जानेवारी २०२३ मध्ये युथ हॉस्टेलची उत्तराखंड मधील कॉर्बेट सायकल ट्रीप केल्यानंतर आमचा आत्मविश्वास आणि उत्साह दोन्ही दुणावले होते. त्याचवेळी ठरविले होते की संधी मिळाली कि जैसलमेर सायकलिंग ट्रीप करायची. डिसेंबर २०२३ च्या पहिल्याच बॅचचे बुकिंग केले आणि तयारीला लागलो. राजस्थानातील मेवाड प्रांत काही वर्षापूर्वी फिरून झाला होता. या सायकल ट्रीपला जोडून मारवाड फिरायचे नक्की केले आणि बेत आखला.
दिवस 0
मारवाड मधील बिकानेर, मंडावा, जोधपूर, कुंभलगड येथील स्थलदर्शन आटोपून जैसलमेरला पोचलो व युथ हॉस्टेलच्या कॅम्पमध्ये दाखल झालो. मुख्य शहरापासून ४-५ किमी अंतरावर एका विशाल मैदानावर हा कॅम्प स्थित आहे. इथेच होमगार्ड कँपही असल्याने एकूण व्यवस्था आणि सुरक्षा चोख होती. संध्याकाळी आम्हाला सायकल वाटल्या गेल्या आणि त्यावरून १० किमीची एक सराव फेरी झाली. आमचा १२ जणांचा ग्रुप होता आणि त्यात हरयाणापासून तामिळनाडू पर्यंत विविध राज्यातून आलेले सायकलस्वार होते. रात्री जेवणानंतर सर्वांशी ओळख, गप्पाटप्पा झाल्या. जैसलमेर हा भारतीय हवाईदलाचा मोठा तळ असल्याने दिवसभर विमानांचा जोरदार सराव सुरू होता. त्यायोगे आम्हाला विविध फायटर विमाने पाहता आली.
दिवस १
चहानाश्ता, पॅकलंच हे नेहमीचे सोपस्कार आटोपून आम्ही तयार झालो. एक छोटेखानी उद्घाटन समारंभ झाला व आमची राईड ९.३० ला सुरू झाली. युथ हॉस्टेलची आम्हाला आवडणारी बाब म्हणजे फक्त सायकलिंग एके सायकलिंग असे न करता राईडदरम्यान स्थलदर्शन असते. त्यामुळे प्रसिद्ध अशी ठिकाणे पहाता येतातच आणि त्याबरोबर मधेमधे ब्रेक मिळाल्याने विश्रांती मिळते. आजचे पाहिले ठिकाण होते 'अमरसागर जैन मंदिर'. या ४०० वर्षे जुन्या मंदिरात संगमरवरातील खूप छान कोरीव काम पाहताना माउंट अबू जवळील दिलवारा मंदिर आठवले. पुढील ठिकाण होते 'कुलधरा गाव'. रस्ते तसे चांगले होते, छोटे चढ उतार होते. सायकलवरही आता चांगले हातपाय बसले होते. कुलधरा गावी पोचून प्रवेश तिकीट काढून गाव पहायला निघालो. १५० वर्षापूर्वी स्थानिक जमिनदाराच्या छळाला कंटाळून ८४ विविध गावातील लोकं एका रात्रीत गाव सोडून गेली. ती कुठे गेली याचा नंतर काहीच पत्ता लागला नाही. तेव्हापासून इथली घरे पडझड अवस्थेत आहेत. काही घरांना शाबुत ठेवून पर्यटनासाठी उपयोग केला जातो. शापित गाव असा शिक्का बसल्याने आता तेथे कोणीच वस्ती करीत नाही. कुलधरा पाहून पुढे निघालो.
सूर्यदेव आता चांगलेच वरती आले होते आणि पोटातही कावळे ओरडत होते. थोड्याच वेळात आम्ही दसेरीताल नावाच्या तळ्याकाठी जेवायला थांबलो. तळे तसे खूप मोठे नव्हते पण काठावर झाडे झुडुपे होती आणि त्यामुळे सावलीही होती. शिदोऱ्या सोडल्या आणि पॅकलंचचा आस्वाद घेतला. जैसलमेरपासून पुढील थर वाळवंटपर्यंतचा प्रदेश तसा ओकाबोकाच आहे. झाडे, नद्या, तळी जवळपास नाहीतच. त्यात हे असे तळे असणे ही भाग्याची बाब होती. आजूबाजूच्या लोकांना या तळ्याचे खूप महत्त्व आहे आणि त्याप्रमाणे तेथे घाण कचरा न करण्याचे नियमही आहेत. हे तळे तेथील माणसांची, गाईगुरांची, पक्षीप्राण्यांची तहान गेली अनेक शतके भागवीत असल्याने हे तळे एक श्रध्दास्थान बनले आहे. जेवण करून, थोडी विश्रांती घेऊन राईड चालू केली. या भागात रात्री थंडी असली तरी दिवसा मात्र चांगलेच तापते त्यामुळे लवकर दमछाक होते. जिम कॉर्बेट राईडवेळी दिवसभर गारठा असल्याने राईड करताना एवढे दमायला झाले नव्हते.
पुढचे ठिकाण होते खाबा किल्ला. रस्ता चढउतारांचा, उन्हात दमवणुक करणारा होता. खाबा हा १३ व्या शतकातील एक छोटा किल्ला आहे. आत बघण्यासारखे तसे खास काही नाही. कुलधाराप्रमाणे या ठिकाणची लोकंही एका रात्रीत गाव सोडून गेली अशी समज आहे. इथून पुढे सम गावाकडे निघालो जिथे आमचा आजचा कॅम्प होता. समच्या पुढे थर वाळवंट सुरू होते. रस्त्याच्या आजूबाजूला वालुकामय सपाट प्रदेश, छोटी खुरटी झाडे, अत्यंत तुरळक लोकवस्ती असे सततचे दृश्य होते. हायवेवर पोचलो तशी वाहनांची वर्दळ सुरू झाली. जैसलमेरला येणारा जवळपास प्रत्येक पर्यटक सम गावी येऊन वाळवंट सफारी करतोच करतो.
४ वाजता कॅम्पला पोचलो. टेन्ट उभे राहिले होते आणि रात्रीचे जेवण बनवणेही चालू झाले होते कारण इथे वीजपुरवठा नव्हता. चहापाणी करून आम्ही पटापट वाळवंटातील जीपसफारीला निघालो. वाळूच्या चढउतारावर जीपसफारीचा रोमांच पुरेपूर अनुभवला. वाळवंटातील क्षितिजावर शांतपणे अस्ताला जाणारा सूर्य व त्याच्या विविध छटा पाहत एक अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवली. काळोख वाढू लागला तसे कॅम्पला परतलो व हेडटॉर्चच्या उजेडात जेवणे आटोपून झोपी गेलो.
दिवस २
आज जवळपास ७० किमी सायकलिंग करून रामगढला पोचायचे होते. स्थलदर्शन असे काही नव्हते. वाटेत छोटे ब्रेक घेत दुपारनंतर कॅम्पला पोचलो. दमायला झाले. आजचा कॅम्प एका शाळेत होता त्यामुळे सुविधा बऱ्या होत्या. स्वच्छता चांगली होती.
या राईड प्रोग्रमला येण्याआधी एक समजूत होती की राजस्थानमध्ये सायकलिंग म्हणजे एकदम सहजसोपे असणार कारण मोठे घाट किंवा चढउतार इथे नाहीत. एका अर्थी हे बरोबर होते आणि रस्तेही चांगले व रुंद होते. पण इथले सर्व रस्ते वाळूच्या टेकड्यामधून बनलेले असल्याने सततचे चढउतार मात्र खूप होते. कारमधून किंवा बाईक वरून जाताना ते एवढे जाणवणार नाहीत पण सायकलिंग करताना चांगलीच दमछाक करतात.
या पूर्ण सायकलिंग ट्रीपमध्ये आणखीन एक खास गोष्ट होती ती म्हणजे मारवाड भागातील खाद्यपदार्थ. रोज रात्रीचं जेवण म्हणजे एक खाद्यसोहळा असायचा. मारवाडी पद्धतीची भाकरी, भाजी आणि एखादा गोड पदार्थ हमखास असायचा. त्यात हे सर्व साजूक तुपात बनवलेलं, त्यामुळे एकूण चंगळ होती. आजचा मेनू होता केरसांगरी भाजी (केर म्हणजे एक प्रकारची बोरा एवढी छोटी फळे आणि सांगरी म्हणजे एक शेंगभाजीचा प्रकार), जोडीला बाजरीसोगरा म्हणजे बाजरीची भाकरी आणि गोड पदार्थ होता बाजरी चुर्मा (बाजरी कुस्करून त्यात गूळ व तूप घालून केलेला हलवा).
शाळेच्या पाठीमागे ३०० मीटर्स उंचीचा एक टीवी टॉवर होता ज्याचा उंचीबाबत संपूर्ण भारतात तिसरा नंबर लागतो. असं म्हणतात की १९९३ ला हा टॉवर कार्यान्वित होण्याआधी या भागातील लोकांना पाकिस्तान टीव्हीचे कार्यक्रम पहावे लागत.
दिवस ३
सकाळी ९ वाजता सायकल हाकायला सुरुवात केली. आज जायचे होते तनोट या गावी. हा पूर्ण हायवे होता. वाटेत इंदिरा नहर (कालवा) पार केला. याचे आधीचे नाव राजस्थान कालवा असे आहे. पंजाब मधून सतलज आणि व्यास नदीच्या संगमातून सुरू होऊन हा कालवा थर वाळवंटापर्यंत पाणी पोचवतो.
मजल दरमजल करीत आमची सफर चालू होती. आता आजूबाजूला अस्सल वाळवंटी प्रदेश दिसू लागला. लांबवर पसरलेले वाळूचे पठार, मध्येच तुरळक वस्ती, त्यात एखादी नमुनेदार वाळवंटी झोपडी असे दृश्य होते. रस्त्याचा दर्जा चांगला पण चढ उतारही खूप होते. एके ठिकाणी धाब्यावर चहा पिऊन प्रसिद्ध घंटीयाली माता मंदिरात पोचलो व जेवण केले. हे मंदिर या भागातील मोठे श्रद्धास्थान आहे. अधिक वेळ न थांबता दुपारच्या उन्हाचे चटके खात आम्ही तनोत धर्मशाळेत पोचलो ३ वाजता पोचलो. राहायची व्यवस्था ठीकठाक होती. फ्रेश होऊन, चहा पिऊन लगेचच दुसऱ्या वाहनाने भारत पाक सीमेवरील बब्लीआन कडे निघालो. ट्रकच्या हौद्यात बसून केलेला हा प्रवास खास होता. या सीमेवर एक मोठी कमान बनवली आहे व पलीकडे लांबवर आपल्या हद्दीचे तारेचे कुंपण आहे. त्या पलीकडे अजून लांबवर पाक हद्दीतील इमारती दिसतात. हा संपूर्ण भाग वाळवंटी रखरखीत आहे. मनुष्यवस्ती नाही.
तनोटला परतलो व प्रसिद्ध तनोटमाता मंदिरातील संध्याकाळच्या आरतीला हजेरी लावली. या मंदिराची सर्व व्यवस्था जसे की पूजा, आरती वगैरे BSF जवानांकडून केली जाते. हेच ते प्रसिद्ध मंदिर जेथे १९७१ च्या युद्धात पाककडून मोठ्या प्रमाणावर बॉम्ब वर्षाव होऊनही मंदिराचे नुकसान झाले नाही. हा प्रसंग बॉर्डर सिनेमात दाखविला आहे. मंदिराजवळ पडलेले पण न फुटलेले बॉम्बगोळे देवळांमध्ये ठेवले आहेत. या मंदिराची महती पाहून स्तिमित झालेल्या पाक सैन्याधिकारानी युद्ध संपल्यावर मंदिराला चांदीचे मुकुट भेट म्हणून दिले जे मंदिरात आपण पाहू शकतो. आरती, दर्शन करून सावकाशीने जेवण झाले. आजचा मेनू होता दाल बाटी व चूर्मा.
दिवस ४
रात्री प्रचंड थंडी होती त्यामुळे वाटले होते की सकाळी धुके असेल पण नशिबाने तसे काही नव्हते आणि आमची सफर वेळेत सुरू झाली. राईडची सुरुवात BSF अधिकाऱ्यांकडून झेंडे दाखवून झाली जी आमच्यासाठी एक अभिमानास्पद बाब होती.
आज लोंगेवालामार्गे रामगडला पोचायचे होते. एकूण अंतर ८० किमी. लोंगेवालाचा रस्ता खूप चढउतारांचा होता ज्यामुळे दमछाक झाली. ४० किमी वर लोंगेवाला युद्धस्मारक आले. पर्यटकांची खूप वर्दळ होती. स्मारक परिसर मोठा आहे. आम्ही एक एक भाग पाहण्यास सुरुवात केली. १९७१ ला या ठिकाणी झालेल्या युद्धात भारताने पाकला धूळ चारली होती आणि एक अविश्वसनीय व ऐतिहासिक विजय मिळवला होता. बॉर्डर सिनेमा याच युद्धावर बेतला आहे. स्मारकामध्ये पाकिस्तान कडून हस्तगत केलेले रणगाडे, भारताची फायटर विमाने हे सर्व ठेवले आहे. एक लघुचित्रपटही पाहिला. हे स्मारक प्रत्येक भारतीयाने जाऊन अवश्य पहावे असे आहे.
पुढे रामगडच्या दिशेने कूच चालू केली. चढउतारांची साखळी आमची परीक्षा पहात होती. खूप थकायला झाले होते आणि आम्ही कशीबशी सायकल रेटत होतो. वाटेत आम्ही एक मॅरॅथॉन स्पर्धा पाहिली. १५२ किमीची ही स्पर्धा लोंगेवाला येथे संपणार होती. एवढ्या तळपत्या उन्हात एवढे लांबचे अंतर धावणारे स्पर्धक पाहून आम्ही आमचे कष्ट थोड्या वेळाकरिता विसरलो. सूर्य मावळतीला जाऊ लागला तरी आम्ही सायकल रेटीतच होतो. प्रत्येक ट्रेक किंवा सायकलट्रीप मध्ये असा एक दिवस असतोच की तो तुमची परीक्षा, संयम, निग्रह पाहतो. अखेर ८२ किमी संपवून आम्ही रामगडच्या त्याच शाळेत पून्हा मुक्काम ठोकला. सर्वजण थकले होते व आरामाची नितांत गरज होती. काही जणांची तब्ब्येतही बिघडली होती. एकूणच आजचा दिवस कसोटी पहाणारा ठरला. उद्या जैसलमेरला पोचून ट्रीपची सांगता होणार होती त्यामुळे भरपूर गप्पा मारीत झोपायला जरा उशिरच झाला.
दिवस ५
सकाळी ताजेतवाने होऊन, चहानाश्ता करून धुक्यात राईड चालू केली. धुके आणि त्यात हायवे असल्याने वेग कमी ठेवला होता. चढउतार मात्र आमची पाठ सोडत नव्हते. पण अखेरचा दिवस असल्याने सर्वजण उत्साहात होते. ट्रेक आणि सायकल ट्रीप मध्ये अजून एक साम्य म्हणजे ते सुरू होइपर्यंत धीर धरवत नाही आणि शेवटचे एक दोन दिवस राहिले की कधी एकदा संपतो असे होते.
आजचे अंतर ६८ किमी होते. स्थलदर्शन काहीच नव्हते. पहिल्या दिवसाप्रमाणेच आजचे जेवणही एका वेगळ्या तळ्याकाठी झाले. यथावकाश बेस कॅम्पला ३.३० वाजता पोचलो आणि सर्वांनी हुश्श केले. सर्वांनी ही ट्रीप यशस्वीरीत्या, कोणतेही संकट, अपघात, आजार न होता पूर्ण केली म्हणून एकमेकांचे अभिनंदन केले. जून २०२२ मध्ये आम्ही सायकल खरेदी केल्यावर सराव करून २०२३ मध्ये एकाच वर्षात जिम कॉर्बेट आणि जैसलमेर या युथ हॉटेलच्या दोन सायकल राईड पूर्ण केल्याचे समाधान लाभले. प्रशस्तीपत्र वितरणाचा एक छोटेखानी कार्यक्रम होऊन सर्वांनी एकमेकांना टाटा बाय बाय केले. युथ हॉस्टेलचे आमचे दोन्ही लीडर्स व इतर पदाधिकारी यांनी घेतलेल्या कष्टांबद्दल त्यांचे आभार मानून निरोप घेतला.



























