Monday, 16 October 2017

"पेबगड़ची आमची वाट"- Fort Peb

"पेबगड़ची आमची वाट" 


माघी गणपती झाल्यावर रत्नागिरीकरांच्या अंगात जसा 'शिमगा' संचारू लागतो तसं मुंबईकरांचं जून चा पहिला पाऊस पडला कि होतं. आकाशात काळे ढग दिसू लागले कि, 'यावर्षी कुठल्या नवीन ठिकाणी जायचं" यावर चर्चा रंगू लागतात, तसंच काहीसं आम्हा मित्रमंडळींचं २०१० च्या जून मध्ये झालं होतं. 

दुसऱ्या आठवड्यात थोडाफार पाऊस पडून गेला होता. आपापसात आमच्या चर्चा चालू होत्याच. वर्षांपूर्वीचा 'लोह्गड' चा अनुभव गाठीशी असल्याने एखादा नवीन गड सर करायचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. कुठे जायचे, कधी जायचे, कोण कोण येतील या सर्व आणि त्यातल्या त्यात शेवटच्या प्रश्नावर येऊन गाडी अडत होती.  पिकनिकला जायचा बेत झाला कि १०-१५ जण असेच जमतात पण पिकनिक ऐवजी ट्रेक म्हटले की १५ मधले १० जण कल्टी मारतात आणि उरलेल्या ५ पैकी ३ जण आयत्यावेळी रद्द करतात हा वैश्विक अनुभव आम्ही याआधीही घेतला होता.  मी, केतकी, श्रीकांत आणि रश्मी असे ठाण्याहून ४ जण तर पक्के होतो. आणखी कोणी आला तर बोनस असे समजून आम्ही तयारीला लागलो. 

एका रात्री श्रीक्याचा फोन आला. 'पेब' गडला जायचा प्रस्ताव होता साहेबांचा. पेबचे दुसरे नाव 'विकटगड' असेही आहे. इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीचा आम्ही थोडा अभ्यास केला आणि त्यावरून 'शेलू' मार्गे जाणारी वाट धरायची ठरले. आमच्या 'वाट' लागण्याच्या  वाटेलाही इथूनच सुरुवात  झाली. असो........बेत  ठरला .... ... पक्का झाला... रविवारी सकाळी लोकलने शेलूला जायचे ठरले. श्रीकांतने जेवणाची, केतकीने बटाटा भाजीची आणि आमचा बोनस मित्र, विद्या (विद्याधर) ने नाश्त्याची जबाबदारी घेतली. 

ठरल्या प्रमाणे शेलूला वेळेत पोचलो. चटर पटर करत, एकमेकांच्या फिरक्या घेत आम्ही टमटमने पेबच्या पायथ्याशी असलेल्या गावात पोचलो. अंदाजाने चालायला सुरुवात केली आणि गावातल्या घरांमध्ये गडाकडे जाणाऱ्या  वाटेची चौकशी केली तसं एका माणसानं विचारले कि 'येऊ का वाटाड्या म्हणून'. आम्ही विचार करून हो म्हटलं आणि त्याच्या मागोमाग चालू लागलो. समोर किल्ला दिसू लागला तसं नाश्त्यासाठी मस्त हिरव्यागार रानातच बसकण मारली. विद्याने पवईहुन येताना त्याच्या नेहमीच्या उडुपी हॉटेल मधून त्याचा 'बहोत अच्छा, बहोत अच्छा' वाला नाश्ता आणला होता. ५ ईंच व्यासाची एक अश्या प्रत्येकी ३ इडल्या, सांबार, चटणी आणि त्यावर प्रत्येकी एक मोठी प्लेट गोड़ शिरा असा हलका आहार समोर पाहून आम्ही गरगरलो. मला तर झोपच येऊ लागली. नाश्त्याचे पार्सल काढून झाल्यावर महाशयांनी सॅक मधून प्रत्येकी एक स्टील प्लेट, चमचा बाहेर काढले. हे सर्व पाहून आम्हाला हसावं कि रडावं की त्याला धरून बदडावं हेच कळेना. हा इसम ट्रेक ला आलाय की पिकनिकला? खरंतर दया आली त्याची. बिचाऱ्याने सर्व स्वतः कॅरी करून आणले होते. फक्त टेबल खुर्च्या आणायचे बाकी ठेवले होते. असो..... तसा तो आमच्या सर्वांमध्ये 'गुणी'  मुलगा म्हणून प्रसिदध आहेच. त्याच्या कष्टाला न्याय देत आम्ही नाश्ता केला. 


भरपेट, तुडुंब नाश्ता करून डुलत डुलत आम्ही गड चढायला सुरुवात केली. एकमेकांना दिसू एवढे अंतर ठेवत वाटाड्या खूप पुढे गेला होता. पहिलीच टेकडी चढून तिथल्या एका चौथऱ्यावर आम्ही विसावलो. १० मिनिटांचा छोटा ब्रेक घेऊन आम्ही मार्गक्रमण चालू केली. नाश्ता जरा जास्तच हेवी झाल्याने 'स्लो बट स्टेडी' अशी आमची वाटचाल चालू होती आणि किल्ल्याची ऊंची आम्ही हळूहळू चढत होतो. जसजसे ऊंचीवर जात होतो तसतसा आजूबाजूचा परिसर नजरेमध्ये येत होता. ८-१० दिवस पाऊस झाल्याने सर्वत्र डोळ्यांना सुखावणारी हिरवाई पसरली होती. वाटाड्याच्या  मागे मागे, कधी दाट झाडीतून, कधी खाच खळग्यातून, दगड धोंड्यातून वाट काढत आमची आगेकूच व्यवस्थित चालली होती. खूप पाऊस झाला नसल्याने पायाखालची वाट जास्त निसरडी झाली नव्हती. अर्थात आम्ही काळजीपूर्वकच चालत होतो. त्या दिवशी पाऊस तर सोडाच पण पावसाळी हवाही नसल्याने तसे तापतच होते. ऊंचीवर असल्याने थोडा वारा वाहत होता त्यामुळे सुखद होते. एक मात्र नक्की, मागील दोन आठवड्यात थोडा पाऊस झाल्याने डोंगर दर्यांचे रुपडे पालटत होते. उन्हाळ्यातील रूक्षपणा जाऊन सर्वत्र हिरवागार जिवंतपणा आला होता. साधारणपणे दीड तास चालून आम्ही आता चांगलेच वरपर्यंत चढून आलो होतो, सततच्या चढणीच्या मार्गाने आल्याने आम्हाला धाप लागली आणि एका सपाट जागेवर आम्ही थोड़ी उसंत घेतली. 



एका चढावावरून पुढे जाताना वाटेत मोठ्या दगडांचा अडथळा आला. त्या शिळा एवढ्या मोठ्या होत्या कि त्यावरून कोणत्याही आधाराशिवाय चढणे केवळ अशक्य होते. आधारासाठी दगडामध्येच एक दोरी ठोकून ठेवलेली दिसत होती पण तिचा आम्हाला काही उपयोग करून घेता येत नव्हता. आणखीन एक गृप तिथे खोळंबलेला आम्ही पाहिला. वाटाड्या तर पटकन चढून वरती पोचला. आमच्यातील सुपर ऍथलेट श्रीकांतने तो दगड कसाबसा पार केला आणि वरती जाऊन, दगडावर बसून आम्हा एकेकाला व खोळंबलेल्या ग्रुप ला हाताचा आधार देऊन वरती घेतले. श्रीकांतच्या शक्ती आणि युक्तीने आम्हा सर्वांचीच सुटका झाली आणि आम्ही हुश्श केले.





आता सूर्य वरती येऊ लागला होता व आमची वाटचाल चालूच होती. वाटेत एका ठिकाणी डाव्या हाताला डोंगरामध्ये आम्हाला गुहा, लेणी सदृश काही दिसले. ते जवळ जाऊन पाहण्यात वेळ न घालवता बाजूच्या अत्यंत अरुंद आणि निसरड्या वाटेवरून बुळबुळीत झालेल्या दगडांचा आधार घेत आम्ही कसेबसे पुढे सटकलो. थोडे अंतर चालून आल्यावर काही अंतरावर अजून एक आव्हान समोर दिसत होते. एक १०-१५ फूट ऊंचीची भिंत तीला लावलेल्या सरळ शिडी सकट (Monkey  ladder) आमची वाट पाहत होती. पुढील काही वेळातच शिडीचे आव्हान पार करून आम्ही किल्ल्याच्या सर्वात वरच्या पट्ट्यात पोचलो. पाहिले तर तिथे ट्रेकर्सची चांगलीच वर्दळ होती. काहीजण आराम करत होते, काही डबा खात होते आणि उरलेल्यांची मस्ती चालली होती. आम्हाला कळेना एव्हडी सर्व मंडळी आली कुठून? वाटेत तर आम्हाला एकच ग्रुप भेटला होता. नीट चौकशीअंती लक्षात आले कि ते सर्वजण नेरळ-फणसवाडी मार्गे ट्रेक करत आले होते. म्हणजे आम्ही आलो होतो त्याच्या बरोब्बर विरुध्द  दिशेने. बव्हंशी ग्रुप्स नेरळ मार्गेच हा ट्रेक करतात असेही कळले. एकूण पाहता तो किल्ल्याच्या माथ्याचा भाग होता. या किल्ल्यावर पुरातन अवशेष जवळ जवळ काहीच शिल्लक नाहीत. आम्हाला तरी दिसले नाहीत. थोडे पुढे चालून गेल्यावर एका हिरव्याशार पठारावर आम्ही पोचलो. हा गडाचा माथा होता आणि आम्ही तो सर केला होता. बाजूलाच एक भगवा ध्वज रानवाऱ्यावर फडकत होता आणि आमचा ऊर सुद्धा अभिमानाने भरून आला होता. आजूबाजूचा नयनरम्य परिसर डोळ्यांचे पारणे फेडत होता. पठारावर एका कोपऱ्यात काही धष्टपुष्ट गुरं चरत होती. अचानक त्यातील एक बैल आक्रमक रीतीने आमच्या दिशेने धावला आणि आम्हा सर्वांची तंतरली, आसमंतात एक शांतता पसरली होती आणि एकूणच माहौल सही होता. आम्ही प्रचंड दमलो होतो त्यामुळे तिथेच मखमली हिरवळीवर सर्वजण पहुडलो. थकल्यामुळे डोळे मिटले होते आणि मनात ध्येयपूर्तीचा आनंदही होता. वाटाड्या बाजूलाच घुटमळत होता कारण त्याला आता परतीच्या प्रवासाची घाई झाली होती. 






परत जाताना त्या खतरनाक शिळा कश्या पार करायच्या हा यक्षप्रश्न समोर ठाकला होता. दगडांवरून खाली उडी मारणे अत्यंत धोकादायक होते. आमची आपापसात व वाटाड्या बरोबर एक महाचर्चा झाली, वाटाड्या सोडून कोणाचाच कल त्या वाटेने परत फिरण्याचा नव्हता एव्हडा धसका सर्वांनी घेतला होता. वाटाड्याच्या सल्ल्यानुसार दुसरा पर्याय हा होता की, माथेरान किंवा नेरळच्या दिशेने गड उतरणे. हा पल्ला किती लांबचा होता याची कल्पना आम्हाला आली नाही व वाटाड्यानेही आम्हाला करून दिली नाही. त्याने फक्त एका दिशेला हात करून सांगितले की 'या दिशेने चालत राहा' म्हणजे तुम्ही नेरळ-माथेरान ट्रेन ट्रॅक  वर पोचाल. आम्ही ओके म्हटले व त्याचा 'स्कोप ऑफ वर्क' संपल्याने त्याची फी दिली आणि आमच्याकडे शिल्लक असलेला नाश्ताही दिला. त्याला टाटा केले. यापुढील मार्गक्रमणा आम्हालाच दिशेचा अंदाज घेऊन करायची होती.



सकाळचा नाश्ता कधीच जिरला होता आणि आमच्या पोटातील कावळ्यांचा घसाही ओरडून ओरडून बसला होता. पठार हिरवेगार होते पण सावली कुठेच नव्हती आणि आक्रमक  बैलही दूरवर चरत होता म्हणून आम्ही माथेरान च्या दिशेने आगेकूच चालू केली. थोडे अंतर काटल्यावर पठारावरून उतरण्यासाठी दोन जिने दिसले. दुर्गप्रेमींनी गडमाथ्यावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी या जिन्यांची सोया केली आहे. जीने उतरल्यावर एक छान सावलीची जागा नजरेला पडली. एका बाजूला किल्ल्याची भिंत आणि दुसऱ्या बाजूला एक मोठी जवळपास २५ फूट ऊंच, रुंद शिळा यामधील पायवाटेवरचा भाग होता तो. आमचे थकले जीव विसावले व शिदोर्या सोडल्या. भूक प्रचंड होती व जेवणाची अवस्था नाश्त्याच्या उलट होती. श्रीयुत श्रीकांतसाहेबांनी ५ जणांसाठी ६ पावाची एक लादी आणली होती. आम्ही ते पाचजणांत वाटून बटाट्याच्या भाजी बरोबर खाल्ले. हे खाऊन झाल्यावर केतकीने एक सरप्राईज दिले. सॅक मधून एक डबा काढला ज्यात घरी बनवून आणलेला गोड़ शिरा होता. काही मिनीटातच आम्ही त्याचा फन्ना  उडवला. वर मस्तपैकी पाणी प्यालो आणि आमचा आत्मा सुखावला. थोडा वेळ दगडाला रेलून बसून टाईमपास, फोटोशूट वगैरे केले. अनोळखी वाटेने जायचे असल्याने आम्हाला खरंतर लगेच निघायला हवे होते पण पाय उठायचे नावचं घेत नव्हते. अक्चुअली सर्वांची लिमिट आता संपली होती आणि अंतर मात्र अजुन खूप पार करायचे बाकी होते.







शेवटी कसेबसे निघालो. वाट तुडवत आम्ही पुढे पुढे चाललो होतो. खूप ऊंचीवर असल्याने सभोवतालचा परिसर अतिसुंदर दिसत होता. आजूबाजूच्या टेकड्यांनी पोपटी रंगाची शाल पांघरली होती तर दऱ्यांमध्ये हिरवाकंच गालिचा पसरला होता. समोर दूरवर माथेरान दिसत होते. सूर्य कलल्यामुळे उन्हाचा तडाखा कमी होत होता. आम्ही मात्र चालतच होतो. मोठा फरक एवढाच होता कि हे चालणे तुलनात्मक सरळ होते. या गडावर नेरळ मार्गे येण्याचा मुख्य फायदा म्हणजे खूप ऊंची चढावी लागत नाही. थोडे ऊंचसखल पण बरचसे सपाटीवर चालणे आहे. शेलू मार्गे आल्याने आम्हाला जरा जास्त ऊंची चढावी लागुन आमची वाट लागली. साधारणपणे दीड तास चालूनही समोरचा माथेरानचा डोंगर अजूनही जवळ येत नव्हता. वाटेत कुणी माणूसही भेटत नव्हता वाट कन्फर्म करायला. आता मात्र आम्ही जरा कन्फ्युज आणि टेन्स झालो. पेबगड च्या ट्रेकमध्ये वाट चुकल्याने लोकांना रात्र रात्र जंगलात काढावी लागल्याचे किस्से आम्ही नंतर खूप दिवसांनी ऐकले. नक्की आठवत नाही पण आम्हाला कुणीतरी वाटसरु भेटला आणि त्याने आम्हाला योग्य वाट दाखविली. थोडे अंतर पार करून एक चढण चढल्यावर ट्रेन ट्रॅक आमच्या दृष्टीस पडला आणि आम्ही उड्या  मारल्या. 


आता आम्ही सुरक्षित तर झालो होतो पण आपण माथेरानला जणूकाही पोचलोच असा जो काही आमचा गोड़ गैरसमज झाला होता तो साधारण आणखीन एक-दीड तास चालल्यानंतरच दूर झाला. आमची चाल आता चांगलीच मंदावली होती. शरीर थकले होते, पायांनी बंड पुकारले होते आणि उत्साहाने कधीच मान टाकली होती. ट्रेन ट्रॅक जणूकाही आम्हाला फरफटवत पुढे नेत होता पण माथेरान मात्र काही केल्या येत नव्हते. रश्मी मात्र तीचा उत्साह टिकवून आणि  मनोबल उंच ठेवून सर्वांच्या पुढे चालत आमच्या समोर आदर्श ठेवत होती. एकाक्षणी प्रचंड दमल्यामुळे म्हणा किंवा  वैतागल्यामुळे म्हणा, एका ठिकाणी आम्ही सॅक खाली टाकल्या आणि तिथेच फतकल मारली. थोडा वेळ काही न बोलता, शांत बसून, उरले सुरले पाणी पिऊन, एकमेकांचा धीर वाढवून आम्ही मार्गक्रमण चालू केली. त्याक्षणी आत्यंतिक गरज होती ती कमीत कमी एका फक्कड चहाची. त्याचीच स्वप्ने रंगवत आम्ही आपले चालतच होतो. 

अखेर तो क्षण आला. आम्हाला माणसांचे आणि त्यांच्या गडबड गोंधळाचे आवाज ऐकू येऊ लागले. वाटेत आलेल्या पहिल्याच चहाच्या ठेल्यावर आम्ही पडाव टाकला. आजूबाजूने चालत असलेल्या पर्यटकांचे जथ्थे पाहून एखाद्या जत्रेत आल्यासारखे वाटत होते. रविवार संध्याकाळ असल्याने सर्वजण दस्तुरी नाक्याकडे झेपावत होते. गर्दीच्या वेळेच्या लोकल ट्रेन प्लॅटफॉर्म चे स्वरूप परिसराला आले होते. चहा, वडापाव च्या गाड्यांच्या बाजूला माकडांचीही लक्षणीय उपस्थिती होती. जसे काही ते सर्वांना टाटा बाय बाय करत होते. हातामध्ये बिस्कीट पुडा किव्वा तत्सम खाद्यपदार्थ घेऊन कोणीही खाऊ शकत नाही एव्हडी दहशत त्या मर्कट गॅंग ची होती. आमचे नशीब थोर कि त्यांना चहामध्ये काहीच रस नव्हता. 

दस्तुरी नाक्यापर्यंत नाही म्हटले तरी दीड-दोन किलोमीटर चालायचे होते. पुढे शेअर टॅक्सी, त्यापुढे अतिगर्दीत लोकल पकडणे, ठाणे ला उतरून ऑटो ने घरी पोचणे अशी भरगच्चं गर्दीची मेजवानी अजून बाकी होती. हे सर्व करायचा प्रचंड कंटाळा आला होता आणि त्याचवेळी आमच्यात अजून एका महाचर्चेला सुरुवात झाली. ठाणे गाठायचे कि इथेच राहायचे???? माथेरानला राहायच्या कल्पनेनेच सर्वांचे डोळे लकाकले. पण एकदा का राहिलो कि दुसऱ्या दिवशीची दांडी निश्चित होती त्यामुळे मनावर दगड ठेवून, प्रॅक्टिकल निर्णय घेऊन पाय ओढत ओढत आम्ही दस्तुरी कडे निघालो व यथावकाश ठाणेला पोचलो........ 


या ट्रेकला आम्ही निश्चित किती चाललो हे माहीत नाही पण दिवसभर चालतच होतो. एखादा गड सर करताना जी एक एकसाईटमेन्ट आणि एन्जॉयमेंट असते ती आम्ही परतीच्या प्रवासात गमावली. वाटेची अपुरी माहिती आणि नक्की किती अंतर पार करायचंय याबाबतची अनिश्चिती यामुळे जास्त त्रास झाला बहुतेक. त्यावर्षीचा पावसाळा संपेपर्यंत नवीन ट्रेकचे कुणी नावही काढले नाही. ७ वर्षे झाली पण या ट्रेक च्या आठवणी आम्ही दरवर्षी काढतो आणि परत परत आमचे थकलेल्या चेहऱ्यांचे फोटो बघतो. एका अनवट वाटेने केलेल्या पेबगडच्या चढाईने आमची अक्षरशः 'वाट' लावली आणि आम्हाला खूप काही शिकवूनही गेली. 

नेरळ-फणसवाडी मार्गे पेबला जाणारी वाट अनुभवायचा योग कधी येईल याचीच आता वाट पाहतोय ......... 


हर हर महादेव.