरापर्यंत पत्त्यांचा UNO खेळ खेळत बसले तर एका बॅचने चक्क अंगणात पथारी पसरून आकाश दर्शनाचा आनंद लुटला. खूप खूप शिकलेली आणि मेहनत करून UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण झालेले हे ऑफिसर्स भारताचे भविष्यातील पॉलिसी मेकर्स होते. प्रत्येक बॅचसोबत AK47 धारी २ खास कमांडोज असायचे. ट्रेक करतानाचा मार्ग दाखवायला फॉरेस्ट विभागाचे गार्ड असायचे. आमच्याशी मात्र सर्वजण खूप आदराने वागायचे व बोलायचे. त्यांना प्रचंड उत्सुकता असायची की आम्ही कुठलेही मानधन न घेता एवढ्या लांबून स्वयंसेवक म्हणून का आलोय. रात्रीच्या जेवणावेळी आमचा गप्पांचा फड जमायचा. या सर्वांकडून आम्हालाही खूप शिकण्यासारखे होते. काही मुले मुली ग्रामीण भागातून कठोर परिश्रम करून येथपर्यंत पोचली होती. त्यांच्या देहबोलीतून आणि वर्तनातूनही ते जाणवायचे. अशीच एक सातारा जिल्ह्यातील एका गावातून पुढे आलेली ऑफिसर होती. मराठी बोलायला मिळाल्याने आम्हाला व तिलाही खूप छान वाटले. 

 

 

या सर्व डोलाऱ्याचे मुख्य आधारस्तंभ होते आमचे २ आचारी व त्यांना तत्पर मदत करणारे २ सफाई कर्मचारी. आचारी मंडळी तर सतत व्यग्र असायची. त्यांचे टाइम मॅनेजमेंट एवढे चोख असायचे की ठरलेल्या वेळेच्या ५-१० मिनिटे आधीच चहा नाश्ता जेवण तैय्यार असायचे. रोज एक असे ६ दिवस येणाऱ्या ६ बॅचेसना प्रत्येक कॅम्पला वेगवेगळा मेनू मिळणार असल्याने आमच्या कँपचा मेनू एकच एक राहणार होता. रोज सकाळी नाश्त्याला पोहे व शेवया खीर, रोज संध्याकाळी स्नॅक्सला बटाटेवडे, रात्रीच्या जेवणाचा मेनूही रोज नेहमीचाच.   दुपारी जेवणारे मात्र आम्ही ७-८ जणच असायचो. दुपारच्या जेवणासाठी बाबूलाल आमची फर्माईश विचारायचा व काहीना काही खास पदार्थ बनवला जायचा. असेच एकदा दुपारी त्याने अप्रतिम असे 'मुली के पराठे' खीलवले. सफाई कर्मचारी हे जरा वयस्कर नवरा बायकोचे जोडपे होते. दररोज काय काय काम करायचे आहे याची त्यांना पहिल्याच दिवशी नीट माहिती दिल्यावर नंतर सर्व दिवस त्यांनी चोख काम केले. भाषेची अडचण पहिल्या दिवशी वाटली पण नंतर मात्र खाणाखुणा करून आमचा एकमेकांशी उत्तम संवाद झाला.

 



आमच्या रोज कमीतकमी २ खेपा नेटवर्क मिळण्यासाठी व्हायच्या. तसेच सकाळी छोटी फेरी गावात टाकून यायचो. यादरम्यान आम्हाला तिथल्या विपुल वनसंपदेचे दर्शन व्हायचे. कधी एखाद्या घरासमोर येऊन बागडणारी हरिणे तर कधी बाजूच्या गर्द झाडीतून बाहेर येऊन रस्त्याच्या मधोमध उभा राहिलेला मोठा रानडुक्कर दिसायचा. ठराविक झाडांवर बसलेले निलगिरी लंगुर्स तर नित्याचे सोबती होतेच. या माकडांचे ओरडणे वैशिष्ठ्यपूर्ण होते व ते खासकरून दुपारी ऐकू यायचे. एका सकाळी आम्ही एका नवीन वाटेने चालायला गेलो तर हिमालयन रासबेरी प्रकारच्या बेरीचे घोस लगडलेले दिसले. अत्यंत नाजूक आणि आंबटगोड चवीच्या या बेरींनी आमची सकाळ गोड केली. आमच्या पुढील कँपकडे जाण्याच्या वाटेवर एक छोटे धरण होते. ते पाहण्यासाठी आम्ही दोघे एक ट्रेकर्स बॅचबरोबर तिथेपर्यंत जाऊन आलो. याच धरणाच्या पायऱ्यांवर 'रोजा' या हिंदी सिनेमातील शेवटच्या दृश्याचे चित्रीकरण झाले होते. आजूबाजूला विस्तीर्ण भागात निलगिरी वृक्षराजी पसरलेली होती पण निलगिरीचा सुगंध मात्र एखादे पान चूरगल्यावरच यायचा. खासकरून एखादे सुकलेले पान चूरगळले तर चांगलाच तीव्र वास यायचा. 




 





आमच्या कॅम्पमधील हे सात दिवस आमच्यासाठी अत्यंत अविस्मरणीय राहिले. आमचा कॅम्प, आजूबाजूची गर्द निलगिरी झाडी, त्यावरचे ते लंगूर्स, एप्रिल महिना असूनही दिवसभर असलेला गारठा, रात्रीचे स्वच्छ सुंदर चांदण्यांनी भरलेले आकाश हे सर्व कायमचे आठवणीत राहील. आमचे आचारी व सफाई कर्मचारी यांच्याशी तर एवढे सख्य जमले की त्यांचा निरोप घेताना नकळत डोळे पाणावले. आमच्या कॅम्पला भेट देऊन गेलेले सर्व ऑफिसर ट्रेकर्स, त्यांच्याबरोबर असणारे कमांडोज, कॅम्पच्या सुरक्षिततेसाठी नेहमी हजर असणारे फॉरेस्ट विभागाचे गार्ड या सर्वांबरोबर झालेल्या गप्पातून खूप माहिती मिळाली व शिकायलाही मिळाले. या सर्व UPSC ऑफिसर्सच्या ट्रेनिंग संस्थेचे पदाधिकारीही अधेमधे कॅम्पला भेट देत असत. कॅम्पलीडरची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल एक स्त्री म्हणून केतकीचा ट्रेनिंग संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. उटीमधील व बेसकॅम्प शोलुर मधील आमचे सर्व ज्येष्ठ अधिकारी व इतर लीडर्स यांच्या मार्गदर्शनामुळे ही जबाबदारी पेलायचा आत्मविश्वास मिळाला. त्याबद्दल त्यांचे अनेक आभार.



Sunday, 12 March 2023

बुलेट ट्रीप - दांडेली



२०२१ चा जानेवारी संपत आला होता. कोविडमुळे गेले काही महिने घरात अडकून पडल्याने मन अस्वस्थ होते. रत्नागिरीहून निघून गोवामार्गे एखादा अपरिचित घाट बुलेटने चढुन सह्याद्री पार करायचा व दुसऱ्या एखाद्या अश्याच नवीन घाटाने समुद्रकिनारी उतरायचे असा कच्चा बेत अनेक दिवस घोळत होता. विचार करून ठरवले की लगेच निघू. कमीत कमी सामान व कोवीडबाबतची जास्तीत जास्त दक्षता घेउन प्रस्थान केले. काही वर्षांपूर्वी कारने दांडेली भाग पालथा घातला होता. रस्ते छान होते म्हणून तिकडे जायचे पक्के केले.

पहिल्या दिवशी साधारण २५० किमी पार करुन गोव्यात पोचलो. तसा सोपा पेपर होता कारण अर्धा रस्ता नेहमीचा माझ्या मूळ गावी मिठबावला जाणारा माझ्या बुलेटच्या टायरखालचा सागरी महामार्ग होता. गावी थोडा वेळ थांबून, जेवण करून आचरा मार्गे कणकवलीला हायवेला बाहेर आलो. तिथून पुढे मळगाव पर्यंत नवीनच झालेल्या फुल्टु मस्त हायवेने राईड झाली. नंतर विचार केला की गोव्यात हायवेने न जाता आरोंदा मार्गे जावे. जरा आतला वेगळा व शांत रस्ता. या ट्रीप मध्ये एक गोष्ट पक्की केली होती ती म्हणजे स्पीडने जाण्यापेक्षा आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य पाहत त्याची मजा घेत जायचे.  गावागावातून जाणारा शांत रस्ता पार करीत आरोंदाला पोचलो. किरणपाणी पुल पार करून गोयनगरित प्रवेश केला. आरंबोलला एका बीच कोटेजला मुक्काम  केला.  सागरकिनारी पायांशी स्पर्श करणाऱ्या लाटा व मंद वारा अंगावर घेत रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेतला व झोपी गेलो.

 



दुसऱ्या दिवसाचा प्रवास ठरल्या वेळेत सुरु केला. बिचोलीला (डिचोली) नाष्टा केला. When in Rome, be a Roman या उक्तीप्रमाणे टिपिकल गोवन नाष्ता झाला. कडक पाव + मिक्स पातळभाजी + चहा + बन. पध्दतशीर पेटपुजेनंतर पुढील राईड सुरु केली. सांखळी गाव पार केल्यावर रस्ता शांत झाला. साखळीहून चोरला घाटाचा रस्ता न घेता मोल्लेच्या दिशेने निघालो. एकतर सुशेगात गोवा, सकाळची वेळ, त्यांत तिथले खड्डेरहित छान रस्ते, ट्रॕफिक कमी आणि बुलेटवर स्वार . . . और क्या चाहिये. . .  सुसाट निघालो. वाटेत ओळखीचं मोल्ले गाव लागलं. २ वर्षापूर्वी इथुनच दुधसागर ट्रेक केला होता त्याची आठवण ताजी झाली. गाव पार करता करता डाव्या बाजुला मोठा बोर्ड दिसला- 'मोल्ले बायोडायव्हर्सिटी पार्क'. चौकशीअंती कळले कि याचे उद्घाटन होणे बाकी आहे. २ महिन्यांत चालु होईल. छोटा फेरफटका मारला. छान बनवलंय. संधी मिळाली तर नक्की पहा.

 

'अनमोड' नावाचा घाटरस्ता सुरु झाला. घाटाचा काही भाग तर चक्क कॉंक्रीटचा बनवलेला दिसला. त्यामुळे अपेक्षेपेक्षा खूपच सुखकर प्रवास झाला. 'भगवान महावीर' अभयारण्यातुन जाणारा हा मस्त वळणदार घाट आहे. अवजड वाहतूक बऱ्यापैकी होती पण आंबा व कुंभार्ली घाटातील खड्डेरस्त्यांना कंटाळलेल्या बुलेटसाठी हा रस्ता एकदम मख्खन होता. एका मोठ्या वळणावर 'श्री दुधसागर आजोबा मंदिर' आले. थांबून दर्शन घेतले आशीर्वाद घेउन पुढे निघालो. 



घाटमाथ्यावर पोचलो तसे अनमोड चेकपोस्ट आले. कर्नाटकात प्रवेश झाला होता आणि तेथील पोलिसांकडुन कडक तपासणी सुरु होती. माझ्याजवळ येउन, गाडीचा नंबर पाहुन माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने 'ड्रिंक्सं यंड्रा' अशी काहीतरी त्याने कन्नड पृच्छा केली. ड्रिंक्स शब्दावरून "मद्याच्या बाटल्या बॕगेत आहेत का" असा प्रश्न असावा असे समजून मी मराठीत नाही नाही म्हटले व माझे शिरस्त्राण काढले. माझा सालस, निरागस चेहरा पाहताक्षणी त्याने सुहास्यवदनाने पुढे जाण्यास सांगितले. . .  योगायोग म्हणजे तो दिवस ३० जानेवारी होता. 

दांडेलीला जिथं राहणार होतो तिथल्या मॕनेजरने सुचवल्याप्रमाणे मेनरोडने सरळ रामनगरला न जाता कॕसलरॉक मार्गे आडरस्त्याने निघालो. अरुंद पण उत्तम रोड. रहदारी जवळपास शून्य. थोडा एकलकोंडा पण अफलातुन रस्ता होता. दोन्ही बाजुला घनदाट झाडी व जंगलाला कापत जाणारा रस्ता. अविस्मरणीय अशी राईड झाली. जगलबेट नावाच्या गावी मुख्य रस्त्यावर बाहेर आलो व थोड्याच वेळात दांडेलीला माझ्या रिसॉर्टला पोचलो. एक छोटेखानी रिसॉर्ट, गर्द झाडीत लपलेल्या टुमदार कॉटेज, उत्तम स्वागत व रुचकर जेवण. . . एकदम भारी वाटले. थकवा निघून गेला. मस्तपैकी जेवलो आणि झोपेच्या आधीन झालो.


संध्याकाळी रिसॉर्ट मधील हर्बल चहा पिऊन बुलेट चालू केली. रिसॉर्ट मालकाचा मधमाशी प्रकल्प पाहायला गेलो. तिथल्या स्वयंसेवकांनी छान माहिती दिली. जगभरात मधामाश्यामार्फत सततच्या होणाऱ्या परागीभवन क्रियेचे मानवी जीवनातील महत्त्व ऐकून चक्रावून गेलो. अर्धा किलो मध जमवायला एका माशीला साधारणपणे ८०००० किमीचे अंतर (म्हणजेच पृथ्वीला २ प्रदक्षिणा) कापावे लागते हे ऐकून अचंबित होत बुलेट चालू केली. या ट्रिपचा मुख्य उद्देश बुलेट राईड व जमेल तेवढेच साईटसीईंग असल्याने दांडेलीमधील इतर ठिकाणांकडे पाठ वळवली. तसेही याआधीच्या कारट्रीपमध्ये दांडेली बऱ्यापैकी फिरून झाले होते. रिसॉर्टला परतलो व तिथली प्रॉपर्टी व्यवस्थित फिरून पहिली. विविध वृक्षवेली, फुलझाडे, अनेकविध पक्षी व फुलपाखरे पाहण्यात संध्याकाळ सरून रात्र सुरू झाली. हवेत मस्त गारठा होता आणि थोड्याच वेळात कॅम्पफायर चालू झाली. जेवणे आटोपून कॉटेजच्या गॅलरीत बसलो. रात्रीच्या निरव शांततेचा आनंद घेताना डोळ्यात झोप शिरली आणि मी अंथरुणात शिरलो. 

 



सकाळी फ्रेश होऊन रिसॉर्ट मालकाबरोबर बाजूच्या जंगलात एक छोटा ट्रेक करून आलो व नाश्ता केला. बुलेटला सलाम ठोकून बॅगा चढवल्या आणि बुलेट चालू केली. सकाळच्या गारठ्यात गाडीला थोडा वेळ तापवल्यावर रिसॉर्टला टाटा करून कारवार कडे निघालो. 

 


जोयडा गाव पार करून अंशी नॅशनल पार्कच्या दिशेने कूच केली. सुंदर रस्ता आणि साथीला बुलेट. रायडिंगचा निखळ आनंद घेत प्रवास उत्तम सुरू होता. Happiness Is Not In The Destination But In The Journey या वाक्प्रचाराचा पुरेपूर अनुभव येत होता. काल अनमोड घाटाने सह्याद्री चढून वरती आलो तसाच आज अंशी घाटाने कारवारला उतरणार होतो. घाट सुरू झाला आणि दिल खुश हो गया. मस्त बांधलेला काँक्रिटच्या घाटातून बुलेट चालवणे म्हणजे एक भारी अनुभव होता. यथावकाश कारवारला पोचलो. जेवण करून सदाशिवगड गाठला व गडावरील हॉटेलमध्ये डेरा टाकला. कसला भारी अफलातून नजारा होता हॉटेल रूममधून. पैसा वसूल हॉटेल आहे. जरूर जा. संध्याकाळी कारवार शहरात बुलेटने फिरलो. जेवण करून हॉटेलवर आलो. हॉटेल उंचावर असल्याने खालील खाडी, त्यावरील मोठ्ठा पुल जबरदस्त दिसत होता. आकाशदर्शन सुध्दा चांगले झाले. 

 




सकाळी पुन्हा कारवार शहरात शिरलो. तिथले भव्य मासळी मार्केट पाहिले. नंतर वॉरशिप म्युझियम व टागोर बीच पाहून गोव्याकडे कूच केले. वाटेत माजली बीच पहिला. एक शांत सुंदर किनारा व समुद्रात उभ्या असलेल्या रंगीबिरंगी होड्या. हा नजारा कायमचा लक्षात राहील. 


जसजसा गोव्यात शिरू लागलो तसे ट्रॅफिक वाढू लागले. काणकोण पर्यंत ठीक होते पण पुढे मडगाव पार करेपर्यंत अगदीच कंटाळा आला. २-३ वाजता कांडोलिमला पोचलो आणि बीचवरील झोपडीत जाऊन विसावलो. आजच्या राईडमध्ये सगळेच अनुभव आले. सकाळी कारवार, माजली आणि गालजिबागचे सुंदर बीच, कारवार ते गोव्याचा सुसाट रस्ता, मडगावचे ट्रॅफिक आणि दुपारचे कडक ऊन. 






सकाळी आरामात उठून बुलेटला स्टार्टर मारून रत्नागिरीला निघालो. आज राईडचा शेवटचा दिवस. एकीकडे घरी जायची ओढ पण त्याचवेळी ही अविस्मरणीय राईड संपणार याचे दुखःही होते. पेडणे, पत्रादेवी मागे टाकून आपल्या महाराष्ट्रात प्रवेश केला. झाराप कुडाळ कणकवली तलेरे सुसाट पार करताना मस्त मजा येत होती पण त्याचवेळेस या रस्त्यावरील दोन्ही बाजूला असलेली गर्द झाडी नष्ट झाल्याने मन खिन्न झाले होते. नाईलाज को क्या इलाज. . .असो. . आज माझ्या बुलेटचे १०००० की.मी. पूर्ण झाले.


आपल्या रत्नागिरीत प्रवेश केला आणि खड्डेमय रस्त्याने केलेल्या स्वागताने गहिवरून आले. गेले ४ दिवस छान छान रस्त्यावर राईड करतानाची डोक्यात गेलेली नशा खाडकन उतरली. हे सर्व अनुभव घेता घेता डोक्यात मात्र पुढील राईड कुठे करायची याची चक्र चालू झाली होती. यथावकाश घरी पोचलो आणि बुलेटचे मनोमन आभार मानून तिला नमस्कार केला.

सलग पाच दिवस केलेल्या या पहिल्या राईडने मला आत्मविश्वास तर दिलाच तसेच भविष्यात केलेल्या याहीपेक्षा मोठ्या राईडचा पायाही याच राईडमध्ये रचला गेला. संपूर्ण राईडमध्ये माझ्या पत्नीने बुलेटवर माझ्या पाठी बसून मला नेहमी प्रोत्साहन दिले त्याबद्दल तिचे आभार मानावे तेवढे कमीच.

कोणतीही कटकट न करता बुलेट ने दिलेली उत्तम साथ, गोवा कर्नाटक मधील उत्तम रस्ते, महाराष्ट्रातील रस्त्यावर मिळालेला ऑफरोड सराव आणि राईड करताना आपण स्वतः व आपली लाडकी बुलेट यामधील द्वैतभाव सरून अद्वैत झाल्याची अनुभूती ही माझ्या मते मला मिळालेली सर्वात मोठी बक्षीसी आहे. धन्यवाद


राहुल


Friday, 3 February 2023

एकला चलो रे- उत्तराखंड सोलो ट्रीप

एखादी तरी सोलोट्रीप करुन पहायलाच हवी असा निश्चय बळावत चालला होता. असं एकट्याने फिरायच्या सहलीत मजा आहे कि सजा हे अशी ट्रीप केल्याशिवाय कसं कळणार? म्हटलं तयारी तर चालु करु. . . जायचं कुठे याला काही पर्याय होते. त्यातला उत्तराखंड- कुमाउ प्रदेश पक्का केला. तिथली काही ठिकाणं निश्चित केली. . . रहायची/ जेवायची व्यवस्था तसेच अंतर्गत प्रवास साधनं यावरची माहिती गोळा केली आणि अखेर १० किलोचं धोपटं पाठीवर घेउन प्रस्थान ठेवलं.

प्रथम रेल्वेने दिल्ली गाठली. तिथुन पुढील ट्रेनने रात्रीचा प्रवास करुन सकाळी काठगोदामला पोचलो. शेअर रिक्शेने हल्दवानी बसस्टँड गाठला. या ट्रीपमधे एक गोष्ट मनाशी पक्की केली होती ती म्हणजे शक्यतो लोकल बस, शेअर टॕक्सी/ आॕटोनेच प्रवास करायचा व रहायला शक्यतो होमस्टे किंवा बजेट हाॕटेल निवडायचे.

हल्दवानीला सरकारी बसस्टँड (तिथं त्याला 'रोडवेज' म्हणतात) व खाजगी बसस्टँड (KMOU) बाजुबाजुलाच आहेत. रोडवेजच्या बसेस नाॕर्मल आकाराच्या आहेत ज्या साधारणपणे मोठ्या शहरात ये-जा करतात तर kmou च्या छोट्या बसेस डोंगराळ प्रदेशातील विविध ठिकाणी जातात. माझा पहिला मुक्काम कौसानीला करायचा होता त्यामुळे मी kmou कडे वळलो. नशिबाने एक बस लगेच मिळाली. खच्चुन भरली होती पण मी 'दूर की सवारी' असल्याने कंडक्टरने (काही स्थानिक प्रवांशाचा रोष पत्करुन) मला ब-यापैकी सीट दिली. नैनितालच्या दिशेने प्रवास सुरु झाला व मी आजुबाजुला मोठ्या आवाजात चाललेल्या कुमाउ गप्पांचा त्रास करुन न घेता त्यातला बाज समजुन घेउ लागलो.

नैनिताल शहराला मुरड घालुन बस अल्मोडाच्या दिशेने निघाली व तासाभरात भोवाली या गावी पोचली. त्याआधी वाटेत बसमधुनच नीमकरोलीबाबांचा कैंचीधाम आश्रम पाहिला. या आध्यात्मिक स्थानाविषयी खूप ऐकलं होतं व इथं जाउन एखादा दिवस राहायची इच्छा होती जी या खेपेला अपूर्ण राहिली. हे बाबा म्हणजे येथिल खूप प्रसिध्द व्यक्तीमत्व होते जे आता या जगांत नाहीत. खुद्द स्टीव्ह जॉब्सने इथं काही दिवस आश्रमसेवा केली होती व नंतर तिकडं जाउन अॕपल कंपनी सुरु केली म्हणे. त्यानंतर कधीतरी झुकरबर्गही येउन गेला म्हणे. पण खातरजमा नाही. भोवालीला निम्मी गाडी रिकामी झाली. इथं एक प्रसिध्द देवीमंदिर आहे त्यासाठी नवरात्रीनिमित्त भक्तांची रीघ लागली होती.

'चाय के लिये बस दस मिनीट रुकेगी' हे वाक्य कानी पडताच मी बसबाहेर धाव घेतली. . .  एका टपरीवर ड्रायव्हर कंडक्टरसोबत थंड हवेत चहाचे दोन डोस झाले. कंडक्टरने शिफारस केली म्हणुन टपरीतल्या काचेच्या बरणीतली क्रीम बिस्कीट खाल्ली. सकाळपासुन बस पकडायच्या धांदलीत चहा घ्यायचा राहुन गेला होता त्यामुळे चहा पिल्यावर तरतरी आली. पुढील प्रवास सुरु झाला. अरुंद नागमोडी वळणं व डाव्या बाजुला कोशी नदीचे सततचे दर्शन सुखावह होते. आजुबाजुला तशी शांतता होती त्यामुळे बस आवाजाच्या तालावर माझ्या डुलक्या चालु होत्या. खैरना गावानजिक मधेमधे रस्ता खूपच खराब होता व रस्त्यांची कामेही सुरु होती. याच भागांत २०२१ साली भुस्खललाने खूप हानी झाली होती. इथुनच रानीखेतला जाणारा फाटा फुटतो.

तासा दोन तासांत अल्मोडा शहरी पोचलो. हे तसे कुमाउ मधले डोंगराळ भागातील सर्वात मोठे नगर. अर्ध्या तासाच्या ब्रेकची घोषणा झाली आणि मी छोटी सॕक घेउन बाहेर पडलो. सकाळचे ११ वाजले होते पण वर्दळ जेमतेमच. आजुबाजुला बघतो तर मिठाईदुकानांची रेलचेल. ज्याविषयी मी ऐकून होतो ती कुमाउ प्रसिद्ध बालमिठाई सर्वत्र दिसत होती. दोन ठिकाणी चव बघुन तिसऱ्याच दुकानात मी थोडी मिठाई खरेदी केली. एका फळविक्रेत्याकडुन मोठ्ठी सफरचंद व केळी घेतली. पार्लेजी गोल्डचा पुडा साथीला होताच तरीही नजर शोध घेत होती ती एखाद्या टपरी वजा धाब्याची जिथं तब्बेतीत पेटपुजा करता येईल. एका छोट्या दुकानात गरमागरम सामोसे तळले जात होते. मनात म्हटलं 'ये हुई बांत .. .' सामोसे घेउन बसमधे स्थिरावलो. झक्कास गरम सामोस्यांवर बालमिठाईचा तोबरा मारुन ड्रायवरची वाट बघत बसलो. एकट्याने फिरण्याचं एक बरं असतं. . . तुम्ही तुमच्या मनाचे छत्रपती. एखादी गोष्ट करावीशी/खावीशी वाटली तर त्याक्षणी लग्गेच अंमलात आणता येते. बसमधे पर्यटक असा मी एकटाच होतो. बाकी होते जवळपास ठिकाणी चढणारे उतरणारे. 

अल्मोडानंतरचा रस्ता अधिकच वळणावळणांचा झाला. रस्ता जेवढा कठीण व त्रासाचा त्याच प्रमाणांत निसर्ग अधिकाधिक सुंदर होत होता. आता दुपारचं ऊन जाणवत होतं पण त्रासदायक नव्हतं. थोड्याच वेळांत बस सोमेश्वर गावांत एका अतीसाध्या धाब्यावर थांबली. लोकं जेवत होती. चहा पिता पिता माझं लक्ष एका पातेल्यावर गेलं. 'ये है आलु के गुटके' . . . माझ्या प्रश्नाला हॉटेलमालकाचे उत्तर आले आणि पुढच्या काही सेकंदात माझ्या हातात भरलेली प्लेट आली. या डिशचं नाव ऐकून होतो पण प्रत्यक्ष सामना प्रथमच. लढाई चालु केली आणि गुटक्यांच्या प्रेमातच पडलो. उकडलेल्या बटाटा फोडींना मसाले चोपडुन तव्यावर थोडे परतले कि गुटके तैय्यार.. . हे चवीष्ट चटकदार गुटके बटाटाप्रेमींना हमखास आवडतील.

पुढील अर्ध्या तासांत मला कौसानीला उतरायचं होतं. शेजारच्या माणसाशी गप्पा चालु होत्या. कौसानीनंतरच्या कुठल्याशा गावातील नवरात्र देवी उत्सवासाठी तो दिल्लीहुन आला होता. मी एकटाच फिरायला आलोय म्हटल्यावर त्याने माझ्याकडे दोन सेकंद पाहुन मला "क्यु" असं विचारलं. . . मी सुध्दा त्याच्याकडे बघत हसत खांदे उडवले. माझ्याकडे उत्तरच नव्हतं. गंमत म्हणजे मलाही तोच प्रश्न पडला. गप्पांच्या ओघात त्याने मला उत्सवाचे आग्रही आमंत्रणही दिले. 'वैसेभी कल दिनभर आप अकेले क्या करोगे. . . देवीजीका दर्शन करने आ जाओ' असं म्हटल्यावर मी त्याला मनोमन साष्टांग व खरोखरचा हात जोडुन नमस्कार करत आभार मानले. बाहेर तुरळक छोटी दुकानं दिसु लागली व "कौसानीवाले सवारी आगे आ जाओ" अशी घोषणा झाली. त्या महाशयांना बाय बाय करुन मी बसमधुन उतरलो.

कौसानीच्या चौकात भर दुपारच्या टळटळीत उन्हात उतरलो. नाक्यावर तुरळक माणसं व छोट्या छोट्या दुकानांत शांत बसलेले दुकानदार. नैनिताल-रानीखेतच्या पुढील प्रदेशातील प्रमुख पर्यटन स्थळ असुनही तसे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. मोठमोठाली दुकानं, खूप वर्दळ, फेरीविक्रेते, गोंगाट गलबल या सर्व मंडळींची गैरहजेरी जाणवल्याने मी आनंदलो. धोपटं पाठीवर घेउन एका मोठ्या हॉटेलच्या बाजुने वरच्या दिशेने जाणाऱ्या डांबरी सडकेवर चढु लागलो. बसमधे मिळालेल्या सल्ल्यानुसार मी कौसानी गावातील जरा उंचीवरच्या भागात जाउन हॉटेल शोधायचे ठरविले. दुपारचं स्वच्छ उन पडलं होतं तरी खूप उकडत नव्हतं. थोडा वाराही होता. रस्त्याच्या बाजुने असलेल्या पाईन वृक्षांची सळसळ ऐकत व वृक्षांवर लगडलेली लाकडी फळे पाहत मी वळणदार चढ चढुन वरच्या पट्ट्यात आलो. दुतर्फा छोटी हॉटेल्स दिसु लागली. दोन ठिकाणी चौकशी करुन आणि एका हॉटेलवर बाहेरुनच फुली मारुन अखेर एका ठिकाणी बात बन गयी. स्वच्छ रुम, प्रशस्त गॕलरी व समोर दिसणारी हिमशिखरं पाहुन दिल खुश हो गया. घरातुन निघुन ५४ तास झाले होते तरीही रुममधे जाण्याआधी गॕलरीतल्या खुर्चीतच बसकण मारली व अद्रकवाली फिकी चाय मागवली. समोरचा अफलातुन नजारा डोळ्यांत साठवताना एवढया मोठ्या ट्रेन-लोकलबस प्रवासाचा थकवा कधीच पळुन गेला होता. पहिल्या सोलोत्रिपच्या पहिल्या मुक्कामाला सुखरुप पोचल्याचे समाधान होतेच. चहा येईतोवर समोरच्या पर्वतांकडे पहात डोळे बंद केले व बसमधे मिळालेल्या सल्ल्याला मनोमन धन्यवाद दिले. . .फ्रेश होउन बेडवर लवंडलो व खिडकीतुन थेट समोर दिसणाऱ्या त्रिशुल पर्वताकडे पाहत झोपी गेलो. . . 



सायंकाळी ५ वाजता बाहेर पडलो. म. गांधींचा अनासक्ती आश्रम समोरच्या चढावात दिसत होता. पाहतो तर तिथं २ आॕक्टोबर निमित्त लहानथोरांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सुरु होते. दोन लोकनृत्य पाहिली व आश्रम आवारात चक्कर मारली. गांधीजींनी इथं काही काळ वास्तव्य करुन अनासक्ती योगाबाबत काही लिखाणंही केलं होतं. उन्हं कलली असल्याने गारठा येउ लागला. तिथं बांधलेल्या 'हिमालय दर्शन' पॉईंटवरुन विविध शिखरं पाहिली. दुपारी पाहिले त्यापेक्षा आता हे पर्वत वेगळाच रंग दाखवित होते. . .



पाय मोकळे करायला दुपारी जिथं उतरलो होतो त्या बसस्टॉप वर जाउन हॉटेलला परतलो. गारठा चांगलाच वाढला होता. हॉटेलमालक राणाजी व शेजारील धाबामालक गोविंदजींबरोबर गप्पांचा फड जमला. भारतात लांबवरच्या ठिकाणी जो काही मी थोडाफार फिरलो त्यात निरीक्षणात आलेली एक बाब म्हणजे, तुम्ही मुंबईहून आले आहात हे कळल्यावर समोरच्याचा तुमच्याविषयी आदर हमखास वाढतो. गंमत म्हणजे अनेकांना रत्नागिरीही माहित असते ते आपल्या हापुसमुळे. गप्पांच्या साथीला पायाशी पेटवलेली शेकोटी व चहा होताच. स्थानिक लोकं ७- ७.३० वाजताच जेवतात व लवकर झोपी जातात. तुरळक पर्यटक होते पण म्हणावा तसा हंगाम अजुन सुरु न झाल्याने धाबाही बंद होण्याच्या तयारीत होता. मी सोडुन उर्वरीत पर्यटकांपैकी ९९% बंगाली होते. नवरात्रीच्या सुट्टीत सगळे उत्तराखंडात पोचले होते. मी सुध्दा लवकरच जेवलो. जेवायला 'पालक कापा' भाजी व गरमागरम मडुआ (नाचणी) भाकरी होती. जेवुन रुमच्या गच्चीत येउन बसलो. नवरात्रीनिमित्त दूरवर चालु असलेलं लयबध्द लोकसंगीत ऐकत मी गारठ्याची उब घेत होतो. काळोखामधे हिमशिखरं झोपलेली वाटत होती व मी ही त्यांचा आदर्श घेउन हळुहळु निद्रेच्या आधीन झालो.


हॉटेलमालक राणाजींबरोबर आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी ६ वाजता walk ला निघालो. सैन्यातुन निवृत्त झालेल्या राणाजींनी एक होमस्टे उभारुन हल्लीच व्यवसाय सुरु केला आहे. छान गप्पा मारत आजुबाजुच्या वृक्षराजीची माहिती देत वेगात चालणाऱ्या ६४ वर्षीय राणाजींमधे लपलेला सैनिक प्रकर्षाने जाणवत होता. एका ठिकाणी पोचलो तर समोर चौखंबा पर्वत स्वागताला उभा असल्यासारखा होता. खरेतर हे एखाद्या चौकोनाच्या चार कोपऱ्यात उभे असलेले चार पर्वत आहेत पण कुठल्याही दिशेने पाहिले तरी त्यातले तीनच दिसतात. यावर्षी मार्चमधे तुंगनाथ-चंद्रशीला ट्रेकवेळी याच चौखंबाला विरुध्द दिशेतुन पाहिले होते. डाव्या हाताला चौखंबा तर उजव्या हाताला नंदाघुंटी, त्रिशुल, नंदादेवी ही शिखरं सकाळचं उन अंगावर घेत आळस झटकत असल्यासारखी भासली. 






तासाभरात रुमवर येउन गॕलरीत चहाला बसलो. समोरील पर्वत आपापली हिमशिखरं चमकउन मला कंपनी द्यायला आधीपासुनच  हजर होती.  फ्रेश होउन नाष्टा करुन तैय्यार झालो. नाष्ट्याला कढत मोमो+भांग चटणी असा खासा बेत होता. साधारणपणे लोकं संध्याकाळी मोमो खातात. . . पण असा नियम थोडाच आहे.. भांगेच्या पानाची चटणी इथं सर्रास बनवली जाते व चवीला लागतेही झक्कास. राणाजींच्या सल्ल्यानुसार १५-२० किमी लांब असलेल्या गरुड गावी जाउन तेथील प्राचीन बैजनाथ मंदिर समुह पहायचे ठरवले. छोटी सॕक घेउन बसस्टॉपला आलो व बसची वाट पाहु लागलो. एका दुकानाबाहेर एक खूप वृध्द गृहस्थ खुर्चीत ऊन खात बसले होते. साधारण ८० च्या पुढे वय असावं. येणारा जाणारा प्रत्येक स्थानिक माणुस थांबुन त्यांना वाकुन नमस्कार करुन पुढे जात होता. मी एकाला विचारले तर कळलं कि ही इथली प्रथा आहे. 'गावका कोईभी बुजुर्ग हो. . .उसे हमलोग प्रणाम करते है'. भारी वाटलं. बस आली व मी निघालो. अर्ध्या पाउण तासाचा प्रवास पण स्थानिक साधी माणसं, त्यांच्या गप्पा, बसचा नागमोडी प्रवास, आजुबाजुची चीड वृक्षाची दाट-विरळ जंगले पाहत मी कधी बैजनाथ मंदिरांजवळ उतरलो कळलेच नाही. 

 


१० व्या शतकात बांधलेला हा १७ मंदिरांचा समुह आहे. एक मुख्य मंदिर व उर्वरीत मंदिरं आजुबाजुला पसरलेली. शैली थोडीफार गढवाल भागातील केदारनाथ, तुंगनाथ मंदिरांसारखीच. शेजारीच नितळ पाण्याचं एक मोठ्ठं तळं व त्यांत खूप सारे मासे. परिसरात किंचित वरदळ पण खूपशी शांतताच. तिथंच एका बाकड्यावर मांडी ठोकुन बसलो व वातावरणाचा आनंद घेतला. 

 



गरुड गावातल्या बाजारात एक फेरी मारुन बसने कौसानीला परतलो. दुपारच्या जेवणांत गोविंदजींनी कुमाउ भात (थोडा चिकट) व बरोबरीला 'मुली थेचुआ' रसभाजी खिलवली. 


संध्याकाळी गावाच्या दुसऱ्या दिशेत चक्कर  टाकुन आलो आणि गप्पाफडात सामील झालो. राणाजींकडुन त्यांचे सैन्यातील अनुभव, BSF व आर्मीमधील फरक जाणुन घेणं रोचक होतं. राणाजींचे ८० वर्षीय काकाही थोडावेळ गप्पांत सामील झाले. ते स्वतः CRPF निवृत्त होते. इथल्या खूप घरांमधील कोणीना कोणी सैन्यात असतोच. धाबामालक गोविन्दजींच्या व्यथा वेगळ्याच होत्या. ते नवराबायको दोघंच सर्व व्याप सांभाळतात व इंजिनियर झालेला मुलगा दिल्लीत नोकरी शोधतोय. ही प्रातिनिधीक उदाहरणं समजुन घेताना रात्र कधी चढली व शेकोटी कधी विझली समजले नाही. दुपारचे जेवण उशीरा झाल्याने रात्री फलाहार +बालमिठाई खाल्ली. 


कौसानीतील प्रसिद्ध 'स्पेस आॕब्झर्वेटरी' माझ्या होमस्टेच्या अगदी समोरच होती. तिथला रात्रीचा ११ ते १२ चा शो बुक केला होता. तोपर्यंत होमस्टे गच्चीतुन आकाशदर्शनाचा सराव केला. स्पेसशो भारीच होता. सर्व लहानथोरांनी जरुर पहावा. नशिबाने आकाश तसं स्वच्छ असल्याने आम्ही विविध ग्रह, आपली सख्खी शेजारची अँड्रोमेडा आकाशगंगा, दुरवरचा नेबुला M57 वगैरे वगैरे एका मोठ्या दुर्बीणीतुन पाहिले. पैसा वसुल शो आहे. सिजनमधे तर रात्रभर शो चालु असतात म्हणे. शोनंतर पुन्हा होमस्टेच्या गच्चीतुन आकाशदर्शनात गुंग झालो. नुकतेच मिळालेलं आकाशज्ञान स्वतःजवळच पाजळवीत उशीरा झोपी गेलो. 

रुमच्या खिडकीतुन समोरुनच माझ्याकडे पाहत असलेल्या त्रिशुल शिखराला मी सकाळी बेडवरुनच वंदन केले व कौसानीचा निरोप घ्यायची तयारी चालु केली. एकीकडे मन खट्टु होते पण दुसरीकडे नवीन ठिकाण कसे असेल याची उत्सुकताही होती.

उगवतीपासुन मध्यान्ही व नंतर मावळतीपर्यंतच्या सूर्यकिरणांना आपल्या अंगावर झेलत विविध छटा दाखविणाऱ्या हिमशिखरांचे व त्यांना तेवढीच साजेशी साथ देणाऱ्या आकाशातील ढगांच्या अनेकविध रंगांचे स्मरण करता करता बॕगा भरुन झाल्या. मित्रत्वाचं नातं निर्माण करुन दोन दिवस साथ देणाऱ्या या पर्वतटोळीला, त्यांच्या विशालतेला, धीरगंभीरतेला, खंबीरपणाला, खूप लांब असुनही अत्यंत नजीकतेचा अनुभव देणाऱ्या जादुई भावनेला मनःपूर्वक शतशः नमन करुन मी पुढे निघालो. . . 

 चौकोडीला जाणाऱ्या बसमधे ९.३० ला बसलो. गरुड बैजनाथमार्गे पहिला थांबा बागेश्वर होता. प्रवासमार्ग अत्यंत रमणीय होता. दुतर्फा पसरलेली पाईनची जंगल, उजव्या बाजुला अधुनमधुन दर्शन देणारी गोमती नदी आणि शांतपणे रस्ता कापीत चाललेली आमची बस. . . . बस्स. . और क्या चाहिये. . . 

साधारण १२ वाजता बागेश्वरला पोचलो. पोटात कावळे ओरडत होते. कंडक्टरच्या शिफारसीनुसार जवळच्याच एका खूपच साध्या धाब्यावर ताजं गरम रुचकर जेवण करुन मी तृप्त झालो. जेवणाची आॕर्डर दिल्यावर समोरच फुलके भाजुन प्लेटमधे वाढले जात होते. पोटभर जेवण त्यावर ताक हे सर्व रु. ९०/- मात्र. बस सुटायला अवधी असल्याने बागेश्वर मार्केट फिरु लागलो. एका स्वीटमार्टच्या बोर्डने लक्ष वेधले. साधं दुकान पण 'Washroom Available' असं बोर्डवर नमुद. तसं पाहिलं तर गरज नव्हती त्याला अशी सुविधा देण्याचं. ते काही रेस्टॉरंट नव्हतं. आपल्या इथं अनेक उपहारगृहात त्यांना बंधनकारक असुनही 'वॉशरुम बंद' चा कायमस्वरुपी बोर्ड असतो. अल्मोडाला घेतलेली बालमिठाई संपल्याने रिफील करायची होतीच. सैनिकाचं दुकान होतं. नावही सैनिक स्वीटमार्ट. स्मितहास्य व नमस्काराने माझे स्वागत झाले. दुकानमालकाच्या शिफारसीवरुन स्थानिक 'सिंगोडी' मिठाई खाल्ली. फणसाच्या पानासारख्या दिसणाऱ्या एका पानाचा शंकु करुन त्यात भरलेली मावा मिठाई. मिठाईकोनच जणु. वॉशरुम मी वापरले नाही पण ती सुविधा ठेवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. मला एकटं फिरायला मिळाल्याबद्दल त्याने माझं अभिनंदन केलं. गप्पांमधे आम्ही खूप हसलो. बायकोबरोबर गढवालमधे चारधाम यात्रा करण्याऐवजी हा इसम कुमाउमधे एकटा भटकतोय हे कळल्यावर त्याने मला खुळ्यात काढले कि माझा हेवा केला हे तो सैनिकच जाणे. असो. . पुढील प्रवास सुरु झाला.




छोटी गावं. . देवीच्या देवळांतली गर्दी. . . बसमधुन उतरवल्या व चढविल्या जाणाऱ्या टपालाच्या पिशव्या . . .त्यावेळी होणारे माफक संवाद. . बहुतांशी प्रवाशांशी ओळख असलेला गप्पीष्ट कंडक्टर . . .या सर्वांचे निरीक्षण करता करता चौकोडी (इंग्रजीमधे Chaukori) कधी आले कळलंच नाही. दुपारी २ वाजता निपचित पडलेल्या या शांत गावात उतरलो. पर्यटक तर नाहीच पण एखाद्या स्थानिकाचेही दर्शन नाही. कुमाउचा हा खूपच आंतला भाग त्यामुळे चोखंदळ पर्यटकच इथंवर पोचतो. बसस्टॉपला उतरलो तिथं दोन बाकड्यांवर दोन इसम गाढ झोपी गेलेले. त्यांची झोपमोड करायची जीवावर आली मग निघालो होमस्टेच्या शोधात. हॉटेल्स दिसत होती पण माणसांचा पत्ता नाही. दोन ठिकाणी फिरुन एका हॉटेलात सोय झाली. ठीकठाक वाटलं व बजेटमधे होतं म्हणून जास्त विचार नाही केला. थोडा आराम करुन संध्याकाळी Balancing Rock नावाचे ठिकाण पहायला निघालो. रस्ता चुकलो पण नंतर दोन स्थानिकांनी दिशा दाखविली त्याप्रमाणे एका टेकडीवर चढलो. एकदम नीरव शांतता. माणुस सोडा, साधं चिटपाखरुही दिसेना. कलता सूर्यदेव व थंड हवेच्या झुळुका साथीला होत्या. झपझप पावलं उचलत होतो. फोटोंमधे पाहिल्याप्रमाणे ठिकाण कुठे दिसेना म्हणुन ठरवलं हॉटेलला परतु. तेवढ्यात एक मोठ्ठा खडक पठारावरुन दरीत घुसलेला दिसला. अर्थात तो मी पाहिलेल्या बॕलन्सिंग रॉकच्या फोटोप्रमाणे नव्हताच. म्हटलं बघुन तर येउ. दगडावर जाउन समोर बघतो तर भव्य नजारा. गर्द हिरवे डोंगर. . .वरती तांबट निळसर मावळतीचे आकाश. . .खाली छोट्या छोट्या वस्त्या व त्यातील घरांतुन येणाऱ्या धुरांच्या अंधुक रेषा. . .एकुणच सर्वत्र पसरलेली सुपर शांतता.. .दिल खुश हो गया. 



अंधार होउ लागला म्हणुन हॉटेलला परतुन चहापाणी केलं व गावांत चक्कर टाकली. खूपच छोटं गाव पण मस्त हवा व आसमंतात मावळतीच्या रंगांची अक्षरशः उधळण. हॉटेल मालकाशी गप्पाटप्पा करत दुसऱ्या दिवसाचा अल्मोडाचा प्रवास कसा करायचा हा बेत पक्का केला. त्याने मला 'गुड की चाय' आॕफर केली. म्हटलं चव तर घेउ. गुळाचा छोटा खडा घेउन तोंडात घोळवायचा व त्यावर फिकी चहाचा घोट घेतला कि झाली गुड कि चाय. . .सो सिंपल. . . काळोख झाला म्हणुन सहजच गच्चीत गेलो. बघतो तर काय. . . वरती आकाशांत चांदण्यांचे प्रदर्शनच भरले होते. अफलातुन दृश्य होते. आकाशदर्शन करीतच फोन आटोपले व नंतर जेवणही गच्चीतच केले.

सकाळी जाग आल्यावर लगेच गच्चीत धावलो.  सूर्यदेवाने स्वतःच्या आगमनाची वर्दी देण्याकरिता आकाशात लालपिवळ्या रंगांच्या अनेक छटांना पाठविले होते. हिमालयासारख्या उंच पर्वतराजीत होणाऱ्या सूर्योदयाचा दिमाख काही औरच. चहाचे घोट घेता घेता उगवत्या सूर्याचे हळुहळु वाढणारे बिंब, रंगीबिरंगी आकाश, दरीतील विरळ होत जाणारे धुके, पक्ष्यांचे थवे अश्या गमतीजमती पाहताना एका दिशेला अचानक हिमशिखरे दिसली. गंमत म्हणजे कालपर्यंत हि दिसलीच नव्हती. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात चमकणा-या शिखरांना पाहुन कौसानी आठवले. पण हे पर्वत खूपच जवळ भासत होते. अंदाज घेता घेता लक्षात आले कि ही तर काल मी जिथं balancing rock पहायला गेलो तीच दिशा आहे. शूज चढवुन तडक तिकडे निघालो. जायचा रस्ता पाठ झाला होता. १५-२० मिनीटात त्या दरीत घुसलेल्या महाकाय शिळेवर पोचलो. समोरचे दृश्य अप्रतिम विलोभनीय होते. काल जी हिमशिखरे ढगांच्या आड आपलं अस्तित्व पूर्णपणे लपवुन दडी मारुन बसली होती ती आज जणु उन खाण्यासाठी बाहेर आली होती. काल संध्याकाळी याच ठिकाणाहून पाहिलेला निसर्गाचा देखावा आजच्या देखाव्यापुधे फिका वाटु लागला. इथुन निघायचं मन होईना पण पुढचा मोठ्ठा प्रवास माझी वाट पाहत होता.





 

पुढील प्रवास सकाळी लवकर सुरु करायचा असल्याने निसर्गदेवाला नमस्कार करुन रुमवर परतलो. पहिल्या बसने बेरीनाग या ठिकाणी पोचलो. इथुनच मला अल्मोडासाठी बस मिळणार होती. खरतर माझा बेत चौकोडीच्या आणखीन पुढे जाउन मुन्सीयारी व धारचुला फिरुन यायचा होता. त्यासाठी आणखी ३-४ दिवस ठेवले होते पण मध्यंतरीच्या काळात माझा अचानक श्रीनगर दौरा ठरला व मी दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरु केला. बेरीनागला अडीज तासाच्या प्रतिक्षेनंतरही बस न आल्याने अखेर शेअर टॕक्सीने प्रवास सुरु केला. या भागातील शेअर टॕक्सीचा माझा पहिलाच अनुभव. प्रवास उत्तम सुरु होता. नागमोडी वळणांचे पण चांगले रस्ते, सर्वत्र पाईनची जंगले, थंड हवा व गाडीतील कुमाउ लोकगीते...एकुण माहौल छान जमला होता. वाटेत धाब्यावर साधं चविष्ट पोटभर जेवण झालं. इथली थाळी ही पोटभरच असते. एक्स्ट्रा पोळी/भाजीचे जास्त पैसे वगैरे प्रकार नाही. दरही सर्वत्र साधारणपणे सारखाच रु. ८०-१००. 



अल्मोडाला पोचलो तेव्हा ३ वाजत होते. उन जाणवत होतं पण मी म्हणत नव्हतं. अल्मोडा शहराच्या खालच्या पट्ट्यातील भागातुन वर जायला एक पक्के बांधकाम केलेली घाटी- चढाईची वाट आहे त्यावरुन धोपटे पाठीला लावुन निघालो. दसर्याचा दिवस होता म्हणून खूप वर्दळ होती. नेहमीप्रमाणे दोन वेगवेगळ्या ठिकाणी अंदाज घेउन एका हॉटेलमधे चेकइन केले. त्याआधी एक गंमत पाहिली. एका राक्षस पुतळ्याची मिरवणुक मस्त वाजतगाजत चालली होती. राक्षस छान सजवला होता. छोटी मुलंमुली मिरवणुकीसमोर नाचत होती. पण राक्षसाला एकच तोंड होते, दहा नव्हती. असं का याचं उत्तर मला हॉटेल रिसेप्शनला मिळाले. शहरातील दसरा मिरवणुकीची पूर्ण रोचक माहिती मिळताच मी फ्रेश होउन तडक बाजारात निघालो. 

एका चौकात जाउन बघतो तर विविध आकार-रुपाच्या अक्राळविक्राळ राक्षसांचे जवळपास १५ पुतळे वेगवेगळ्या मिरवणुक गाड्यांवर उभे होते. जोराजोरात गाणी लावुन तरुण लहान पोरंटोरं नाचत होती. शहराच्या विविध भागातील मंडळांनी वेगवेगळा राक्षस पुतळा बनविला होता. आपल्याकडील गणपती विसर्जन मिरवणुकीचा माहौल होता. सर्वांत शेवटी दशमुखी रावणाचा पुतळा व त्याच्याही मागे राम लक्ष्मण सीता हनुमान व वानरसेनेच्या वेषात लहान मुलं होती. मिरवणुक बघता बघता एक मोठे स्वीटमार्ट दिसले. पोटांत थोडी भूक व समोर पदार्थांची रेलचेल. आलूटिक्कीने श्रीगणेशा करुन नंतर सामोसाछोले व जिलेबी हाणली. रबडी संपली होती. एखाद्या गावांत/शहरांत गेल्यावर जर तिथला स्थानिक उत्सव चालु असेल तर नक्कीच अनुभवावा. आबालवृध्द छान छान कपडे घालुन फिरत असतात. वातावरणात उत्साह असतो आणि मुख्य म्हणजे खाद्यपदार्थांची मांदियाळी असते.. . एकूणच संध्याकाळ मस्त गेली. एक वैशिष्ट्यपूर्ण उत्सव अगदी अचानकपणे अनुभवायला मिळाला. दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासात उ.प्र. मधुन आलेला एक पर्यटक म्हणाला कि अश्या प्रकारची विविध राक्षस पुतळ्यांचा समावेश असलेली येथील दसरा मिरवणूक पहायला लोकं लांबलांबुन येतात. 



दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच्या बसने हल्दवानीला निघालो. कुमाउ पर्वतीय प्रदेशाला टाटा करीत सकाळच्या थंड हवेत वळणावळणांचा संथ बसप्रवास एका लयीत चालला होता. फक्त चारच दिवस झाले होते पण आठवणी आयुष्यभराच्या साठल्या होत्या. त्यांना उजाळा देतादेता बस खैरना गावांत नाष्ट्याला थांबली. समोरच्या धाब्यावर गरमागरम पराठे, समोसे, पुरीभाजी तयार होती. एक मोठी परात भरली होती आलुगुटक्यांनी. गुटके व चहाचा समाचार घेउन पुढे निघालो. नैनिताल येण्याआधी वाटेत काकरीघाट आले जेथे स्वामी विवेकानंद आश्रम व कैचीधाम आश्रम आहे. नैनितालच्या थोडं पुढे धुक्यातुन प्रवास चालु असता बस अचानक थांबली. ब्रेकडाउन. हा एक अनुभव बाकी होता. तासभर वाया गेला व नंतर एका शेअर टॕक्सीने हल्दवानीला पोचलो.



उष्मा चांगलाच जाणवत होता. नशिबाने दिल्लीसाठी एसी बस मिळाली त्यामुळे संध्याकाळी आरामात काश्मीरीगेटला पोचलो. जम्मुची ट्रेन रात्री उशीरा होती. म्हटलं तोवर जीवाची दिल्ली करु. चांदनी चौक गाठले. खूप गर्दी, खूप दुकानं, फुललेले बाजार, खाद्यपदार्थ ठेले यांत हरवुन गेलो. प्रसिद्ध कुरेमल कुल्फी दुकानात प्लम कुल्फी चाखली. खूप खास नाही वाटली. पराठेगल्लीच्या दिशेत चालत निघालो तर वाटेत माझा वीकपॉईंट रबडीकुल्फी फालुदा खाल्ला. नंतर रस्ता चुकुन ओल्ड दिल्लीच्या गल्ल्यांमधे घुसमटलो. शेवटी बाजार बघत बघत पराठेगल्ली पार करुन मुख्य रस्त्यावर येउन एका बाकड्यावर विसावलो. आजुबाजुचा चकचकीत गर्दीने फुललेला माहौल बघत थोडी विश्रांती घेतली व स्टेशनकडे निघालो. वाटेत कोपऱ्यावरील एका ठिकाणी छोलेभटुरे हाणुन चां.चौ. ला टाटा केलं. 

सकाळी लवकर जम्मुला उतरलो. छोट्या बसने मुख्य बस स्टँडवर आलो. श्रीनगरपर्यंतचा प्रवास रस्तामार्गाने व तोही बसनेच करायचा ठरवले होते पण बसची सोयच नव्हती. शेवटी एका शेअर टॕक्सीत बसलो. बाकी प्रवासी मिळेपर्यंत दोन तास गेले. पर्यटक श्रीनगरला विमानानेच जातात. जम्मु व श्रीनगरची फक्त स्थानिक जनताच रस्तामार्गाने ये जा करते. या मार्गावर बस सुविधा अगदीच तोकडी त्यामुळे सर्व भर शेअर टॕक्सीवरच. ३०० किमी चा प्रवास सुरू झाला. उधमपुरपर्यंत मस्त हायवे आहे. नंतर मात्र खराब एकेरी रस्ता. वाटेत चहाला थांबलो. ११ वाजत आले होते व मी फक्त एका पारलेजी वर जगलो होतो. नाष्ट्याला राजमा चावल व चहा घेतला. तिथं मी खाण्यासारखं तेवढंच होतं. सहप्रवासींमधे एक वयस्कर सरदारजी, दोन काश्मीरी तरुण व आणखी एक सद्गृहस्थ होते. सर्व सहप्रवासी व ड्रायव्हर कधी काश्मीरी तर कधी हिंदीत बोलत होते. माझी विचारणा झाल्यावर व मी मुंबईहून आलोय सांगितल्यावर सर्वांनी आदराने पाहिले. मुंबईचा समुद्र व वडापावची खुशाली विचारली गेली. वाटेत 'प्रेम दी हट्टी' नावाच्या छोट्या दुकानाजवळ काश्मिरी तरुणांनी गाडी थांबवली व दुकानात गेले. मिठाई दुकान आहे हे समजल्यावर मी सुध्दा गेलो. नेहमीचेच प्रकार होते पण त्यांत एक 'पाटिसा' प्रकार वेगळा वाटला म्हणुन थोडी खरेदी केली. आपली सोनपापडी जर पातळ लेयरमधे बनवली तर जशी दिसेल तसेच काहीसे होते. ड्रायवरनेही थोडी मिठाई घेतली व प्रवास सुरु झाल्यावर आमच्यात वाटली. पुढील रस्ता आणखी खराब होता. पत्नीटॉप बायपासला श्यामाप्रसाद मुखर्जी बोगदा लागला. जवळपास १० किमी लांबीचा टनेल. भारी आहे. पुन्हा खराब रस्ता लागला. आता प्रवास कंटाळवाणा व न संपणारा वाटत होता. खूप अवजड वाहन वाहतुक, रस्ता कामे, खराब रस्ते, धुळ, मेंढ्यांच्या लांबचलांब कळपांना घेउन पूर्ण रस्ता व्यापुन चालणारे मेंढपाळ. . . सहनशक्ती संपत होती. बरं आजुबाजुचा निसर्गही सुंदर वगैरे नाही. रामबाण नावाच्या गावी पोचलो व पुन्हा एक चहा झाला. ड्रायवरचीही कमाल होती. अश्या रस्त्यावरून ड्राईव करणे निश्चितच भयंकर होते. काश्मिरी तरुण रामबाणला उतरणार होते. त्यांनी सल्ला दिला की बनिहालला उतरुन तिथुन श्रीनगरची लोकल ट्रेन पकडा. आम्ही तसेच केले. हा अनुभव अविस्मरणीय होता. स्थानिकांच्या सोयीसाठी असलेल्या या ट्रेनमार्गावरील ७-८ छोट्या स्टेशनला थांबत थांबत जाणारी ही ट्रेन २ तासांनी श्रीनगरला पोचली. या २ तासांत चढउतरणारी स्थानिक जनता व प्रवासात दुतर्फा येणारी छोटी गावे यांचे जवळुन दर्शन झाले. अजिबात माहित नसलेला व अचानकपणे अनुभवाला आलेला हा ट्रेनप्रवास सुखद झाला.

श्रीनगरला उतरुन एका गच्च भरलेल्या लोकल बसने मुख्य शहरात आलो व तश्याच दुसऱ्या बसने लाल चौकात सायंकाळी ६ ला पोचलो.  माझा अवतार व पाठीवरील धोपटं पाहुन दोन्ही कंडक्टरनी मला सहकार्य केले. लाल चौकच्या आसपासच्या हॉटेलमधे रहायच्या उद्देशाने मी आजुबाजुचा अंदाज घेतला. कडक सैनिक बंदोबस्त होता पण बाजार ओसंडुन वाहत होता. रस्त्याच्या बाजुला विविध दुकाने, खाद्यस्टाॕल, त्यावरील स्थानिकांची गर्दी. तुरळक पर्यटकही दिसत होते. अल्मोडा हॉटेलातुन निघुन ३६ तास झाले होते. मी नखशिखांत धुळीने माखलो होतो. जम्मु श्रीनगर रस्ताप्रवासाची हौस पुरती फिटली होती. आता हवं होतं एक स्वच्छ हॉटेल व तेही लगेच. प्रसिद्ध लालचौकातील अतीप्रसिध्द घंटाघराखाली उभा राहुन चहुबाजुचा अंदाज घेताघेता पाठी वळुन बघतो तर एक मोठे हॉटेल दिसले. चांगले वाटले. आत जाउन रुम घेतली. अपेक्षेपेक्षा खूपच चांगले हॉटेल व ते ही रास्त दरांत मिळाले.

स्वच्छ फ्रेश होउन कहावा पिउन खाली उतरलो. सूर्यास्त होउन गेला होता. बाजार अधिकच फुलला होता. घंटाघर टॉवर तिरंगा रंगातील रोषणाईत अक्षरशः झळकत होता. टॉवरच्या माथ्यावर आपला राष्ट्रध्वज दिमाखात फडकत होता. जवळपास ३० वर्षांहुनही अधिक कालावधीनंतर २०२२ च्या २६ जानेवारीला घंटाघरावर तिरंगा फडकला होता. भारतीय सैन्य व काश्मिरी जनता या दोहोंचही हे यश होतं.. . असो. . . सर्व परिसर विक्रेते व खरेदीदारांनी ओसंडुन वाहत होता. वातावरणात एक प्रकारचा उल्हास व उत्साह जाणवत होता. एका हातगाडीवर पाहिलं तर मोठ्या आकाराच्या शिंगाड्यामधील गर काढुन आपल्या समोरच भाजुन खायला मिळत होते. शिंगाडे खात खात मुख्य रस्ताबाजार पार करुन मी बाजुच्या दुकानांकडे मोर्चा वळवला. इथं तशी चांगलीच शांतता होती. एका स्टॉलवर मी काही जॕकेट्स पाहिली पण मला हवे तसे न मिळाल्याने दुकानदाराला सॉरी म्हणुन व त्याचे आभार मानुन पुढे जाउ लागलो तसा तो माझ्याकडे बघत स्मितहास्य करत काश्मिरी भाषेत एक वाक्य बोलला. माझा प्रश्नार्थक चेहरा पाहुन तेच वाक्य पुन्हा बोलला. मला हसु आल्यावर म्हणाला कि मैने बोला, 'आप बहोत अच्छे इन्सान हो'. मग मी ही त्याचे कौतुक केले व आमच्या थोड्या गप्पा झाल्या. बाजुचा दुसरा दुकानदारही सामील झाला व आम्ही तिघांनी शिंगाडे संपवले. त्यांचं मुख्य म्हणणं होतं- 'आपको यहांपे कैसा लग रहा है? कुछ तकलीफ नही ना? आप आओ और काश्मीर घुमो'. . . रात्री लवकर जेवण आटोपुन लवकर झोपी गेलो. त्याआधी रुमच्या खिडकीतून बाहेर नजर टाकली तर रस्त्यावर एकदम शांतता होती. सैन्याच्या एकदोन गाड्या इकडून तिकडे गेल्या एवढंच. त्या शांततेत तिरंगा रोषणाईत चमकणारे घंटाघर अधिकच छान दिसत होते व सुरक्षिततेची ग्वाही देत होते. 


या सोलो ट्रीपची शेवटची सोलो सकाळ जरा लवकरच झाली. खाली रस्त्यावर साफसफाई चालली होती. चोहीकडे नजर टाकल्यावर एक चहाची हातगाडी दिसली. थंड सुखद हवेत तरतरी आणणाऱ्या कहावाची मजा घेत घेत दोन किमीची रपेट करुन त्याच चहावाल्याकडे येउन गाडीवरील पदार्थांचे अवलोकन सुरु केले. विविध प्रकारचे बेकरी पदार्थ होते. तिथं येणारे स्थानिक लोकं, आॕटो ड्रायव्हर्स लोकं घेत होते ते पदार्थ म्हणजे नुन चाय (दुधाचा खारट चहा), गिर्दा (जाड खुसखुशीत रोटी), लवासा (मोठी पातळ रोटी), याशिवाय शिरमल, साधा चहा (तिकडे लिप्टन चहा म्हणतात) वगैरे होतेच. सुरुवात मी नुन चाय व बरोबरीला गिर्दाने केली. चहावाले अंकल तसे वृद्ध होते. मला गिर्दा देताना त्यांनी खास बटर लावुन दोन्ही बाजुनी शेकुन दिला. चहा पीत पीत मी एका बंद दुकानाच्या पायऱ्यांवर बसलो. हळुहळु मरगळ झटकत एका नव्या दिवसाची सुरुवात करणारा लाल चौक परिसर मी तिथंच रेंगाळत पाहत बसलो व थोड्याच वेळात तिथुन निघालो. हॉटेलवर जाउन तासाभरात तयार होउन मला मुंबई पुण्याहुन विशेष ऑफ बिट पर्यटन मोहिमेसाठी येणाऱ्या एका गृपमधे सामील होउन माझ्या पहिल्या सोलो ट्रीपचा दि एंड होणार होता. श्रीनगरजवळील् या विशेष प्रोग्राम मध्येही खूप धमाल आली.

माझ्या पहिल्यावहिल्या सोलो ट्रीपने मला खूप काही भरभरुन दिले. या आठवडाभरांत मला भेटलेली माणसं, ठिकाणं, वाहनं, रस्ते, खाद्यपदार्थ, निसर्गाची विविध विस्मयकारी दृश्य या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. या प्रवासात मला प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचा मी ऋणी आहे. धन्यवाद


राहुल